गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५
गुणगुण
शनिवार, २० एप्रिल, २०२४
गंधानुभव २.
बा. सी मर्ढेकरांची एक कविता माझी अत्यंत आवडती. "पितात सारे गोड हिवाळा". आम्हाला दहावीला होती. त्या कवितेने अनेक अमूर्त आणि नव्या संवेदना जागृत केल्या. त्यातल्या काही ओळी...
कुठे धुराचा जळका परिमल,
गरम चहाचा पत्ती गंध,
कुठे डांबरी रस्त्यावरल्या,
भुऱ्या शांततेचा निशीगंध
एकाच कडव्यात गंध, वातावरण निर्मीती, अन् अनुभव कसं गजऱ्यासारखं गुंफलंय ना !
अगदी पहाटे पाचच्या सुमारास फिरायला निघावं (तेही हिवाळ्यात) अन् रस्त्याच्या कडेला एखाद्या चहाच्या टपरीवर चहा उकळत असावा... पहाटे फिरायला येणाऱ्यांसाठीच. त्या उकळी फुटलेल्या चहाचा सुगंध जो दरवळतो... हाही एक अनुभवच. मी काही चहा वेडा वगैरे नाही पण चहाचा गंधवेडा आहे!
पावसाळ्यात कुठल्यातरी भ्रमंतीला जाऊन येताना मुसळधार पाऊस कोसळतो...कोळंदून आलेलं असतं. सगळीकडे चिंब. ओला गारवा. पावसाच्या माऱ्यानं पडलेला पानांचा सडा. त्यानंतर कुठल्यातरी चंद्रमौळी टपरीवर गरम कांदाभजी तळली जातायत... स्वतःला थांबवायचा प्रयत्न करून बघा!
जळक्या गंधावरून आणखी एक आठवण/अनुभव स्मृती... आई त्रिपूरी पौर्णिमेला त्रिपूर लावायची. तो त्रिपूर शमवतानाचा एक जळका सुगंध मला अजून हवाहवासा वाटतो. तसाच सणाच्या दिवशी आरती झाल्यानंतर जेंव्हा निरांजन मालवतो तो वास ही किंवा मध्यरात्री उठल्यावर सांजवेळचा दिवा मालवतो त्याचा धुरकट वास हे खूप खोल अध्यात्मिक अनुभूती देवून जातात. तेच कापराच्या बाबतीत. कापराचा वास आला की आपला धार्मिक अनुभव जागा होतो.
चाफ्याचं झाड भारतीय संस्कृतीत खोल रुजलंय. त्याची माझी पहिली भेट काही फार स्मरणात नाही पण चाफ्याचा आणि त्याच्या सुगंधाचा साक्षात्कार मला पारनेर जवळच्या सिद्धेश्वराजवळ झाला. पार बारावीनंतर. पण ती आठवण जी काही कोरली गेली...ती गेलीच. संध्याकाळची वेळ. दरीच्या अगदी कडेला निर्मनुष्य ठिकाणी वसलेलं ते देऊळ. वारा अगदीच पडलेला! ऊन्हाळ्याचे दिवस. चाफ्याचं एकच झाड. निष्पर्ण. पण झाडांना जशी पानं असावीत तशी फुलं लगडलेली. आसमंत भरून तो सुगंध ! वारा नसल्यानं तसाच साठून राहीलेला!. खोलात असलेली शंकराची पिंड. आत गाभाऱ्यात कमालीचा गारवा. पिंडीवरच्या अभिषेक पात्रातून थेंब थेंब पडत होते.. पिंडीवरही चाफ्याची फुलं वाहिलेली. मी माझ्या मित्राबरोबर ॐकार केला. त्याचा जो काही धीर-गंभिर स्वर त्या गाभाऱ्यात घुमला तोही मी नाही विसरू शकत. या सगळ्याची मिळून एक एकसंध आठवण, एकच एक गंधानुभव संचितात जमा झालाय. मोगरा तसा कधी आयुष्यात आला नाही लक्षात पण मोगऱ्याची एक आठवण जी गुंफली गेली ती आत्या आणि बाबांशी जोडलेली. दोघांनाही मोगरा खूप आवडतो. आत्या प्यायच्या पाण्याच्या माठात मोगऱ्याचं फूल टाकते, बाबा जेवणाच्या टेबलावर आणि उशाशी मोगऱ्याची फुलं ठेवतात....ती सुगंध देत राहतात.
प्रत्येक गंध हा सुगंधच असेल असं नाही. काही गंधांबरोबर काही कटू स्मृतीही जोडलेल्या असतात. नगरला शाळेत जाताना चितळे रोडवर एका कोपऱ्यावर बोंबीलचं दुकान होतं. त्या कोपऱ्यावरचा तो वास अगदी नकोसा होई. मी शाळेत तिथनं येताना/ जाताना श्वास कोंडून ठेवायचो. श्वास कोंडून ठेवायचा खूप सराव तिथं झाला. नंतर दहावीला गणिताच्या क्लासला जाताना/येताना बालिकाश्रम भागात एक कत्तलखाना लागायचा. तिथं कातड्याच्या थप्प्या वाळत घातलेल्या असायच्या. त्यांचाही भयंकर दर्प पसरलेला असायचा. श्वास कोंडून ठेवणं तिथंही चालूच राहीलं. ओल्या रक्त-मांसाचा वासही कसा कुठे कोण जाणे, पण डोक्यात भरून राहिलाय... अंगावर शहारा ऊठवणारा...नारायण धारपांच्या काही कथांमधून तो पक्का होत गेला....त्याच पठडीतला दर्प म्हणजे त्वचा/जिवंत सजीव किंवा शरिरं जळतात तो. शहारा आणणारा. (उदा. दिव्यावर झेप टाकून किडा/पतंग मरतो तेंव्हाचा)
बऱ्याचदा रस्त्यावरनं जाताना एखादा भपकारा येतो. अगदी नकोसा....कधी कुठला मेलेला प्राणी कुठल्यातरी मोकळ्या जागेत रस्त्याच्या बाजूला आणून टाकलेला असतो आणि मग दोन-तीन दिवसांत तो कुजायला लागतो. हा भपकारा मग पुढे १०-१५ दिवस येत राहतो. कधी उंदराला औषध घातल्यानंतर तो अडचणीत जाऊन मरतो आणि मग असह्य होणाऱ्या वासामुळं सगळा अडचणीतला पसारा काढणं आलं. हे हल्ली मात्र तसं कमी. परळीला असताना इरिगेशन कॉलनीत एक गाढव मेलं होतं. इरिगेशन कॉलनी असल्यानं तिकडे लक्ष कोण देणार? मग कुत्री जमा झाली आणि त्यांनी ते गाढव फाडून खायला सुरु केलं. ती कुत्री जबरदस्त आक्रमकही झाली. कुणाला त्या बाजूने जाऊ देईनात. त्यांची रक्ताने माखलेली तोंडं, त्यांचा आक्रमकपणा याची सगळीकडे दहशत बसली. आठ-दहा दिवस हा प्रकार चालला. त्यात ओळखीची कुत्रीही अनोळखी बनली होती! त्यांची आपसातली भांडणंही डोकेदुखी झाली होती. मेलेल्या प्राण्याचा दुर्गंध ही त्या गाढवाची कायमची आठवण बनून बसली. रस्त्यानं /रेल्वेनं प्रवास करताना आणखी एक भपकारा म्हणजे मळीचा!. बायकांचा पदर अचानक नाकाला, पुरूषांची तोंडं वेडीवाकडी....साखर कारखान्यांजवळून जातानाचा हा हमखास अनुभव. पूर्वी प्रवास जेंव्हा सर्रास झाला नव्हता तेंव्हा कधी काळी होणाऱ्या प्रवासात लिंबू/संत्र्याची साल हमखास सोबत असे. कुणाला ना कुणाला तरी गाडी लागत असे. मग एकाचं पाहून दुसऱ्याला असंही चक्र सुरु होई. त्यावर इलाज म्हणजे लिंबू/संत्री हुंगणे! लिंबाच्या वासाची अशी अनुभवाशी सांगड!
प्राण्यांशी निगडीत असेही अनेक गंधानुभव आहेत! गाई-म्हशी आणि बोकड हे उल्लेख तर आधीच आलेत, पण त्याव्यतिरीक्त अनेक गंध आहेत. आपल्या आयुष्य आणि अनुभवांशी निगडीत. मी मांजर किंवा कुत्रा आजारी आहे हे त्याच्या जवळ गेल्यावर येणाऱ्या वासावरून ओळखू शकतो. तसंच त्यांच्या जखमांनाही एक गंध/दर्प असतो. मी, आणि बहिण मांजर, कुत्रा यांच्या इतक्या जवळ वावरलोयत की त्यांच्या 'दात न घासलेल्या' तोंडाचा वास कसा असतो हे सांगू शकतो ! तसाच दर्प हा प्राणी संग्रहालयात जंगली प्राण्यांच्या पिंजऱ्यांजवळ येतो. थोड्या जास्त तिव्रतेनं.एखाद्या जुन्या पेटीत उंदराचं वास्तव्य किंवा येणंजाणं आहे हे ही मी वासानं ओळखू शकतो. आणि अशा ठिकाणी उंदराची पिलं सापडण्याची शक्यताही अधिक! मास्टर्सला असताना माझा प्रोजेक्ट उंदरावर होता. त्यासाठी एनिमल हाऊस ला जावं लागे. तिथल्या उंदरांचा, त्यांच्या लेंड्या आणि मुत्राचा वास डोक्यात बसलाय. त्यांच्या पिंजऱ्यांत खाली भाताची तूस टाकावी लागे आणि पिंजरे दररोज साफ करावे लागत...
लहानपणी शाळेत अनेक चित्र-विचित्र खेळ खेळले गेलेत. त्यातनं अगाध ज्ञान प्राप्त झालं. पुस्तकी ज्ञानापेक्षा कितीतरी वेगळं आणि अधिक. आपले हात हातावर घासले/त्वचा त्वचेवर घासली की त्याचा एक दर्प येतो. त्वचा जळण्याच्या दर्पाची ती आधीची अवस्था....गावातल्या शाळेत काही मुलं कित्येक दिवस अंघोळ न करता येत. शेतांमध्ये, गोठ्यांमध्येही कामं करुन येत असतील. आमच्या पांढऱ्या कॉलरवाल्या मुलांचे कपडे एकदम शुभ्र, स्वच्छ,नीळ दिेलेले, तर त्यांचे मळलेले, पिवळे पडलेले. त्यांच्या कपड्यांना कधी कधी वास येई. अंगालाही येई. त्यावेळी त्यांचा तीरस्कार वाटे, पण आज मागे वळून पाहताना घामाच्या वासाची किंमत कळालेली असते. शाळेतच सार्वजनीक मुतारीत जाण्याला सुरूवात झाली आणि आमोनियाचा डोक्याला मुंग्या आणणारा दर्प कळाला. पुढे कॉलेजला असताना बिकरमधला आमोनिया हुंगला होता... आठवणी ताज्या झाल्या पण मेंदू काही मिनिटं पूर्ण बधीर झाला! झिणझीण्या आल्या.
शाळेशी निगडीत वासांपैकी आणखी एक म्हणजे नविन पुस्तकांचा. नवं पुस्तक हातात धरून, त्यात नाक खुपसून पोट भरून वास घ्यावा. त्यातल्या शुभ्र पानांवरून, काळ्याभोर छपाईवरून हात फिरवत रहावा...
काही दुकानांशीही अनेक गंध चिकटून राहीलेत. किराणा दुकानातला तेल, डाळी, गूळ, मसाले, दाणे, लाल मिर्ची, हळद अशा जिनसांचा मिळून एक गंध (आताच्या सुपरमार्केट मध्ये हरवलेला, निसटलेला एक अनुभव) . घाण्याच्या तेलाचीही वेगळी दुकानं अन् त्यातल्या तेलांचाही एक विशिष्ट वास अनुभव बनून राहीलाय. न्हाव्याच्या दुकानातला साबण, तेल, वेगवेगळ्या क्रीम, आफ्टर शेव लोशन इ. गोष्टींचा एक संमिश्र गंध. कपड्याच्या दुकानातला नवीन कापडाचा, त्याच्या खळीचा आणि रंगांचा सूक्ष्म वास. मंडईतला ताज्या भाज्या आणि टाकून दिलेल्या भाज्या (सडण्याच्या आधीच्या अवस्थेतल्या) यांचा संमीश्र वास, त्यातच मंडईतल्या कोपऱ्यांवर असलेली मसाल्यांची दुकानं, फळांच्या दुकानातनं पिकलेली विविध फळं, त्यात भर घालतात. जर बाजाराचा दिवस असेल तर विकायला आलेल्या शेळ्या , मेंढ्या, कोंबड्या, त्यांनी टाकलेल्या लेंड्या, मूत यांचाही एक दर्प त्यात मिसळतो. पान टपरीवरचा पान मसाले, अस्मानतारा, वेगवेगळ्या पानात घालायच्या जिनसा,
आणि मुख्य म्हणजे सिगरेटींचे धूर यांचा संमिश्र दर्प. सिगरेटी ओढणारा जर
जवळनं गेला तरी तो दर्प येतो. तो लपवण्यासाठी मग पानटपऱ्यांवर मिंट सारखे
पदार्थ मिळायला लागले पण मला नाही वाटत तो दर्प लपतो. आजोबा सिगरेट ओढायचे. त्यांच्या मते ही वाईट सवय त्यांना त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांमुळे लागली. ते चारमिनार ओढायचे. त्यांच्याकडे त्या केशरी रंगाच्या पाकिटांच्या थप्प्या साचलेल्या असत. आम्ही नगरला आल्यावर त्याच्या अनेक गोष्टी करत असू. त्यात षटकोनी डबे, एका बाजूकडून दुसरीकडे जाणाऱ्या फोटोची जादू, त्यातल्या चंदेरी कागदाच्या आत छर्रा टाकून त्याच्या कोलांटउड्या मारणाऱ्या बाहुल्या अशा गोष्टी होत्या. मात्र डॉक्टरांनी सागितल्या दिवसापासून लगेच त्यांनी सिगरेट सोडली!
याच गंधांवरून एक गंमत आठवली. नगरच्या चितळे रस्त्यावरनं आणि गल्ली-बोळातनं माजलेले बोकड फिरायचे. दाढ्या वाढलेले, शिंगं वाढलेले. त्यांच्या पासून लांबच रहावं लागे नाहीतर कुणालाही सरळ ढुसणी मारून ते पुढं जायचे. ते बोकड कुठेही आसपास असतील तर लगेच कळायचं ते त्यांच्या अंगाला येणाऱ्या दर्पामुळे. अगदी दोन-तीनशे मिटरवरूनही हा दर्प सहज येई.
मसाल्यांच्या वर आलेल्या संदर्भांवरून आणखी एक त्याच्याशी निगडीत गंधानुभव वर आला. तो म्हणजे मसाले दळून आणण्यासाठी मसाल्यांच्या गिरणीत/कांडप यंत्रावर जाण्याचा. कांडपयंत्राच्या खडखडीच्या आठवणींनी एक कोपरा खडखडत राहतो. हळद, मसाल्यांमुळे पिवळसर झालेल्या गोष्टी. तोंडाला/नाकाला फडके बांधलेला मसाले दळून/कुटून देणारा तो माणूस आणि वेगवेगळ्या मसाल्यांमुळे उडणारा ठसका! हळदीचा, तिखटाचा, आणि गरम मसाल्यांचा... प्रत्येक वेळी दळणाला येणाऱ्या वेगळ्या पदार्थांमुळं येणारा वेगळा गंध अन् वेगळा अनुभव. शिकेकाई दळताना/कांडताना उठणारा ठसका हाही त्यातलाच एक अनुभव. त्या शिकेकाईच्या मिश्रणात कोणी संत्र्याच्या वाळलेल्या साली, नागरमोथा अशी सुगंधी द्रव्यं घालत. तो सुगंध काही वेगळाच.
पिकलेल्या फळांचा गंध हाही एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. रस्किन बाँड यांच्या कथेतल्या त्या एका मुलाची आठवण येते जो शाळेत जाता येता भुकेल्या पोटी फळांच्या दुकानाकडे पाही.
अति पिकलेली केळी, अति पिकलेले पेरू, यांचा नकोसा गोड,अति पिकलेली बोरं, चिंचा यांचा नकोसा आंबट हे वास नेहमीसाठी स्मृतीत साठवले गेलेले आहेत. पिकलेल्या आंब्यांचा वास हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांशी पक्का जोडलेला. कॉटखाली आंब्यांची छोटीशी अढीही कधीतरी लावलेली. तसाच कितीही पिकला तरी गोड आणि हवासा होत जाणारा अननसाचा वास...अननसाची गाठभेट तशी खूप उशिराची. पिकलेल्या खरबुजाचा वासही मंद पण हवाहवासा वाटणारा. बाबांचं पाहून मलाही खरबूज घेताना नाकाला लावून वास घेतल्याशिवाय समाधान होत नाही.
पिकलेल्या फणसाचा घमघमाट सगळ्यांनाच आवडेल असं नाही. माझ्या स्वतःच्या बाबतीत असं झालं की मी त्या वासामुळे फणस द्वेष्टा झालो होतो. बहिणीला मात्र फणस खूप आवडे. एकतर फणस नगरला मिळणं तसं दुर्मिळ. मराठवाड्यात तर फक्त चित्रांतून फणस माहीती. असा वर्षा-सहामहिन्याला नगरला आल्यावर जरी फणस आणला, तरी माझ्या नाक मुरडण्यामुळे बहिणीला काही त्याचा मनासारखा आस्वाद घेता आला नाही. पण आता फणस हे माझं दुसरं सर्वात आवडतं फळ झालंय. केळानंतर. हा बदल कसा झाला कोण जाणे. बहुधा कोकणात गेल्यानंतर जसं कोकण आवडायला लागलं तसं फणस आवडायला लागला. आणि त्याचा वासही! आता मी अख्खेच्या अख्खे फणस आणून, हाताला तेल बील लावून फणस सोलतो आणि गरे काढतो. आवडीने. माणसाच्या आवडी निवडी अशा बदलतात. फणस ऑफीस किंवा शाळेत नेण्याची मात्र चोरी. असा घमघमाट पसरतो! लपून राहूच शकत नाही.
त्यावरूनच लहानपणी खेळलं जाणारं
"भटो भटो कुठं गेला होतात?
कोकणात
कोकणातून काय आणलं?
फणस
कुठं कापू? इथं? तिथं असं करत जेंव्हा तो खराब निघतो, तेंव्हा पुढचा फणस वास घेतल्याशिवाय कापायचा नाही हेही लहान मुलांच्या मनावर कुठंतरी बिंबलं जातं!"
कुठंसं वाचलं होतं की लग्नानंतर घरातले सुगंध कसे बदलत जातात. लग्नानंतर पहिले वर्ष-दोन वर्षे अत्तर, परफ्यूम्स, सुगंधी तेलं अन पावडरी, डिओ वगैरे वगैरे. मग नंतर, बाळाच्या पावडरी, बाळाचे साबण, तेलं आणि मग आयोडेक्स, झंडू-बाम, अमृतांजन इ.इ. किती खरं आहे ना! आताशा मला आणि बायकोला एका प्रकारच्या विशिष्ट वाईप्सचा वास सहनच होत नाही कारण ते वाईप्स आम्ही मुलं लहान असताना त्यांचे डायपर बदलताना पुसायला वापरत असू ! त्यामुळं आता त्या वाईप्सचा वास जरी आला तरी त्या आठवणी जाग्या होऊन नकोसं होतं. शिसारी बसते ती अशी.
काही गंध हे सुगंध म्हणवत नसले तरी ते एक समाधान देतात. त्यातला एक म्हणजे डोक्याला खोबऱ्याचं तेल लावताना! स्वतः लावत असू तरीही किंवा कोणी लावून देत असेल तर आणखीनच! दुसरा म्हणजे दिवाळीत उटणं लावून अभ्यंग स्नान करताना! खोबऱ्याच्या तेलावरनं आठवलं. आमच्या मास्टर्सला एक केरळी होता. तो घरून एक पाच लिटरचा शुद्ध नारळाच्या तेलाचा डबाच घेऊन यायचा. तोपर्यंत मला हे माहितच नव्हतं हे तेल अशा मोठ्या प्रमाणात मिळतं. आम्हाला तोपर्यंत प्याराशूटची निळी बाटलीच ठाऊक. इकडे दक्षिणेत आल्यावर कळालं की नारळाच्या तेलात भाज्याही करतात आणि आता भेंडीची नारळाच्या तेलातली मिरे घातलेली भाजी मला खूप आवडते. केळाचे चीप्स नारळाच्या तेलातच छान लागतात! कपड्यांना इस्त्री करतानाचा किंवा कडक ऊन्हात वाळवलेल्या कपड्यांचा गंध हेही त्याच पठडीतले.
तसाच समाधान देणारा गंध म्हणजे स्वतःच्या ताज्या घामाचा! व्यायामानंतरचा हा ताज्या घामाचा वास केवढा आत्मविश्वास देतो!
आपल्या शरिरांना असलेले सूक्ष्म वास आपल्या नकळत आपण ओळखतो. आई, बाबा, भावंडं, आणि आपली मुलं, आपले जोडीदार, सगळ्यांच्या शरिरांचा सूक्ष्म वास आपल्या नकळत परिचयाचा असतो. पूर्वी बाळांच्या मस्तकाचं अवघ्राण करण्याच्या प्रथांचे बरेच उल्लेख आहेत.
शेवट करताना एका पुस्तकाबद्दल जे काळजाशी जोडलं गेलं त्यातल्या गंधानुभवाच्या उल्लेखावरुन. अरुंधती रॉय यांचं "God of small things". बसच्या, किंवा इतर ठिकाणच्या लोखंडी दांडीला येणारा असा चीर परिचीत सूक्ष्म वास. किंचीत खारट... धातूमय. किती बारिक निरिक्षण आणि टिपण! माझ्याही अनेक स्मृती त्याने चाळवल्या गेल्या. तसंच जाऊन ते ऱ्हदयाला भिडलं.
अजून असे अनेक अनामिक गंध आहेत. खूप परिचयाचे पण कशाचे ते सांगता न येणारे. वेगळ्या विश्वात नेणारे. त्यांच्याशी निगडीत स्मृतींची कवाडं खाड खाड उघडणारे.
सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३
शब्द
माझ्यासारख्या गुराख्यांना नाही जमत ग्रेसबाबांसारखं वागणं. ते सहज बैलांच्या खांद्यावर जू टाकावा तसं शब्दांच्या मानेवर जू ठेवून भाषेच्या बैलगाड्या थेट गाडा शर्यतीत नेतात. किंवा घोड्यावर मांड ठोकावी तशी शब्दांवर मांड ठोकून शब्द चौखूर उधळून देतात.
पाहणारे डोळे चोळतात, डोळे पुसतात. अविश्वासानं किंवा डोळ्यात धूळफेक झाल्यानं. उधळलेल्या शब्दांनी केलेली. ते वेदनेचे अश्रू नसतातच मुळी.
वेदना कळावी लागते ती रात्रीच्या गुडूप अंधारात कोणीतरी उसासे टाकल्याचा आवाज येतो तशी. किंवा कोणीतरी हुंदका छातीत, गळ्यात किंवा ओठात दाबतो तशी. बाहेर पडली तर वेदना मोकळी होते. हंबरड्यासारखी. पण मग ती आपलीही राहत नाही.
आम्हा गुराख्यांना फारतर गुरांना घेऊन चरून आणता येतं. किंवा त्यांचं शेण-मूत काढता येतं. एखादं वाघरु किंवा बिबट्या येऊन एखादं कोकरू घेऊनही जातो. आजकाल तर काय गाई दावणीलाच बांधलेल्या. जर्सी गाईंची औलाद. फक्त १०-२०ली. दूध काढायचं आणि शेण मूत आवरायचं.
त्या हंबरडा फोडत नाहीत बहुतेक. फक्त रवंथ करतात आणि शेणात बरबटतात.
ते लेख तरी कसे लिहितात? एखाद्या पाश्चिमात्य पुरुषाने ताटावर बसावं. आत रांधणं चाललेलं दिसतंय. अगम्य गोष्टी अगम्य पुरातन भांड्यातून भरडल्या, भाजल्या, ऊकडल्या जातायत, दळल्या जातायत, चूल भडकलेली, चुलीवर भांड्यात ही रटरट, काय चाललंय कळत नाही....मग ताटात गरम पुरणपोळी येऊन पडते, आमटीच्या वाटीबरोबर. चवीचा घास छान लागतो पण कसं खायचं ते कळत नाही आणि आतल्या रांधण्याचा आणि पुरणपोळीचा संबंधही जमत नाही. बरं त्या रांधणा शिवाय ताटातल्या स्वादिष्ट पुरणपोळीला अर्थ नाही....
रविवार, २ एप्रिल, २०२३
गंधानुभव १.
रस्कीन बाँडचं "My Favourite nature stories" वाचण्यात आलं अन् आपलेही असे काही अनुभव लिहावेत असं वाटलं.माझ्या स्वतःच्या गंधानुभवांबद्दल मला स्वतःलाच अप्रुप आहे. म्हटलं तेच उतरवावं.....
तीन चार वर्षांचा असतानाची बालवाडीतली आठवण कोरीव आहे. आम्हाला कोवळ्या ऊन्हात बसवलेलं होतं. माझे हात मातीत फिरत होते. डोक्यात नक्की काय होतं माहित नाही. मला मातीत बांगडीची काच सापडली आणि मी ती नाकाजवळ नेऊन हुंगली. तिला कसला वास येतोय का?ती जरा जास्तच जोरात हुंगली गेली. इतकी की ती सरळ नाकातच जाऊन अडकली. मी जाम टरकलो. शिक्षक/शिक्षिका काय म्हणतायत इकडे जराही लक्ष न देता मी घरी पळत सुटलो (घर हाकेच्या अंतरावर). घरी सांगितल्यावर घरच्यांनी आणि शेजार-पाजारच्यांनी नाकात पाहिलं. काहीच दिसेना. कुणी म्हणालं पडली असेल, कुणी म्हणे नाकात गेलीच नसेल, पण मी ठाम होतो की ती नाकातच आहे. घरच्यांनीही विश्वास ठेवला माझ्यावर आणि तालुक्याच्या ठिकाणी कान,नाक,घसा त़ज्ञाकडे नेलं. त्याने तो बांगडीचा तुकडा काढला. ऐंशीच्या दशकात. हा माझा पहिला ठळक गंधानुभव. हे आठवल्यानंतर माझं गंधवेडं विश्व अन् गंधवेड्या अनुभवांची मालिकाच तयार झाली.
पुसट आठवण. आजुबाजूचं विश्व समजाऊन घेणं चाललं होतं. कशाचे रंग कसे आहेत, कुणाच्या लकबी कशा आहेत, कशाचे कुठून कसे आवाज येतात आणि कशाचे कसे गंध आहेत. जग कशाला चांगलं म्हणतं अन् कशाला वाईट....आपलं शरिर चाचपडणं अन् समजून घेणंही सुरु झालं होतं. मग कानात बोट घाल अन् वास घे, बेंबीत बोट घाल अन् वास घे,आणि अजूनही कुठे कुठे बोट घालून वास घे हे प्रकार मी केले. हे अजून आठवतं कारण जगाला आणि स्वताःला समजून घेतानाचे हे अनुभव होते आणि त्या अनुभवांबरोबर गंध गुरफटला होता. माझं गंधविश्व मी गुंफत होतो....गंध असा अनुभवांबरोबर गुंफला गेला तेच अप्रुप.
तेंव्हाचीच कधीची तरी आणखी एक आठवण. मला ट्रकच्या धुराड्यातून निघणाऱ्या धुराचा वास आवडायचा. मला आठवतंय की पाटबंधारे विभागाच्या आमच्या कॉलनीत शेजारीच टँकर ड्रायव्हर राहत. ते टँकरही घरीच घेऊन येत. कधी कधी तो सुरू करून ठेवीत. मी जाऊन धुराड्यासमोर नाक धरून भरभरून तो धूर आणि वास घेतलाय. कित्येक मिनीटं तो धूर घेत मी ऊभा होतो. तंद्रीच.
अगदी लहानपणी आजोळी गेल्यानंतर तिथे न्हाणीघरात अंघोळी असायच्या. ती मजाच काही वेगळी. न्हाणीघरात कुठल्या कुठल्या फटींमधून सूर्यप्रकाश आत शिरत असे. तो अंगावर घेत अंघोळ करणं म्हणजे परमसूख होतं. वाफाही त्या सूर्यप्रकाशात उठून दिसत. सूर्यप्रकाशात वरवर जाणाऱ्या वाफा. न्हाणीघरात मध्यभागी मोठा दगडी चौथरा होता, त्यावर बसून अंघोळ करायची. न्हाणीघराच्या बाहेरच्या आडातून पोहऱ्यानं पाणी काढून चुलीवर किंवा बंबात तापवायचं आणि ते वाफाळतं पाणी अंघोळीला. तांब्याच्या बंबात गरम केलेलं पाणी. तांबूस रंगाचा ठोकेदार बंब आणि धूरानं काळी झालेली त्याची चिमणी. बंब चकाकतो सकाळच्या कोवळ्या ऊन्हात. बंबातून बादलीत सोडलेलं पाणी. त्या पाण्याला एक धुरकट वास असतो. ते धुरकट वासाचं पाणी अन् त्या धुरकट वासाच्या पाण्यानं त्या न्हाणीघरात सूर्यप्रकाशात केलेली वाफाळती अंघोळ हे सोनेरी क्षणच स्मृतींच्या कोंदणात बसवले गेलेत. त्यात त्या वेळी खेड्यांतून मिळणारा एकमेव लाईफबॉय साबण अन त्याचा वासही न विसरता येणारा.
याच मालिकेत येणारे काही पाहुणे अनुभव....शेणाने सारवलेलं अंगण, शेणाने सारवलेलं धाब्याचं घर अन सकाळी चुलीवर तुराट्याच्या काड्या घालून दूध तापवताना झरोक्यातून हुंगलेला धूर.
आजोळीच आंधळी आजी म्हणजे माझी पणजी होती. तिला बऱ्याच वर्षांपासून काही दिसत नसल्यानं तिला आम्ही आंधळी आजी म्हणूनच ओळखायचो. तिचे सुरकूतलेले हात आणि त्या सुरकूतलेल्या हातांनी चाचपडणं अजून आठवतं. तोंडाचं बोळकं आणि त्या बोळक्या तोंडानंच ती बऱ्याचदा काहीतरी बडबड करायची. तिला पतवंडांना म्हणजे मला आणि बहिणीला कुरवाळायला आवडायचं. दिसत काहीच नसल्यानं ती स्पर्शानेच आम्हाला पहात होती. ती आमचे मुके घ्यायची. आम्हाला घट्ट कुशीत घ्यायला पहायची पण मला ते अजिबात आवडायचं नाही. तिच्या जवळ कसलासा वास यायचा. तो मला नकोसा असे. नंतर कळलं की ती सारखी तपकीर ओढायची अन् तांबूलही खायची. बहुधा त्याचाच तो वास असावा.
आजोळी टाकरवणला आणि केसापुरी-परभणीला गोठा होता, गायी होत्या...आणि त्या गोठ्यात येणारा गायींच्या शेणा-मुताचा वास. तो भपकारा मला अजिबात आवडत नसे. माझा या वासाचा तिटकारा पाहून माझ्या आजीच्या भावांना मजा वाटे. मला ते धारोष्ण दूध प्यायला बोलावीत, ज्याला माझा स्पष्ट नकार असे. मग मला चिडवण्यासाठी ते विचारत, मग तू घरी दूध कसं पितोस ? त्यावर माझं ऊत्तर : आम्ही गायी म्हशींचं दूध नाही पीत. आम्हाला दूधवाले काका आणून देतात.
दुसरी आठवण नगरला आल्यानंतरची. आम्ही जिथं रहायचो, तिथं एक मोठा वाडा आमच्या घराला चिकटूनच होता. तो होता गवळ्यांचा वाडा. पाच भाऊ त्यांच्या कुटूंबांसमवेत तिथं राहत. त्यातले चार दूधाचा व्यवसाय करायचे. एका कडे म्हशी आणि गोठा होता. ते म्हशींना धुवायला नदीवर घेऊन जात. त्याची गंमत म्हणजे आम्ही जिथं राहत होतो तिथं अगदी अरूंद बोळातून जावं लागे. साधारण शंभर मिटरचा तो अरूंद बोळ...जेमतेम एक माणूस किंवा एखादी दुचाकी जाऊ शकेल एवढंच. तिथनं या म्हशी जायच्या, एकामागून एक, संथपणे...लांबच लांब शिंगांच्या, जाफराबादी. आम्ही मोजायचे. नक्की आठवत नाही पण साधारण दहा बारा असतील. त्या जाईपर्यंत आणि पुन्हा परत येईपर्यंत ती बोळ पूर्णतः बंद ! कोणीतरी पुकारा करी... म्हशी आल्या रे... एखादा माणूस त्या बोळातून येत असेल तर तो मागं फिरे. पण जर दुचाकीवर कोणी असेल तर मात्र पंचाईत ! मागे घेणं अवघड. त्यात कोणी डबल सीट असेल तर अजून अवघड. कित्येकदा म्हशींनी अनेकांना पाडलंय. तर या म्हशी जातानाही हा वास यायचा आणि गवळी वाड्यातल्या बऱ्याच जणांच्या कपड्यांना देखील तो येई.
मेंदी हा प्रकार पहिल्यांदा कळाला तोही आजोळीच, टाकरवणला. तिथं लग्न म्हणजे दारात मांडव, अंगणात मोठा चुलाणा, त्याच्यावर स्वयंपाक, गावातले जमतील ते सर्व मदतीला आणि रात्री गप्पाष्टक. त्याच गप्पांमध्ये मेंदी लावणे हा कार्यक्रम. मला मेंदी हा प्रकार माहीत नव्हता तेंव्हा मला सगळ्या मोठ्यांनी चिडवलं की हाताला शेण लावणार आहेत आणि मग मी लांब कुठेतरी जाऊन बसलो. नंतर दुसऱ्या दिवशी हातांचे रंग पाहून हरखून गेलो. नंतर कधी कोण जाणे, बहुधा वृषाली मेंदी काढायला लागली तेंव्हा असेल, त्याच्या गंधाची जाणीव झाली. मी मुग्ध झालो. दुसऱ्या दिवशीही हातांना येणारा तो वास भरभरून घ्यावासा वाटला आणि आताही मी तो जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा भरभरून घेतो.
दवाखान्याचं पहिलं
दृश्य लक्षात आहे ते गॅस/स्टोव्हवर सिरींज आणि सुया ऊकळत ठेवल्याचं. आणि
वातावरण निर्मितीला स्पिरीटचा वास. लहानपणी खोकल्याचा त्रास व्हायचा आणि मग
पेनिसिलीनचा कोर्स सुरू व्हायचा. पाच दिवस इंजेक्शन्स. इतर वेळीही मग कुठे
पडापड झाली की ड्रेसींगला दवाखान्यात. तेंव्हाही टी.टी. चं इंजेक्शन. ते
देण्याआधी स्पिरीटच्या बोळ्याने साफ करताना त्याचा मस्त वास यायचा आणि
त्वचेला गार सुखद स्पर्श जाणवायचा! आयोडीन टिंक्चरने जखम साफ करताना आग तर
व्हायची पण त्या टिंक्चरचा वासही आवडायचा! दोनदा काटेरी तारांनी हात आणि
पायाची कातडी फाटली होती तेंव्हाच्या जखमा लक्षात आहेत आणि ड्रेसींगही. पण
इतर अनेक किरकोळ जखमा डेटॉलवर भागल्यात आणि डेटॉलने त्याचा वास स्मृतींत
पक्का केलाय.
शिरीष. हे नाव तसं धीर-गंभिर. शिरीषाच्या प्रौढ व्यक्तिमत्वाला साजेसं. त्या फुलांचा रंगही काही आकर्षक वगैरे नाही. आपल्या आई-बाबांच्या पिढीतल्या कुणीतरी जसं नविन कपडे घ्यायला जावं अन् मळखाऊ रंगाचे कपडे घेऊन यावे तसं. तसाच त्या फुलांचा सुवासही. फार काही भडकपणा त्यांना झेपत नाही. आपला मंद सुगंधच बरा! परळीला असताना, रात्रीचं जेवण झाल्यावर फेरफटका मारायला सिंचन भवनला जाताना रस्त्यात दोन-तीन शिरीषाची झाडं होती. तिथली पहिली भेट. तेंव्हा त्यांचं नाव ठाऊक नव्हतं.आम्ही त्या फुलांचा दाढीचा ब्रश करायचो. आता जर दाढीच्या क्रीममध्ये हा सुगंध आला, तर मला ती क्रीम नक्कीच आवडेल.
लहानपणी चक्का खेळायचो. कुठल्यातरी गाडीचं टायर कुठूनतरी
मिळवायचं.त्याला आम्ही चक्का म्हणायचो. चक्का जाम मधल्यासारखं. (दह्याचा
चक्का कळाला तेंव्हा मजा वाटली होती) मग त्या चक्क्याची शर्यत लावायचो. कधी
काठीनं तर कधी हातानं तो पळवायचा ! तो रस्त्यावरनं, मातीतनं,चिखलातून,
गवतातून, शेणातून, रस्त्यावरून असा पळवायचा. तो पळवून हाताला एक विशिष्ट
वास येतो...रबरी वस्तूंना येतो तसाच काहीसा, पण बाकीच्या वस्तूस्पर्शांमुळे काहीसा बदललेला. गाडीचं टायर बदलतांनाही तसाच काहीसा वास हाताला येतो.
इवली इवलीशी ती रंगरहित फुलं. गुच्छांमध्ये फुललेली. कुणी त्यांची दखल घ्यावी असं काही नाहीच. त्यातून ती कडूलिंबाची फुलं....
चैत्र-पाडव्याच्या सुमारास कडूलिंब पूर्ण बहरात येतो. ऊन्हाळ्याचे दिवस सुरू होतायत. ऊन्हं तापायला लागलीयत पण अजूनही वसंताची शोभा टवटवीतच आहे असा हा काळ. सकाळच्या मंद गार झुळूकेबरोबरच येणारा अन् धुंद करून सोडणारासा सुगंध. आपल्याला कसला तरी वास येतोय हेही लक्षात येणार नाही इतका मंद पण आपलं मन आणि वातावरण प्रसन्न करून सोडणारा असा मधुर. नगरला असताना वरच्या खोलिच्या पत्र्याच्या छतावर जाऊन बसणं हा माझा आवडता उद्योग. त्याच ठिकाणी मागच्या वाड्यात उभ्या असणाऱ्या लिंबाची फांदी तिथे आली होती. त्या फांदीला ही फुलं लगडली होती आणि कधीतरी रात्री तारे पाहत बसलेलो असताना मला त्यांंचा साक्षात्कार झाला आणि मग मी त्यांच्या प्रेमात पडलो. आता कधीही कुठेही हा मंद सुगंध आला की मी तो ओळखू शकतो.
शाळेत सातवी आठवीत असताना रस्त्यात एक बंगला होता. राहता नव्हता. कसल्यातरी दुकानाचं गोदाम म्हणून तो वापरला जायचा. त्याच्या आवारात एक प्रचंड बुचाचं झाड होतं. त्याची फुलं रस्त्यावर पडत. ती थोडी निशीगंधासारखी दिसणारी पण वेगळाच सुगंध असणारी फुलं आम्ही उचलून घ्यायचो. तो सुगंध मोहक होता. त्या वेळी त्या फुलांचं नाव माहित नसावं कदाचित. पण त्यांनी मनात घर केलं,आणि कालांतराने कधीतरी ओळखही पटली...
शिक्षक वर्गात नसताना बऱ्याचदा बाकावर डोकं ठेऊन बसायचो/झोपायचो. त्या
लाकडी बाकांना एक विशिष्ट वास असतो. प्रामुख्याने लाकडाचा पण त्यात अजून
बरेच वास मिसळून तयार झालेला... शाई,डब्यात आणलेले पदार्थ सांडून,
वर्षानुवर्षे धूळ साठून, पोरा-टोरांचे घामट हात घसटत राहून आणि अशा बऱ्याच
गोष्टी एकत्र होऊन तयार झालेला असा तो विशिष्ट वास.
गौरी गणपतीच्या वेळी माझ्याकडे असलेल्या कामांपैकी एक म्हणजे माळ्यावरच्या पत्र्याच्या पेटीतून गौरी-गणपतीच्या सजावटीच्या वस्तू, पडदे, गालीचा इ. वस्तू काढायच्या. ती पेटी उघडली की एक विशीष्ट वास येई. सणाची, मंगलमय पर्वाची सुरुवात झाल्याची ती खूण असे. अत्तर, उदबत्त्या, सुगंधी पदार्थ, कापूर या सर्वांबरोबरच वर्षभर ठेऊन दिलेल्या कपड्याचा कुबटपणाही त्यात मिसळलेला असतो. त्यातच धूळ, काही कीटकांनी तिथे घर केल्यानंही तो विशिष्ट दर्प येत असेल. पण तो आवडतो. कारण ती सणाच्या सुरुवातीची खूण असते आणि मागल्या समृद्ध सणांचंही ते संचित असतं. दरवेळी या गंधांबरोबरच शांता शेळकेंची ' पैठणी ' कविताही हमखास आठवते.
सणासुदीच्या तयारीत एक तयारी फराळ/गोडाधोडाचं करणे ही देखील असे आणि मग रवा / बेसन भाजतानाचा आईचा प्रश्न असे... वास येतोय का रे? आम्ही आमच्याच तंद्रीत घरात कुठेतरी काहीतरी करण्यात मग्न असताना तो खमंग वास नाकात शिरायचा आणि तोंडात पाणी येणं सुरू झालेलं असे. आईला पावती देतांना असं आमचं नाकही तयार झालं....
संध्याकाळची जेवणं, गप्पा आटोपून, 'अंथरूण घालणे' हा कार्यक्रम करून मग सगळीकडे निजानीज होते. वेळ काही फार नाही. अगदी कुठे ८-९. विजेच्या दिव्यांचं प्रदूषण नाही. जर माळवदावर झोपलो असू तर वर चांदण्यांचं छत अन् त्यातली अज्ञात विश्वं आपल्याकडे पाहतायत अशा कल्पना करत असताना कुठल्या तरी देवळातून भजनाचे सूर कानावर पडतात.देवघरात/देवाजवळ सांजवात करताना लावलेला दिवा एखादी खोली पिवळ्या केशरी प्रकाशानं उजळून टाकत असतो.दुसऱ्या कुठल्या कृत्रिम प्रकाशाची त्यात भेसळ नाही. त्याच्या मिणमिणत्या प्रकाशाबरोबर दोलायमान होणारे विचार, मन.... उगाचच झोप लागत नाही. दिव्याची ज्योत तेल संपल्यावर मोठी होते. फडफडते. मालवते. धुराची काजळी युक्त संपृक्त रेघ उमटते. घरभर तो दिवा मालवल्यानंतरचा विशिष्ठ वास भरून राहतो.
शनिवारी मारुतीच्या देवळात गेल्यावर तेल ओतून कुळकुळीत काळी झालेली शनिची मूर्ती आणि तसाच काळा झालेला त्याच्या पुढचा दिवा, तेल, शेंदूर, धूप, ऊदबत्त्यांचा संमिश्र वास,धूरानं भरलेलं देऊळ,आणि त्यातच येऊन मिसळणारा बाहेर फोडलेल्या नारळांपैकी एखाद्या पावलेल्या नारळाचा वास. हा नगरच्या दिल्ली दरवाजालगतच्या शनी मारूतिच्या देवळातला माझा गंधानुभव. संचित. त्यालाच संलग्न असा दुसरा गंधानुभव हा दत्ताच्या देवळातला. तिथं तेल, धूप, शेंदूर, नारळ यांतलं काही नाही. देवळाबाहेर बसणाऱ्या फुलवाल्याच्या दुकानातील निशिगंधाचे हार...हीच माझी आणि निशिगंधाची पहिली गंधभेट!
पोस्टाच्या विशिष्ट
वातावरणाबरोबरच अजून एक गोष्ट पोस्टाच्या आठवणींचा अविभाज्य भाग बनून गेलीय. तिथल्या मेजावरची डिंकाची बाटली. सगळीकडून ओघळ जाऊन, ते वाळून अन्
त्यावर अजून नवे थर चढून डिंकमय झालेली ती बाटली आणि त्यात ठेवलेली काडी.
या झाडापासून बनवलेल्या डिंकाचा उग्र वास. त्याचीही या गंधानुभवांत
बरीच वर वर्णी लागते. दुसरी त्या डिंक अन् त्याच्या वासाशी निगडीत आठवण
आजोबांची. त्यांच्याकडेही तशीच डिंकाची बाटली असे. त्यात नियमीत पाणीही
घालावं लागे. नाहीतर डिंक वाळून जाई. स्वतः तो डिंक तयार करण्याचं समाधानही
वेगळंच. पतंग उडवताना बऱ्याच वेळा फाटलेला पतंग चिकटवायलाही तो वापरला
जाई. या डिंकाचा वास काही फार सुगंधी वगैरे नाही. उलट तो दुर्गंधीकडेच
जाणारा पण गंधानुभव समृद्ध करणारा.
डिंकाच्याच जात कुळीतील आणखी काही गोष्टी गंधवेडं करणाऱ्या. फेवीकॉल. कधी त्याच्याशी गाठ पडली ते नाही लक्षात पण त्याचा वास आणि बोटावर किंवा त्वचेवर तयार होणारा पापुद्रा या गोष्टी हे खेळणंच झालं. तीच गत रबर चिकटवायच्या सोल्युशन ची. बाबा सायकलचं पंक्चर घरीच काढायचे. एका टोपल्यात पाणी, हवा भरायचा पंप, रबरी ट्यूब चे तुकडे, कात्री, कानस आणि ती लाल पिवळी, हळदी कुंकवा सारखी दिसणारी सोल्युशन ची ट्यूब. त्या ट्यूब मधे लाल रंगाचं पारदर्शक सोल्युशन असे. ते बोटावर घेतलं की त्यातली सेंद्रीय द्रव्ये उडून जायला लागतात. मग बोटाला गार लागतं आणि त्या सेंद्रीय द्रव्याचा एक वास नाकात शिरतो. भयंकर आवडतो मला तो. काही वेळानं त्यातली द्रव्यं पूर्ण उडून गेल्यावर एक पापूद्रा बोटावर तयार होतो. तो ही काढायला मला आवडतं.
काही गंधांबरोबरच्या आठवणी अमूर्त. त्यांची विशिष्ठ अशी आठवण नाही पण तो गंध आला की समोर आपोआप एक दृश्य तयार होतं. अनेक अनुभवांची ती सरमिसळ असेल, सार असेल... दंवारलेल्या सकाळी गारवा भरल्या हवेत चमकदार सोनेरी किरणांनी प्रवेश करावा, त्याची ऊब जाणवावी, हवीहवीशी वाटावी. कुठेतरी कुठल्यातरी कोनातून एक दंवाचा थेंब चमकून जावा. तसा तो दिसत/सापडत नाहीच. मग प्राजक्ताचा सडा वेचायला जावं. ओलसर जमिनीवर पडलेली पांढऱ्या पाकळ्या अन् केशरी देठांच्या फुलांची नक्षी. आसमंतात भरून राहिलेला त्यांचा सुगंध. थोड्याशा वाऱ्याच्या झुळूकीबरोबर की आपल्या श्वासोच्छवासाच्या आघातानं कळत नाही, आणखी काही फुलं टपटपतात.
पाऊस पडल्यानंतरचा मातीचा सुगंध. त्याच्यावर बऱ्याच जणांकडून बरंच लिहून झालंय....तोच सुगंध कडक ऊन्हात तापलेल्या भिंतींवर पाणी मारल्यावरही येतो. आणि त्याच सुगंधाच्या काही इतर आवृत्त्याही आहेत. म्हणजे वाळलेल्या पानांच्या राशींना पाऊस चींब ओलं करतो, तेंव्हा त्या पानांच्या राशींनाही एक सुगंध येतो आणि तो मातीच्या सुगंधाच्याच कुळातला अन् त्याच तोडीचा. जळणाऱ्या लाकूडफाट्यावर, पेटलेल्या पाला-पाचोळ्यावर पाऊस पडून ती आग शमते आणि दुसऱ्या दिवशी त्यातून एक जळकट सुगंध उमलतो तो ही अवर्णनीयच असतो.
बीडला मामाच्या घराशेजारचा रिकामा प्लॉट एका राजस्थानी सुताराला दिलेला
होता. मामाकडे गेलं की त्या सुताराकडे जाऊन बसायचो. दारं करणं, फळ्या कापून
रंधा मारणं, काही नक्षी काढून ती कोरणं, फळ्यांना खाचा करून दुसऱ्या
फळ्या त्यांत बसवणं, सांधे जोडणं इ. त्याची चाललेली कामं मी पाहत बसायचो.
सगळीकडे लाकडाचा भुसा, रंधा मारताना निघालेल्या लाकडाच्या वळ्या पडलेल्या
असत. त्याबरोबरच लाकडाचा वास. तो वास हाही एक अनुभवच. लाकडाच्या कुठल्याही
वखारीत तो येतो. तसंच लाकूडकाम करतानाही तो येतो. एकदा त्या सुताराकडे
कुठूनतरी चंदनाचं लाकूड आलं होतं. बाभूळ किंवा कडूलिंबाचं समजून कोणीतरी
विकलेलं. कापताना त्याला सुगंध आला आणि मग त्याला कळालं. मला वाटतं की
तेंव्हाच पहिल्यांदा चंदनाचा सुगंध घेतला असेल मी. लाकूडकामाबरोबरच आणखी एक
काम म्हणजे लाकडाला वार्निश करणं. त्या वार्निशचा वासही पेट्रोलियम
मंडळींच्याच संगतीचा! बहुधा माझा पहिला अनुभव. आता लाकडाचा वास नकोसा
होतो. कारण त्यामागे मेलेलं झाड,त्याचं ते प्रेत, त्यावरचे मोडलेले पाखरांचे संसार आणि
उद्ध्वस्त निसर्ग दिसायला लागतो.
गवतातही बरेच गंध दडलेले असतात. नुसतं बागेतल्या हिरव्या गवतात लोळलं तरी एक गंध जाणवतो. गवत कापल्यावरही एक वेगळाच गंध जाणवतो. हा गंध नुसतं गवतात लोळल्यावर येणाऱ्या गंधापेक्षा वेगळा असतो. मोकळ्या मैदानात/जंगलात/डोंगर-उतारांवर कमरेएवढं वाढलेल्या गवतात येणारा गंध वेगळाच. त्यातच गवताच्या अनेक सुगंधी जातीही...केरळातल्या चेंब्रा माथ्यावर जाताना लागलेल्या जंगलात गवती चहा माजला होता. कंबरेएवढा! जेंव्हा तोडून वास घेऊन पाहिला तेंव्हा आश्चर्याचा धक्का होता तो आम्हाला. लहानपणी नागरमोथ्याचे कंद जमिनीतनं उपटून काढायचो. त्याचा तो मातकट सुगंधही गवत सुगंधांच्या स्मृतींत बसलेला. वाळा ही त्यांचाच भाऊबंद. ऊन्हाळ्यात नव्या माठातलं वाळा घातलेलं थंड पाणी पिणं हे एक श्रीमंती सूख (पण खरंतर गरीबाघरीच मिळणारं)!
सिनेमा थिएटरमधील एक गंध
कायम लक्षात राहील. बंद थिएटरमध्ये कोंडून राहिलेला गंध. मुख्यतः सिगरेटचा
धूर, खाद्यपदार्थ (भजी, समोसे, वडे इ.), पान, तंबाखू आणि गुटखा
कुठल्यातरी कोपऱ्यात थुंकल्याचा, दमट अंधाराचा (हो, हाही एक गंध असतो, तो
अनुभवावाच लागतो), जून होत चाललेल्या भिंती, पडदे, खुर्च्या इ. सगळ्याचा
सरमिसळ झालेला असा तो ' थिएटरचा ' गंध ! मल्टीप्लेक्स च्या आधीच्या
जमान्यातला ! नाट्यगृहांमध्येही (नाटकांची) काही गोष्टी वजा जाता तो
येतोच. सिगरेटचा धूर थोडा कमी,गुटखा तंबाखू कमी, जून पडदे, खुर्च्या जास्त,
त्यात थोडी अत्तरे, अशी त्याची रेसिपी सांगता येईल. आणि आता मल्टीप्लेक्स मध्ये पॉपकॉर्न, पिझ्झा, बर्गर यांच्याबरोबर रूम फ्रेशनर, परफ्युम्स, essential oils (म्हणजे आपले अत्तराचे दिवे)यांचे सुगंध दरवळतात...
धरणं, मोठमोठे जलाशय अशा मोठ्या गोड पाण्याच्या साठ्यांजवळ सहसा एक वास येतो. माहित नाही नक्की कसला पण बहुधा माशांशी निगडीत असा तो वास. कधी कधी वाटतं की नुकत्याच मेलेल्या माशांचा किंवा त्यांच्या विष्ठेचा तो असावा. लांबूनच हा वास येतो, अन् त्याबरोबर हवेतली आर्द्रता, दमटपणा वाढत जातो. मग ओळखावं जवळपास जलाशय आहे. ह्याचा पहिला अनुभव आणि आठवण आम्ही पैठणचं धरण पहायला गेलो तेंव्हाची.
इकडं दक्षिणेत आल्यावर गंधानुभवांत बरीच भर पडली. मुख्यतः रस्त्यालगतच्या "सागर" आणि "दर्शिनी" उपहारगृहांत मोठ्या चौकोनी लोखंडी तव्यावर दोसा आणि उत्तप्प्याचं पीठ पडतं आणि वाफा निघतात तो गंध, त्यातच उत्तप्प्यावर चिरलेल्या बारीक कांद्याचा एक थर चढतो,आणि तो कांदा परतला जातो तेंव्हा येणारा एक खमंग वास ही दक्षिणेतली खासीयत.
अजून तशी एक भली मोठी यादी आहे. हळूहळू उतरवावं म्हटलं.
गुरुवार, १४ एप्रिल, २०२२
पेन
पेनांचं मला भलतं वेड. बऱ्याच जणांना असतं. माझं खूप वेगळं नाही. [का असावं हे वेड? मानसीक विश्लेषण रंगतदार होईल नक्कीच.]
माझी पहिली पेनची आठवण पहिली-दुसरीतील. आम्ही पाटी पेन्सिलवरून थेट पेनवर घसरलो. मध्ये शिसपेन्सिल वगैरे नाहीच. शिसपेन्सिल भेटली भूमितीचा अभ्यास सुरू झाल्यावर. पण शिसपेन्सिल बद्दल नंतर.
तर मी पहिली-दुसरीत असताना वर्गात कुणीतरी पायलटचं (लक्झर) पेन आणलं होतं. मला ते भयंकर आवडलं. त्याच्या शाईचा समुद्राच्या पाण्यागत रंग, अतिशय बारीक टोक, दुधट पांढऱ्या रंगाचं ते पेन, खिशाला खोचायला चपटी दांडी, तिच्या दोन्ही बाजूंनी टोपणावर दोन निळे गोल. खालूनही शाई भरायच्या जागी निळं चकतीसारखं झाकण....
मी घरी हट्ट सुरू केला की मला तसलंच पेन हवंय. घरच्यांना मला सांगताही येत नव्हतं की मला पायलट पेन हवंय. मी फक्त वर्णन सांगत होतो. मग बाबा मला एका दुकानात घेऊन गेले. केसापुरी कँप नावाची आमची छोटीशी गाव-वजा वस्ती. काय मिळणार तिथे? तेही १९८८-८९ मध्ये? मला वाटतं तेंव्हा त्या पेनची किंमत १२ रु. होती. त्या दुकानदाराने अगदी माझ्या वर्णनासारखंच पेन दाखवलं. किंमत २ रु. मला सांगताही येईना हे ते पेन नाहीय आणि नाहीही म्हणवेना. साधं बॉलपेन होतं ते. दिसायला पायलट पेन सारखंच. ठीक आहे, डुप्लीकेट तर डुप्लीकेट, मी ते घेतलं. सारख्या दिसणाऱ्या त्या पेनवर समाधान !
चौथी- पाचवी पासून मात्र खरे पेन वापरायला सुरूवात केली. खेड्यातल्या शाळा. त्यामुळं फार काही भारी पेन कुणाकडे नव्हते. कुणी कुणी तर फक्त कांडीने (आम्ही रिफिल ला कांडी म्हणायचो आणि बॉलपेन, ज्यात रिफील टाकायची, तो कांडीपेन!) लिहायचे आणि आम्हाला त्यात काही फार वेगळं वाटायचं नाही. कांडीने लिहून पहावं. तिही एक कला आहे. मी ५ वी -६ वी ला होतो तेंव्हा अगदी बोटाएवढे फॅन्सी पेन मुलं आणायची. वेगवेगळे आकार असलेले आणि छोटुकली कांडी असणारे ते पेन गोजीरवाणे दिसत. काही की-चेन कम पेन ही असत! कांडीपेनच्या कांड्या संपल्यावर त्यांचं काय काय करता येई. मेणबत्तीवर ती कांडी तापवून आम्ही तिचे फुगे फुगवायचो. कांडीच्या टोकाचा छर्रा काढून त्याला सलाईनची नळी जोडून कारंजं करायचो.
शाई पेनांबद्दल (फाऊंटन पेनांबद्दल) खूप जणांकडून शिफारस, सल्ले येत. सगळे मोठे आणि काही बरोबरीचे मित्रही सांगत की शाईपेननं अक्षर चांगलं येतं. पण माझा आजतागायतचा अनुभव मात्र अगदी उलट आहे. मी खूप वेळा प्रयत्न केले की मी यावर खरं उतरावं, मलाही हाच अनुभव यावा, पण नाही....
एक मात्र आहे की माझं शाईपेनबद्दलचं आकर्षण काही कमी होत नाही. मला शाईपेननं लिहीतानाचा रसाळपणा आवडतो. शाईचा कागदावर उतरणारा ओलेपणा आवडतो. लिहीताना छान ओली असलेली शाई वाळताना पहायला आवडतं.
शाईपेनचे अनेक किस्से आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे मी शाईपेन खऱ्या अर्थानं वापरायला ७ वी-८वी पासून सुरूवात केली. पण शाईपेन वापरणं हे 'शाही' काम आहे असं माझं स्पष्ट मत झालं. हे पेन वापरायला कागद अगदी उत्तम प्रकारचाच लागतो. पेन ही अगदी उत्तम प्रकारचंच लागतं. तसं नसेल तर कागदावर शाई फुटणं, धब्बे पडणं हे प्रकार होतात..
माझ्या वह्यांचा कागद काही फार चांगला नसायचा.. मग ते 'भदाडं' (हा शब्द भाषेत आहत की नाही माहित नाही, पण मी तो वापरतो !) अक्षर अजूनच घाणेरडं दिसायचं. त्यात पेनही खूप ग्रेट नसल्यानं बऱ्याचदा शाई निबवर वाळायची आणि मग पेन झटकणं, झटकताना शिंतोडे उडणं, (कुठे कुठे अन् कसे कसे विचारूच नका). कधी कधी पेन जास्त शाई सोडायचं. मग आणखी 'भदाडं" अक्षर, आणखी मजा! टोपणात शाई जमा होणं, टोपणातून बाहेर येऊन कपड्यांवर डाग (पांढरा गणवेश!), सगळे हात शाईनं माखलेले!
निब आणि जीभ ॲडजस्ट करणं, ते करताना पुन्हा हात माखणं. हातानं जमलं नाही की दातात धरून प्रयत्न. मग ओठ आणि दातही रंगीत. मी जर माझ्या आई बाबांच्या जागी असतो तर रोज बदकावला असता मला! पेनांच्या निबही तुटायच्या आणि सुट्या निबही मिळायच्या! निबच्या खाली शाई वाहण्यासाठी 'चर' असायचे. जर पेन चालत नसेल तर ते चर ब्लेडने आणखी खोल करण्याचे प्रकारही आम्ही करायचो. पेनच्या निब मुद्दाम तिरक्या कापून कॅलीग्राफी करायला आम्ही मित्रांकडून शिकलो; फक्त याला कॅलीग्राफी म्हणतात हे माहित नव्हतं.
सगळ्यात मोठी पंचाईत म्हणजे खेळताना जर हे पेन खिशात असेल तर शाई बाहेर येऊन मोठ-मोठे शाईचे डाग 'पांढऱ्या -शुभ्र' गणवेशावर पडायचे! आणि एखाद्याशी भांडण झालं आणि खुन्नस काढायची झाली की मागे बसून त्याच्या पांढऱ्या शर्टवर शाई शिंपडायची! आयांना त्यावेळी आमच्याबद्दल काय वाटत असेल कोण जाणे...
मी जेंव्हा ७-८वीला होतो तेंव्हा 'चायना पेन' हा फाऊंटन पेनमधला लक्झरी प्रकार आला. ३०-३५ रू. किंमत होती तेंव्हा त्याची. निबचं फक्त टोक बाहेर दिसे. एअरोडायनॅमीक डिझाईन! निळसर-करडा रंग आणि शाई भरायला आतमध्ये 'इन-बिल्ट' ड्रॅापर. हे चायनापेन वाले आणखी काय काय करायचे. म्हणजे एकाची शाई संपली की दुसरा एक थेंब शाई 'इन-बिल्ट' ड्रॅापरने बाहेर काढी अन् पहीला ती 'इन-बिल्ट' ड्रॅापरने शोषून घेई!
शाई भरण्यावरून आठवलं. साध्या पेनमध्ये शाई भरणं हे एक कठीण काम आणि मोठं स्कील होतं. न सांडता शाई दौतीतून झाकणात आणि झाकणातून पेनात भरणं जमलं म्हणजे ग्रेट. ड्रॅापर वापरण्याचं नीट-नेटकं काम आम्ही कधी केलं नाही!
त्याच काळात कधीतरी रेनॅाल्डसचे निळ्या झाकणाचे पांढरे बॉलपेन आले. त्यांनीही हवा केली. पेन धरतो ते निळं कचकड्याचं अर्धपारदर्शक तोंड. ते निळे-पांढरे पेन गणवेशाशीच साधर्म्य साधत. रेनॅाल्डसचेच जेटर पेन नंतर आले, तेही वापरले.
दहावीला असताना कुठल्या रंगाची शाई वापरल्यावर पेपर चेक करणारे सर इंप्रेस होतील यावरही आम्ही चर्चा करायचो.
नगरला एक स्पेशल पेनचं दुकान होतं ( बॉंबे पेन सेंटर. तसं ते अजूनही आहे पण त्याची पूर्वीची शान आता नाही). तिथं अतिशय वेग-वेगळ्या प्रकारचे पेन मिळत. त्यांची स्वतःची पेन फॅक्टरी होती/आहे). मला तिथनं एक छानसं पेन घेतल्याचंही आठवतं.
नंतर कॅालेजला असताना 'सेलो ग्रीपर' आले आणि मी त्यांच्या प्रेमातच पडलो. अतिशय बारीक टोक आणि तशीच बारीक रेघ. माझं अक्षर सुधारलं ते तिथून!
अनेक पेनांच्या आठवणी झाल्या. अमेरीकेतल्या दूरच्या नातेवाईकांनी एक पेन पाठवलं होतं. वापरा अन् टाकून द्या प्रकारातलं, पण मला ते आवडलं. अक्षर/रेघ जाड जरी येत असेल, तरी लिहीताना अतिशय मऊ! त्याच्या शाईतही एक वेगळाच गडद पणा होता! असंच आणखी एका कुठल्यातरी नातेवाईकांनी कारट्रीज वालं फाऊंटन पेन दिलं होतं. तेही छान होतं, पण कारट्रीज संपल्यावर काय करायचं ते कळलं नाही आणि ते पेन तसंच पडलं. एक लाल रंगाचं पार्कर पेन मित्रानं दिलं होतं जे अनेक दिवस होतं माझ्याकडे. खूप भारी आणि म्हणून कमी वापरलं गेलं. पायलट आणि त्याच्या नंतर आलेल्या आवृत्त्याही मी वापरल्या पण दुसरीतला उत्साह राहिला नव्हता. काही वापरा अन् टाकून द्या प्रकारातले साधे पेन मी आणि बहिणीने खूप वापरले, त्यांच्या शाईच्या रंगासाठी.
नंतर काही फेल्ट पेनही वापरले. त्यांचं टोक झिजायचं अन् नविन बसवावं लागायचं. काही ग्लिटर पेनही वापरले! पण सेलो ग्रीपर ची जागा कुणीच घेऊ शकलं नाही.
शेवटी काही लहानपणीच्या खजिन्यातील. आजोबा कलाकार होते. त्यांच्याकडे वेगवेगळे पेन, बोरू, वेगवेगळ्या प्रकारचे रंग , ब्रश आणि तऱ्हे-तऱ्हेच्या पेन्सिलींचा खजीना होता. काही साध्या पेन्सिली पाणी लागलं की जांभळ्या व्हायच्या. मला आजही एका गोष्टीची सल मनात आहे आणि ती म्हणजे मी यातलं काहीच जपलं नाही. उलट नासधूसच केली. आजोबा मात्र यावरून कधी रागावल्याचंही आठवत नाही. आज वाईट वाटतं. पण क्षण हातातून निसटून गेलेले असतात.
मी आजही फाऊंटन पेन घेतो, एक वेडी आशा ठेऊन की माझं अक्षर चांगलं येईल, पण आजही ते खराबच येतं. (चांगल्यातलं पेन अन् कागद वापरूनही)!.
शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२
तांबट
माझा आवडता पक्षी कोणता असं कुणी विचारलं तर मी सांगेन तांबट. बऱ्याच जणांना तो माहितीही नसेल. त्याच्याशी नातं जुळलं माझ्या तारूण्याच्या संवेदनशील दिवसांत. इंद्रधनुष्यी दिवसांत. तसंच नातं जुळलं पांगाऱ्याशीही. आणि त्या दोघांनी माझ्या मनावर असा काही खोल ठसा उमटवला की तो कधीच मिटण्याची शक्यता नाहीय! ती एक अमूर्त भावना बनून राहिलीय. काही स्मृतींच्याही भावना होतात. प्रत्येक संवेदनशील अस्तीत्वाच्या अशा अनेक भावना असतील....व्यवहारी जगाने मान्यता दिलेल्या ५-६ भावनांच्या पलीकडच्या!
कॉलेजला होतो. सकाळचं कॉलेज (म्हणजे अगदी ७-७.३०). मी खिडकीशेजारी बसायचो. हिवाळ्याच्या दिवसांत कोवळं ऊन अंगावर घेत. तिसऱ्या मजल्यावर....
झाडांच्या, इतर ऋतूंत गच्च असणाऱ्या, आणि हिवाळ्यात निष्पर्ण होणाऱ्या फांद्या खिडकीतून दिसायच्या. टोकाची विरक्ती आणि सृजनोन्माद यांच्या सीमेवर समतोल साधणाऱ्या त्या फांद्यांबद्दल एक आकर्षण वाटायचं. तसंच आकर्षण मला दुपारी भीक्षा मागायला येणाऱ्या दोन साधूंबद्दलही वाटायचं. (बहिण तर मला आत्माराम म्हणून चिडवायची).त्यातल्या त्यात पांगाऱ्याचं झाड अन् फांद्या या परमोच्च स्थिती गाठायच्या!
अशा सकाळी, हवेत गारवा आणि ऊन्हात ऊब असताना, तांबटाची एकसूरी टुकटुक ऐकू येई. ही टुकटुक लहानपणापासून ऐकत आलेलो. तिचा ऊगम शोधायचा निरर्थक प्रयत्न बऱ्याच वेळा करून झाला होता. ह्या टुकटुकिचं साम्य लहानपणी ऐकलेल्या मोटेच्या इंजिनाच्या टुकटुकीशी वाटायचं.
कॉलेजात बसल्या बसल्या खिडकीतून नजर आपोआप शोध घ्यायला लागली...आणि सापडला! काय आनंद झाला होता तेंव्हा! एवढासा तो हिरवट-पिवळट जीव. जाडीभरडी चोच. चोचीजवळ मिशांसारखे चार दोन केस, डोक्यावर आणि गळ्यावर लाल टिळा! (वारकरी अबिर-गुलाल-बुक्का लावतात तसं वाटलं मला ते.) तसं पाहिलं तर रूढार्थानं त्यात सौंदर्य असं म्हणता येणार नाही...पण मला तो आवडला.
मला त्याची लकब आवडली. इकडून तिकडे झुलत झुलत टुक-टुक करण्याची. किती एकतानता त्या टुक-टुकीत. चोच न उघडता घशातून आवाज काढायची. कितीही वेळ त्याच सुरात ती टुक टुक चालू राहते. निवांत क्षणी, काही काम न करता ती ऐकत रहावी. तंद्री लागावी अशी. कुणाला ध्यान करायला प्रेरणा आणि वातावरण हवं असेल तर ती टुक टुक ऐकत रहावी. कुणा रसिकानं त्याचं नाव तांबट ठेवलं?
अगदी शहराच्या गदारोळातही शोधू गेलं तर सहज सापडणारी आणि सापडली की प्रयत्न करूनही साथ न सोडणारी. म्हणतात ना, मनापासून शोधलं तर इश्वरही सापडतो. त्याचाच प्रत्यय देणारी. तशीच एक गोष्ट अजुन आहे. रातकिड्यांची किर किर. तोच अनुभव. शोधलं तर सहज सापडेल अन् सापडली कि साथ सोडणार नाही. कुठं अन् कसं शोधायचं हे माहित हवं!
तो तांबट, त्याची ती लकब, अन् तो ज्या पांगाऱ्याच्या निष्पर्ण फांदीवर बसला होता, तिथं नुकतीच उमलू लागलेली लालचुटूक फुलं, अगदी त्याच्या गळा आणि डोक्यावरच्या लाल चट्ट्यांसारखी...ते दृश्य पाहत माझी तंद्री लागली. त्याच्या स्मृतींच्या भावना झाल्या. त्या भावनेत वैराग्य आहे, ऊन्मेष आहे, सृजनाच्या जल्लोषाची, नवनिर्माणाची, चाहूल आहे,एकतानता आणि ध्यान आहे, सगळं विसरायला लावणारं एक रिकामपण, रिक्तपण आहे....
कधी कधी ती मला माझ्या अस्तित्वाची देखील जाणिव करून देते.
शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०
प्लास्टीकच्या भावना
दिवाळीच्या सणासाठी बाजारपेठेत अनेक वस्तूंबरोबर सजावटी साठी प्लास्टीकची फुलं दिसली. मनात विचार आला, लांबून ही छान दिसतीलही, न सुकलेली, न कोमेजणारी, पण खरंच ती भावतील का? त्यांचं ते बेगडी ताजेपण खऱ्या फुलांचा स्पर्शाचा आनंद देईल का?खऱ्या फुलांची नजाकत त्यांच्यात येईल? आणि खऱ्या फुलांना सुगंध नसला तरी त्यांचा तो जिवंतपणाची जाणीव करून देणारा सुक्ष्म वास...त्याचं काय करायचं?पायदळी गेल्यानं सुकणाऱ्या, कोमेजणाऱ्या भावना महत्वाच्याच नाहीत का? त्याच तर माणूसपणाचं, जिवंतपणाचं आणि अस्तित्वाचं लक्षण आहेत ना ?
सणाच्या दिवशी वातावरणात प्रफुल्लता आणणारी ताजी फुलं दुसऱ्या दिवशी सुकतात आणि सणाच्या दिवसाचं महत्व अधोरेखीत करतात, सण संपल्याची जाणीव करून देतात, मनाला रूखरूख लावून जातात. महत्वाचंच नाही का ते?एखाद्या गोष्टीचा अभाव त्या गोष्टीचा भाव, अस्तित्व, उपलब्धतेचं महत्व ठसवून जातो.
ताजी टवटवीत फुलं अन् भावना सारख्याच नाहीत का? प्लास्टीकच्या भावना आपल्याला माणूस म्हणून जगू देतील?
शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०
जाणीवपूर्वक बदल....
हल्ली ऐकू येणाऱ्या कँसरच्या बातम्या,राहणीमानाशी निगडीत व्याधी, हे बरेच दिवस डोक्यात फिरत होतं. त्यातच अमितचं अकाली जाणं (माझा चुलत भाऊ, माझ्यापेक्षा लहानच, ३५-४०च्या दरम्यानचा)चटका लावून गेलं.
गेल्या वर्षभरात राहणीमानात जाणीवपूर्वक अनेक बदल केलेत. मुख्य म्हणजे ऑफीसच्या जवळ रहायला आलो....शहरापासून थोडं दूरच. जेंव्हा घर पहायला आलो तेंव्हा वाटलं होतं इतक्या आत रहायला जमेल का? कारण काहीही घ्यायचं झालं तरी दोन तीन कि.मी. तरी जावं लागतं. आजूबाजूला बरीच शेती. आणि लेआऊट (१२० एकर जागा) मधे जवळ जवळ ८०% जागा/प्लॉट रिकामे असल्यानं भरपूर मोकळी जागा. मी लहानपणी कॉलनीत राहात असताना असायची तशी. पण जसं राहायला आलो, तसं आवडायला लागलं....
ऑफीसच्या जवळ आल्यानं येण्या जाण्याचा वेळ वाचला. पेट्रोल वाचलं, प्रदूषण वाचलं....
मुलांना संध्याकाळी फिरायला नेणं सुरू झालं. शनिवारच्या आठवडी बाजारात (हो कारण हा अजूनही तसा खेडवळ भाग, इथं शहरीपणा आला असला तरी तो तसा नवखाच) जाणं सुरू झालं, ताजी भाजी, ताजी स्थानिक फळं आणनं सुरू झालं...बाहेरचं खाणं खूपच कमी झालं. नियमीत व्यायाम अन् आहार नियंत्रणानं वजन १३ किलोनं कमी केलं. आठवड्यातून एक दिवस ऑफीसला सायकल सुरू केली (जाऊन-येऊन २० कि.मी.)....
आजूबाजूला शेती असल्यानं आणि शहरापासून अलग असल्यानं, मोकळी आणि प्रदुषणमुक्त हवा हा मोठा फायदा!
सध्या राहात असलेल्या सोसायटीत पाणी रीसायकल केलं जातं आणि फ्लश साठी वापरलं जातं. त्याचं मानसीक समाधान बरंच मोठं आहे. ओला कचरा शेतात नेऊन टाकतो. त्याचं तिथे खत होतं. RO चं वाया जाणारं पाणी साठवून वापरायला घेतो.
मागच्या हिवाळ्यात तर एका गोष्टीनं आम्हाला चकित केलं. मागच्या बाजूच्या रस्त्यावर दोन वडाची झाडं आहेत. त्यांना फळंही आली होती. अचानक शेकडो पोपटांचा थवा तिथे मुक्कामी आला. रोज सकाळी बरोबर साडेसहाला तो प्रचंड कलकलाट करत उडायचा. आम्ही चहा घेत,पहाटेच्या (हिवाळा असल्यानं )संधीप्रकाशात ते पहायचो. उडायच्या आधी पंधरा एक मिनीटं ते चाचपडत झाडावरच कलकलाट करीत रहायचे, मग उडायचे.
पावसाळ्यात कित्येक वर्षांनी काजवे पाहिले. एक काजवा चुकून गच्चीत आला होता. तो सापडल्यावर नजर शोध घ्यायला लागली आणि पलीकडच्या झाडीत अनेक काजवे दृष्टीस पडले.
कुंपणाबाहेरच्या एका झाडावर शिंजिरनं केलेलं घरटं अदितीने पाहिलं. मग तो कसा घरट्यात येतो, कसा अंडी ऊबवतो, पिलं अंड्यातून बाहेर आल्यावर कसं त्यांच्यासाठी खाऊ आणतो, पिलं कशी किलबिलाट करतात हे सगळं पहायला मुलांनाही मजा आली. पावसाळा सुरू झाल्यावर ठिपकेवाल्या मुनियाची घरट्यासाठी चाललेली लगबग,त्याचं ते हिरवीगार लंबलचक गवताची पाती घेऊन येणं, येता जाता समोरच्या तारेवर विसावणं, हे पाहण्यात सुद्धा मजा होती!
निनादला घेऊन दर शनिवारी/रवीवारी सायकलवर जाणं सुरू केलं आणि त्या वडाच्या दोन झाडांपैकी एका वडाला बिलगलेल्या सायलीचा वेलही सापडला. जवळची वाडी ओलांडून गेलं की केळीची आणि नारळाची बाग सापडली. नारळाच्या बागेत फणस, आंबा आणि इतरही अनेक झाडं आहेत. दरवेळेस काहीबाही फळं मिळायला लागली.
आजूबाजूच्या शेतीत नाचणीचं पीक घेतात. काही शेतांमध्ये झेंडू, शेवंती, गुलाब अशी फूलशेती होते. काही ठिकाणी कोबी, कोथिंबीरही लावतात. हे सगळं मुलंना दाखवता आल्याचं समाधान मोठं आहे.
संध्याकाळी फिरायला जाताना एकदा मोठा विंचू दिसला. मुलांना केवढा आनंद. पुण्या-मुंबईत तर आता दिसणारही नाहीत विंचू. सूर्योदय-सूर्यास्त देखील नेहमी पाहता येतोय . गर्द निळ्या पार्श्वभूमीवर चंद्रोदय, शुक्राची चांदणी, गुरू, मंगळ हे किती छान दिसतात ना! जाणीवपूर्वक या गोष्टी अनुभवतोय, मुलांचं अनुभवविश्व समृद्ध करतोय....
हे सगळं किती दिवस असं राहील माहीत नाही पण अजुनही बदल करायचेत. फक्त माझ्यासाठी नाही तर समाजासाठी देखील. त्यातला एक सोपा प्रयत्न म्हणजे झाडं लावणं. सध्याच्या परिस्थितीत बांबू माझं लक्ष वेधून घेतो. त्याचा वाढण्याचा वेग आणि हिरवाई निर्माण करायची ताकद अफाट आहे. बघुया कधी ते अंमलात आणता येतंय..
बऱ्याच गोष्टी उमगायला लागल्या ज्यांच्याकडे कित्येक वर्षं दुर्लक्ष केलं जात होतं; जसं आयुष्यात थोडं थांबणंही आवश्यक आहे. थोडा विसावाही गरजेचा आहे. प्रवासात नाही का, एखाद्या ठिकाणी पोहोचायची घाई केल्यानं प्रवासाचा खरा आनंदच घेतला जात नाही. आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य अनुभवायचं राहूनच जातं. नंतर करू, नंतर करूच्या नावाखाली आवडत्या गोष्टी केल्या जात नाहीत अन् तो नंतर कधी येतच नाही. थांबायला हवंय, आवडीच्या गोष्टी करून त्यातला आनंद मिळवायला हवाय. मला तर वाटतं आपल्या जीवनाचा प्रचंड वेग अन् न थांबण्याची वृत्ती याच आपल्या दुःखाचं आणि ताण तणावाचं कारण आहे. हे मिळवायचंय म्हणत छाती फुटेस्तोवर धावणं जे प्रचलनात आलंय तेच थांबायला हवंय.. असो. बदल करायचेत अन् करत रहायचेत. ही जाणीव जी झालीय ती महत्वाची आहे.
मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७
रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६
आपण रासायनीक झालोयत...
सकाळी उठलं की दात घासायला रासायनीक पेस्ट. मग रासायनीक साबण, शँपू वगैरे ने अंघोळ. कपडे धुवायला वेगवेगळ्या रासायनीक पावडरी. मग वेगवेगळ्या रसायनांचे थर चेहरा आणि केसांवर चोपडणं. कृत्रीम सुगंधी रसायनांचे अंगावर फवारे (फेरोमोन्स शी साधर्म्य साधण्याचा प्रयत्न करणारे आणि आणि अंगच्या वासाबरोबर आपली ओळख ही लपवून ठेवणारे).
खाण्या-पिण्यात प्रिजर्वेटिव्ज....म्हणजे रसायनं. जरी साधं जेवलं तरी रासायनीक किटकनाशकांचे, खतांचे अंश येतातच. त्यांना कसं थोपवणार ? कृत्रीम रासायनीक स्वादांची तर रेलचेल !
औषधांमध्ये विटॅमीन्सचा भरमार (यातील बराच अंश शरीराला न लागणारा अन टाकून दिला जाणारा), हॅार्मोन्स इ. इ.
भांडी घासायला रासायनीक साबण (फारशी खराब झाली नसली तरी), फरशी़ धुवायला अशीच अनेक रसायनं). टॉयलेट क्लीनर्स तर विचारूच नका.
डास पळवून लावायला, झुरळं मारायला, उंदीर मारायला वेगवेगळी विषं.... यादी खूप मोठी होईल...
याचे काय कसे आणि किती परिणाम आपल्या शरिरावर होतात किंवा वर्षानुवर्षांच्या वापराने होऊ शकतात याचा विचार कोण करतो?
ही सर्व रसायनं सांडपाण्यात मिसळून नद्या, तळी अशा ठिकाणी साठत जातात. भूजलात मिसळतात. अन पिण्याच्या पाण्यावाटे पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश करतात. मग यातल्या काही गोष्टी आपण वापरत नसलो तरीही.
आणि हे सर्व जाहिरातींनी हळूहळू आपल्यावर थोपवलेलं. आपला ब्रेन वॅाश केलेला. म्हणजे हे काही वापरलं नाही तर आपण किती मागास नाही तर अस्वच्छ आहोत हे सांगत.
या सर्व गोष्टींना नैसर्गीक पर्याय असताना?
फक्त वीस-तीस वर्षांपूर्वी या सगळ्या गोष्टी किती कमी होत्या?
बुधवार, २४ डिसेंबर, २०१४
नातं
तसं मातीशी तरी कुठं राहीलंय नातं? तीही तर परकीच झालीय ना. कुठे तरी तिसऱ्या मजल्यावर अधांतरी जगायचं....खाली मातीवर सहा इंचांचा काँक्रीटचा नाहीतर डांबरी थर.
नावं, ओळखीच्या खुणा, लकबी, लांब राहून कालांतराने अपरिचीत व्हायला लागतात तसं. आणि मग चेहरेही अपरिचीत होतात.
कुठं ते तासन् तास छतावर कुडकुडत तारे पाहत जागणं, नावांनिशी नक्षत्रं, तारे हुडकणं, चिखलांतून गज खुपसा-खुपशी खेळत अंतराचं भान विसरून हुंदडणं...
केंव्हा भरले होते शेवटचे मातीने हात? केंव्हा पाहिले होते शेवटचे डोळेभरून तारे आणि केंव्हा शेवटची जाणीव झाली होती माणसाच्या क्षुल्लकपणाची या अफाट विश्वात?
शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०१४
कुकीज्
झाडू, शिडी, आणि नंतर अनेक क्लृप्त्या! लहान मुलांची अफाट कल्पनाशक्ती कशी असते ते, ॲनिमेटेड असल्याचा फायदा घेत क्लृप्त्यांच्या रुपाने समोर येत राहतं. इतका सुंदर व्हिडीओ आपल्यातल्या बाल्याला आव्हान देत खिळवून ठेवतो. त्या डुकराच्या चेहऱ्यावरचे सर्व भाव तर अप्रतिम!
पण हे नव्हतं सांगायचं. तो व्हिडीओ खूप आधी पाहिला होता! पण यावेळी तो जास्त खिळवून ठेवणारा ठरला! का बरं?
आता त्या व्हिडीओत कुणीतरी पार्श्वसंगीत म्हणून एक गाणं टाकलं होतं. भाषा माहित नाही पण गाणं एका लहान मुलीच्या आवाजात होतं आणि अगदी चपखल बसत होतं. जणू याचसाठी आहे हे गाणं. त्या पिलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव जणू गाण्यातून व्यक्त होतायत. त्या डुकराचं नाव ऑर्मी! (डिस्नेचंच पिलू!)
शोध घ्यायचा प्रयत्न केला तेंव्हा क्लिओपात्रा स्ट्रॅटन नावाच्या एका गोड मुलीचा अल्बम आणि ते गाणं सापडलं. ती भाषा बहुतेक रोमानियन आहे. त्याच मुलीची आणखी काही गोड गाणी तिच्या नावाने शोधल्यावर सापडली. युरेका! मी सगळ्या व्हिडीओच्या लिंक खाली देत आहे. आवडल्यास जरूर सांगा!
१. http://www.youtube.com/watch?v=vyZ9izU85_Q
२. http://www.youtube.com/watch?v=dS1Gf7qq2sI
३. http://www.youtube.com/watch?v=OY1vv7hQQCg
त्या गाण्याचं सार जे मला समजलं ते असं. मी एका बाटलीतून खिडकीतल्या झाडांना पाणी घातलं आणि उरलेलं आमच्या माऊला दिलं आणि माऊ गायला लागली. मग मी थोडं पाणी माशांना पण दिलं. त्यांनी पण शांत न राहता गावं म्हणून!. त्या बाटलीत काय होतं कोण जाणे!
फक्त परसातली बदकं मात्र शांत होती ती शांतच राहिली. उद्या काय होईल कोण जाणे पण आता तर मजा आहे ना! तशी आणखी एक बाटली मिळायला हवी!सकाळपर्यंत मात्र सगळे गातच राहिले!!!
शुक्रवार, १ ऑगस्ट, २०१४
बोलकी ढलपी
काही नाही, चेकबुक सापडत नव्हतं म्हणून पुर्ण ड्रॉवर काढला आणि त्यात अनेक कागद, चिठोऱ्या, बिलं सापडली...बरीच जुनी. काही फक्त बिलं, कारण त्यांच्यावरून दुसरा कुठलाही संदर्भ लागत नव्हता. नुसते आकडे. पण काही मात्र लांबलचक गोष्टी सागत होती.
हे होम नीडस फर्नीचरचं बिल. 'बायको'ला शिवण मशिन ठेवायला कपाट कम टेबल आणलं पण ती जागा पटकावली फिश टँकने. त्यावेळी बरेच मासे काचेच्या बाऊल मध्ये होते, काही (मित्राने घर सोडून जाताना दिलेले) चक्क बादलीत होते. फिश टँकला प्राधान्य मिळालं अन् त्याने जी जागा पटकावली ती आजपर्यंत. शिवण मशीन अजून जागा शोधतंय. दोन वर्षं झाली त्याला.
घराच्या बांधकामाचं कोटेशन... किती सोपं वाटलं होतं तेंव्हा घर बांधणं...पूर्ण घर बांधण्याच्या एक वर्षाचा कालावधी सरकला डोळ्यांसमोरून. आर्थिक, मानसीक, शारिरीक ओढाताण... हैदराबाद वरुन घरी केलेल्या चकरा, अनेक वेळा घ्यावे लागलेले निर्णय, काही चुकलेले, काही अचूक. आई-बाबांना घालाव्या लागलेल्या चकरा...आणि बांधकाम पूर्ण झाल्यावरचं समाधान. सोबतच घरासाठी, बाथरुमसाठी टाईल्स निवडताना त्यांच्या डिझाईन्सची लिहून घेतलेली पन्नास एक नावांची लिस्ट. त्यातल्या टाईल्स घेतल्या नाहीतच कारण बजेट खूप वाढलेलं... नंतर कसाबसा पेललेला आणि आधीचं कोटेशन पाहताना अंदाजही न आलेला खर्च... खरंतर आता कोटेशन पाहताना वाटतं की हे म्हणजे हत्तीची फक्त सोंड पाहण्यासारखं. खऱ्या हत्तीचा कसा अंदाज यावा...
दूध, साखर, तांदूळ,उदबत्ती...अशी यादी..
कपड्यांचं बिल. मागच्या वाढदिवसाच्या दिवशी घेतलेले कपडे
प्रेस्टीज चं बील. त्यावेळी एक्सचेंज चालू होतं. मग काय, जो बिवीसे करे प्यार वो प्रेस्टीज से कैसे करे इन्कार... तसंही सौंना कढया फार आवडतात.
एक इमर्जंन्सी लाइटचं बिल. आता इन्वर्टर घेतलाय.
एक चांदीच्या चमचा वाटीचं बिल. समोरच्या हारुण चा पहिला वाढदिवस. समोर आजी-आजोबा राहतात. त्यांचा नातू. आजी आजोबांचा मुलगा आणि सून सिंगापूरला. तिथे पाळणाघरात विशिष्ट वयाच्या आतील मुलं घेत नाहीत. आजी आजोबांनी हारूण आणि त्याचा मोठा भाऊ अर्णव दोघांनाही सहा महिन्यांहून जास्त सांभाळलं. वाढदिवसाचा कार्यक्रम जोरातच झाला पण त्यातच त्यांच्या मुलाने अन सुनेने आजी आजोबांच्या लग्नाचा वाढदिवसही केला. सर्वांसाठीच तो सुखद धक्का होता!
एटीएम मधून पैसे काढल्याच्या पावत्या, खूप दिवस राहून कोऱ्या झालेल्या. पैशांचा, काढलेल्या रकमेचा निरर्थकपणा सांगणाऱ्या.
एक लगेजच्या दुकानाची पावती. जर्मनीला, पहिल्या परदेशवारीला जाण्यासाठी तिथून बॅगा घेतल्या होत्या. त्याबरोबरीने केलेली गरम कपड्यांची खरेदी..आणि त्याआधीच्या वर्षी जायची हुकलेली संधीही आठवली.पासपोर्ट हरवलेला होता तेंव्हा. कसा हरवला ह्याची तर चित्तरकथाच.एका पावतीवर एकमेकांना जोडलेले असे सुखाचे अन् दुःखाचे क्षण एकदम वर आले.
सौंनी सुरू केलेल्या एरोबीक्स क्लासचीही पावती सापडली...त्या क्लासच्या गंमती सौ सांगायच्या.त्यांचे शनिवारच्या स्पेशल क्लासचे एसेमेस माझ्याच नंबरवर यायचे.
पगारात कसं भागवायचं यासाठी पगाराची रक्कम अन् खर्च यांची केलेली आकडेमोडही सापडली.
रकमा लिहून सही करून ठेवलेले बिननावाचे चेक सापडले. आता बादही झाले होते. पण काही केल्या आठवत नाही कशासाठी ते लिहून ठेवले होते ते....
हिंदू पेपरची पावती. त्यावरून आठवलं. इथं राहायला आल्यावर लगेच एक मुलगा पेपरची सहा महिन्यांची स्कीम घेवून आला होता. पेपर तर घ्यायचा होता पण शिफ्टींग व इतर गोष्टींमुळं पैसेच शिल्लक नव्हते. आईने तिच्याकडचे दिले होते.
तारामती बारादरीचं तिकीट. पौर्णिमेच्या संध्याकाळी रंगलेला शास्त्रीय नृत्य अन् गायनाचा कार्यक्रम.एकीकडे संध्याप्रकाशात चंद्रोदय अन् दुसरीकडे रंगत जाणारा कार्यक्रम. मागे बारादरीची ऐतिहासीक वास्तू. तिथेच काही अरबी संगीत वाद्यंही ऐकायला मिळाली. त्यांची शास्त्रीय संगीताशी जुगलबंदीही ऐकायला मिळाली अन् त्या वाद्यांवर काही हिंदी गाण्यांच्या धून ही ऐकायला मिळाल्या.
अशी ही बोलकी ढलपी बोलायला लागली की काम बाजूलाच, आपण वेगळ्याच विश्वात अन् वेळेचा पत्ताच नाही....
ती जाहिरात आठवते, ज्यात आजोबा डास शोधत असतात आजीशी लागलेल्या पैजेप्रमाणे अन् त्यांना त्यांच्या कॉलेजचा फोटो सापडतो (किंवा आजींचं लक्ष वळवण्यासाठी ते शोधून काढतात!). तसंच काहीसं हे.
गुरुवार, २४ जुलै, २०१४
बाजारातली चक्कर....
ठरवूनच गेलो होतो की आज फक्त फोटोग्राफी करणार. अन् लेन्समधून किती चेहरे त्यांच्या वैशिष्ट्यांसकट उभारले.
बाजाराच्या समोरच्या भिंतीवर पागोटेवाला शेतकरी आणि डोक्यावर पदर घेतलेली शेतकरीण रंगवलेले.
भाजीवाल्यांची लगबग होती. सर्व शेतकरीच. कपड्यांबद्दल सर्वांचं एकमत. ते फक्त लज्जारक्षणार्थ आहेत. आणि ते घातल्यावर स्वतःला सुटसुटीत मोकळं वाटायला हवं.
चेहऱ्यांवर नैसर्गिक हास्य आणि समाधानाचा मेक-अप. माणुसकी आणि आपुलकी प्रत्येक कृतीत ओतप्रोत. अगदी घासाघीस करतानाही. हिरव्यागार अन् टवटवीत भाजी सारखी हिरवीगार अन टवटवीत मनं...
रापलेले, सुरकुतलेले, करपलेले, तरीही प्रफुल्लीत चेहरे. तंबाखू, मिश्री, पान यांमुळे रंगलेले पण निखळ हास्यातून सुंदर दिसणारे दात. पुरूषांची खुरटलेली पांढरी होणारी किंवा झालेली दाढी-मिशी, स्त्रीयांच्या नाकातला एखादाच चमकीचा खडा, एखादाच जडसर दागिना...
अगदी सकाळीच गावाकडनं निघावं लागत असल्यामुळे थंडीसाठी एखादी शाल किंवा अगदी टाॅवेलसुद्धा डेक्याला गुंडाळलेला, पुरूषांनी डेक्याला मुंडासेवजा फेटा गुंडाळलेला...
पुरूषांनी अंगात बंडी अन् धोतर घातलेलं...
किती बारीक-सारीक गोष्टी लेन्समधून समजत होत्या....
विक्रीबरोबरच एकमेकांचे पाय खेचून हसणं, गप्पा अन् विनोदबुद्धीने बाजार जास्त खुलला होता....
ज्यांना मी कॅमेऱ्यासकट दिसत होतो त्यांच्या डोळ्यांत कुतूहल होतं, कौतुक होतं, थोडं बुजरेपण होतं, उद्याच्या पेपरात फोटो येणार याचा विश्वास होता...ते पेपर वाचणार नव्हते तरीही....एक हसू फुटत होतं.
एकाने शेजारच्या भाजीवाल्याला चिडवत सांगितलं की आता सगळ्यांना कळणार तू भाजीवाला आहेस म्हणून!
दुस-याने शेजारच्या बाईची फिरकी घेत सांगितलं... यांचा काढा फोटो, या सावकार आहेत!!!
काही चेहरे निर्विकारही होते. स्वतःच्या मनोराज्यात रमलेले.... काहींना विक्रीची काळजी दिसत होती... हमाल शेतकऱ्यांची पोती वाहून नेण्याचं काम करत होते... त्यांचा धंद्याचा टाईम होता....
चिमण्याही सांडलेले स्वीट कॉर्नचे दाणे पळवत होत्या, घरट्यासाठी कणसातले मऊ धागे पळवत होत्या.
१५-२० मिनीटांत किती पाहीलं लेन्स मधून जे इतर वेळी उघड्या डोळ्यांनीही पाहत नाही...
बुधवार, २५ डिसेंबर, २०१३
रविवार, ३० जून, २०१३
बोचरे काटे.
आईच्या मागून एकामागे एक रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना ट्रकच्या चाकाखाली आलेली कुत्र्याची पिलं आणि त्यांच्या निष्प्राण देहाकडं बघत रस्त्याकडेला बसलेली त्यांची आई....
रेल्वे स्टेशनवर कित्येक वर्षे उभी असलेली, त्यांच्यावरील घरट्यांसकट जमीनदोस्त केली गेलेली झाडं....
रस्त्यावर कुत्ते की मौत मेलेल्या कुत्र्याच्या रक्त, हाड, मांस यांचा चिखल....
तलावांमध्ये ढकलला जाणारा कचरा, रस्त्यावरील खड्डयांत साचलेल्या मैला पाण्यातून जा - ये करणारी हजारो वाहनं...
कंपनीत लावलेल्या नोटीस बोर्डवर वाया जाणा-या अन्नाचा चढता आलेख अन् कुणीतरी कच-यात फेकून दिलेलं अन्न बोटे चाटत खाणारी अस्तित्वशून्य व्यक्ती......
सगळीकडे डोळेझाक करून फिरणारे आपण आणि वरचेवर असंवेदनशील होत असल्याची जाणीव असणारा मी.
शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२
आरोळी....
सकाळीच एक हातगाडीवाला यायचा. 'मठाची भेळ' असं म्हणत. मला प्रश्न पडे, मठाची असं का म्हणतो तो? नंतर कळालं की मटकीला मठ असंही म्हणतात. त्याच्याकडे सर्व मोड आलेली कडधान्ये असत.
नंतर "रद्दी-पेपर, डब्बा-बाटली, लव्वा-लोखंडवाला" अशी आरोळी येई. ही आरोळी सर्वव्यापीच असावी असं वाटतं. प्रत्येक भागात त्या-त्या भाषेत, पण तरीही ओळखू येणारी. इथं हैदराबादेत पेपर-पेपर अशी टिपीकल आरोळी शनिवार-रविवार दिवसभर तासा-तासाने ऐकू येते. याच्याबरोबरीनेच "डबे बनवणार, डबे निट करणार," आणि आणखी बरंच काही बनवणार आणि नीट करणार असं सांगत पत्र्याच्या वस्तूंची कामं करणाराही येऊन जायचा.
'जोग' एवढा एकच शब्द उच्चारत एक जोगवा मागणारा यायचा. आणि दोन गोसावीही यायचे. त्यातला एक दारात येऊन शंख वाजवायचा आणि दुसरा एक पाय नाचवत कमरेला, गळ्यात अडकवलेली मोठमोठी घुंगरं वाजवायचा. यांची वेळ आणि गृहिणींची स्वयंपाकाची वेळ बरोबर साधे.
मग 'साडे-साडे' अशी आरोळी येई. सायकलच्या मागे लेदर फिनीशची ब्रिफकेस, त्यात साड्या. दुपारी बारा ते दोन पर्यंत असे चार पाच जण येऊन जात. सगळ्यांची आरोळी मात्र एकच एक ठरावीक. वेळ अशी साधायचे की सगळ्या गृहिणींची कामे होऊन त्या जरा स्वस्थ बसलेल्या असतील. तीन-चारच्या सुमारास "चिंध्या हेत का बाई" असं म्हणत बोहारीण यायची. आजीची ठरलेली बोहारीण अजून लक्षात आहे. दोघींना हुज्जत घालण्यात काय सुख मिळे कोण जाणे... कारण त्या जीव लावून हुज्जत घालीत आणि एकदा बोली ठरली की दोघीही संतोषाने पुढच्या कामाला लागत.
"अल्याची वडी लेपाक" असं म्हणत ॲलुमिनियम च्या थाळीत सोनाराकडे मिळतो तशा लाल कागदात गुंडाळलेल्या आलेपाकाच्या वड्या आणि त्याच थाळीत काजळी-धूर सोडणारी मोठी चिमणी असं घेऊन एक जण यायचा. चिमणीच्या प्रकाशात त्याची खुरटलेली पांढरी दाढी दिसायची. ती नेहमी तेवढीच खुरटलेली असायची.
परळीला असताना रात्री दहा-अकरा वाजता (खरं तर तशा गावात ती मध्यरात्र) खारे शेंगदाणेवाला यायचा. एकदम मजेशीर प्राणी. कैलास-वैजनाथ खारमुरे अशी त्याची आरोळी रात्रीच्या शांत वातावरणात अख्ख्या कॉलनीत घुमायची. त्यानंतर तो गाणंही म्हणायचा. पूर्ण आठवत नाही, पण एक ओळ पक्की लक्षात बसलीय.
"वैजनाथाच्या पिंडीवर नागोबा डोलतो, आक् ऊक् आक् ऊक्"
आणि असं म्हणत हाताने नागाची फडी करून ती डोलवायचा आणि जमलेल्या मुलांपैकी एखाद्याला फुस्स करून घाबरवायचा.
"आगिनगालीचं तिकीत काला, गालीत लवकल बता" असं बोबडं गाणं म्हणून भिक मागणारी भिकारीण लक्षात आहे. असं अनोखं गाणं म्हणून भीक मागणारं कुणी दिसलं नाही पुन्हा.
आताशा अशा आरोळ्या ऐकायला मिळत नाहीत. काही काळाबरोबर गडप झाल्या असतील... दिवसाचे सक्रीय १० तास ऑफिसमध्ये घालवल्यामुळेही ऐकायला मिळत नसतील....
पण आता आरोळ्या ऐकल्या तरी त्यांची नक्कल करण्याची मजा घेता येत नाही कारण आता निरागसपणा राहिला नाही, आणि त्या आरोळ्यांंमागचे कष्टही समजतात. पण परवा खालच्या छोट्या साईने 'पेपर-पेपर' ची नक्कल केली तेंव्हा मी आणि अदिती ऊस्फुर्त हसलो.
या आरोळ्यांनी आपलं अनुभवविश्व समृद्ध केलंय खरं...
शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२
मुनीयांचं घरटं
मग घरट्यासाठी म्हणुन एक मातीचं बोळकं बाल्कनीच्या जाळीत अडकवलं. तिकडेही कुणी फिरकेना...आणि एक दिवस अचानक मुनिया दिसले. आम्हाला खूप आनंद झाला. ते बहुतेक आम्ही दोघे ऑफीसला गेल्यावर येत असावेत. मग आम्ही एक मक्याचं कणीस अडकवून ठेवलं. तिकडे यांनी ढुंकूनही पाहीलं नाही. अधून-मधून पाहणी करून ते जात.
मग एक दिवस अचानक गवताचं पातं घेवून एका मुनियाला मी उडताना पाहीलं. तो बाल्कनीत आला नाही तर आमच्या बाल्कनीच्या बाजूच्या मोकळ्या जागेतून वर गेला. आमच्या इमारतीला प्रत्येकी दोन फ्लॅटच्या मध्ये मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत खिडक्या उघडतात.
मुनियांच्या आधीच्या निरिक्षणावरून हे माहित होतं की यांना घरट्यासाठी लांब हिरवीगार गवताची पाती लागतात.
मी बाल्कनीतून वाकून पाहिलं तेंव्हा लक्षात आलं की आमच्या वरच्या मजल्यावरच्या घराच्या ए.सी. चा ब्लोवर ज्या ठिकाणी बसवला आहे त्याच्या आणि भिंतीच्या फटीत यांचं घरटं बांधणं सुरू होतं. बाल्कनीच्या बाहेरच विजेच्या तारा आहेत, त्या ठिकणी घरट्यातून येता जाता हे विसावा घेत. घरट्याची जागा तर जाम सुरक्षीत होती.
यथावकाश घरटं पूर्ण झालं, पिलांचा आवाज यायला लागला, आवाजाचा किलबिलाट आणि मग कलकलाट होऊन एकदम शांतता झाली तेंव्हा लक्षात आलं की पिलं उडूनही गेली.....
पिवळं पडलेलं घरटं सुनं झालं.
काही दिवसांनी बाल्कनीत चिमण्या घुटमळायला लागल्या. बायकोने लावलेला पुदिना यांनी मटकवायला सुरूवात केली. म्हटलं ठिक आहे, फक्त इथे घरटं बांधा. काही दिवसांनी लक्षात आलं की या चिमण्यांनी त्या मुनियांच्या घरट्याचा ताबा घेतला होता!!! म्हटलं बऱ्याच हुशार आहेत.
त्यांच्याही पिलांचा आवाज यायला लागला, आवाजाचा किलबिलाट आणि मग कलकलाट होऊन एकदम शांतता असं सगळं झालं. पण त्यांची पिलं उडून जाताना मी पाहिली. एक पिलू खिडकीवर येवून विसावलं, एक बाल्कनीत विसावलं, मग खाली गेलं. दुसऱ्या दिवशीही एक पिलू दिसलं.
त्यानंतर लगेच चिमण्यांची दुसरी वीणही तिथेच झाली!!!
या वर्षी मुनियांची अतुरतेने वाट पाहत होतो. पहायचं होतं काय होतं ते. पावसाळा सुरू झाल्यावर एक दिवस मुनिया दिसले ! या वर्षी वेली तर नव्हत्या बाल्कनीत पण झाड झाडोरा चांगला होता. या वर्षी गवती चहाही लावलेला! घरट्याचं प्रकरण मुनियांच्या लक्षात आलं असावं कारण तिकडे जाताना ते दिसत नव्हते.
काही दिवसांत चिमण्यांची आणखी एक वीण त्याच घरट्यात झाली.....
मुनिया अधून मधून दिसत पण घरटं कुठे बांधलंय याचा अंदाज येईना, मात्र गवती चहाची पाती हळूहळू कमी होताना दिसू लागली....
म्हणजे यावेळी मुनियाचं घरटं सुगंधी आहे तर!!!
हाच तो मुनिया!
शनिवार, ९ जून, २०१२
सायकल
आम्ही त्यावेळी माजलगाव जवळच्या इरिगेशन कॉलनीत राहायचो. बाबा नगरहून नवी सायकल घेऊन येणार होते. खूप उशीर झाला त्यांना यायला संध्याकाळी. बसच्या टपावर टाकून ते सायकल घेऊन आले होते. आणि मग माजलगावहून चालवत. चांगलं १०-१२ कि. मी. चं अंतर असावं. त्यात चढ. (आधीची सायकल चोरीला गेली होती. ती आजोबांची होती ...) मी आणि माझं मित्रमंडळ बाबांची वाटच पाहत होतो. केवढं कुतूहल होतं येणा-या नव्या सायकल बद्दल... आणि सायकल आल्यावरचा हर्ष.....कॉलनीत जेवढे ओळखीचे होते, तेही आले होते सायकल पाहायला. त्यांनाही केवढं कौतुक, कुतूहल... कोणत्या कंपनीची आणली.... केवढ्यात बसली वगैरे.....
आणि मग या नव्या सायकलवर माझं शिकणं सुरु झालं. पाय पुरणं तर शक्यच नव्हतं. मग आधी डावा पाय डाव्या पॅडल वर ठेवून उजव्या पायाने वेग घ्यायचा. असं बरंच अंतर जावं लागे. मग बऱ्यापैकी वेग आलाय असं वाटलं कि पटकन उजवा पाय सायकलच्या त्रिकोणी फ्रेम मधून पलीकडे टाकायचा. इथेही पॅडल पूर्ण मारताच यायचं नाही. मग अर्धं पॅडल मारत मारताच सायकल चालवायची... हे सर्व चालू असताना बाबा आधी मागून सीटला धरून पळत, आणि मग मध्येच कधीतरी सीट सोडून देत, पण मागेच पळत राहत. असं मी त्यांना खूप पळवलंय. शिकायला फार दिवस लागले नाहीत. पण मग रोज बाबा ऑफिसमधून आले कि सायकल पळवायला न्यायचो. अख्या कॉलनीत सायकल पळवायचो. मित्रांबरोबर अशी "कैची" पद्धतीने सायकल चालवायच्या शर्यतीही व्हायच्या. गुडघे तर कित्येक वेळा फुटायचे. आणि त्या सायकलचे तर पाडून पाडून एवढे हाल केले कि सायकल दुकानदार सर्व्हीसिंगच्या वेळी ही नवी सायकल आहे यावर विश्वास ठेवायलाच तयार होईना.
आजोबाही सायकल चालवायचे हे माहित होतं. त्यांना सायकल चालवताना मात्र कधी पाहिलं नाही. पण त्यांच्याकडे दोन लोखंडी क्लिप होत्या. त्या म्हणे पँट चेन किंवा चाकात अडकू नये म्हणून पँटला लावून सायकल चालवायचे.
बाबा आम्हाला कुठेही बाहेर घेवून जायचे ते याच सायकलवर. सायकलच्या त्रिकोणी फ्रेमच्या आडव्या दांडीवर सीट बसवलं होतं आणि पुढच्या चाकामागच्या दांडीवर पाय ठेवायला पट्टी. मी मागे कॅरिअरवर बसायचो तर छोटी बहिण पुढच्या सीटवर. मी सायकल शिकल्यावर बहिणीला बसवून न्यायची भारी हौस. ती नको म्हणत असताना तिला सायकल वर बसवून चक्कर मारायला गेलो आणि दोघेही पडलो. तेंव्हापासून तिने माझ्याबरोबर डबलसीट बसायचा धसकाच घेतला..
एकदा मामाकडे गेलो होतो. तिथे एक रु. वर एक तास अशी भाड्याने सायकल आणून खेळायचो. अशीच एकदा ही सायकल घेऊन फिरत होतो. सायकलला ब्रेक नव्हते. एका म्हातारीला जाऊन धडकलो. ती कळवळून म्हणाली, टाका बाबा मारून तू तरी म्हणजे सुटेन एकदाची...
भाड्याच्या सायकलचे असे किस्से नेहमी व्हायचे कारण त्या कधीच नीट मेंटेन नसायच्या.
दर आठवडे बाजाराला बाबा मला सायकलवर बसवून न्यायचे. येताना भाजीपाल्याने अन फळांनी गच्च भरलेल्या दोन पिशव्या हँडलला असायच्या.
एक दोनदा तर भयंकर वादळातून आमची सायकल फेरी निघाली. म्हणजे ओपन थेटर मध्ये आम्ही पिक्चर पाहायला गेलो अन वादळ आणि पाऊस सुरु झाला. पिक्चर तसाच सोडून उठावं लागलं. बाबांना सायकल चालवणे मुश्कील झाले. शेवटी ते खाली उतरले आणि ढकलत घरापर्यंत सायकल आणली.
आणि सायकलचंं पंक्चर काढताना पाहायला तर भारी आवडायचं. रबर चिकटवायच्या सोलुशनची लाल पिवळी ट्यूब आणि त्याचा तो वास अजून आठवतो. आन ते लाल जेल सारखं सोलुशन हातावर पापुद्रा येईपर्यंत वाळू द्यायचं आणि तो पापुद्रा काढायचा हा आवडता खेळ. कधी कधी वाटतं कि एवर युथ ऑरेंज फेसपॅकची कल्पना याच्यावरून सुचली कीं काय.
सायकललाही छान सजवायची पद्धत होती (हे प्रत्येकाच्या शौक नुसार !!!) . मुठींना झिरमिळ्या असायच्या....कुशनचे रंगीत सीट कव्हर असायचे. सायकलच्या चाकांच्या तारांमध्ये रंगीत मणी असायचे. पिक्चरची नावं किंवा चित्रं असलेले रबरी मडगार्ड मिळायचे आणखी बरंच काही मिळायचं यासाठी...
चौथी पाचवी पर्यंत अशीच सायकल चालवली. प्रगती म्हणजे फुल पॅडल मारता यायला लागलं. मग सहावी सातवीला त्रिकोणी फ्रेमच्या दांडीवरून अन मग सीटवरून अशी प्रगती झाली.
आठवीनंतर शनिवारी शाळेत सायकल न्यायला मिळाली. केवढा भाव खायचो सायकल शाळेत नेल्यावर. आणि दहावी ते डिग्री पर्यंत हीच आमची सखी सोबतीण झाली.
मग घरी M80 आली तरी एवढं कौतुक नाही वाटलं जेवढं सायकल आल्यावर वाटलं होतं. तीच गत स्वतःच्या कमाईची गाडी घेतल्यावर...तेंव्हाही एवढं कौतुक नाहीच.
हे सगळं का आठवतंय ? तर आज स्वतःच्या कमाईची सायकल घेतलीय. हा सगळा चित्रपट डोळ्यांसमोरून सरकतोय...
शनिवार, २ जून, २०१२
प्रश्न
शिवाजी महाराज किंवा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू किंवा लाल बाल पाल त्रयी यांना त्यांची आई बोर्नविटा किंवा होर्लीक्स किंवा बुस्ट हेच प्यायला द्यायची का ?
कारण त्याशिवाय ते मोठे कसे होतील ?
पूर्वीच्या बाया आणि बाप्ये केसांना काय लावायच्या? म्हणजे त्यांचे केस लांब आणि काळेभोर कसे व्हायचे ?
इंग्रजांच्या डोकेदुखीला कंटाळून सर्वच जण डोकेदुखीच्या गोळ्या घेत असतील, नाही ?
आणि इतिहासात कुणीच कसं जाड नव्हतं ? अगदी अफजलखानही धिप्पाड होता पण जाड नसावा....
काय खायचे अन कुठल्या जिममध्ये जायचे ते ?
आणि आपलं तोंड किती घाण आहे हे आपल्या पूर्वजांना माहीतच नसेल. (जाहिरातीत नाही का कुठे कुठे लपलेले किटाणू दाखवतात.. टॉयलेट क्लीनर आणि टूथ पेस्ट च्या जाहिरातींतल्या साम्यावरूनच हे ओळखून घ्यावं .) नाहीतर त्यांनी माकडछाप काळं दंतमंजन कशाला वापरलं असतं ? (पलीकडच्या आजोबांचे दात अजूनही चांगले कसे राहिले कोण जाणे...कोणती टूथ पेस्ट वापरायचे ते लहानपणी ? अजून ऊस सोलून खातात)
माणूस उत्क्रांत खराच... नाहीतर लांडोरीला आकर्षित करण्यासाठी मोराला किंवा मैनेला आकर्षित करण्यासाठी मिस्टर कोकीळला deodorant सारखा सोप्पा पर्याय का नाही सुचला ?
आणि मी शास्त्र उगाच शिकलो. त्यात साबण म्हणजे काय, तो कसे कार्य करतो ते सांगितलंय. साबण म्हणे पृष्ठीय तणाव कमी करून तेलकट पदार्थ पाण्यात विरघळायला मदत करतो आणि अशा प्रकारे हातावरची घाण अन किटाणू धुवून जातात. मरत नाहीत. (मेले तर ते मुख्यतः साबणाच्या pH अर्थात सामू मुळे) . पण जाहिरातीत मात्र काय काय सांगतात...तेच खरं असावं नाही का ? म्हणजे अमुक एक साबणच किटाणूंना मारून टाकू शकतो. आणि अमुक एक साबणच तुम्हाला सुंदर बनवू शकतो (हे तर शास्त्रात शिकवलंच नव्हतं ) शिक्षण बोर्डाने सर्व जाहिरातीतील माहितीची आणि त्यांच्या शोधांची दाखल घेवून अभ्यासक्रम बदलायला हवा.
अरे हो, आणि भाजीवाले काका, फुगेवाले काका यांच्यापासून किटाणूंचा फैलाव होतो हेही शिकवायलाच हवं.
उष्ण आणि कोरड्या प्रदेशातील घरांची छपरं धाब्याची असतात, तर खूप पाऊस असणाऱ्या भागातील घरं ही उतरत्या छपरांची अन कौलारू असतात.
शेकडो वर्षांचा अनुभव गाठीला घेऊन माणसाने ही रचना केली न ? मग आता हे सारं कालबाह्य आणि भूगोलाच्या पुस्तकापर्यांतच मर्यादित होऊन बसलंय, असं का ?
तंत्रज्ञान प्रगत झालं हे खरं पण त्याने फक्त पक्की घरं बांधण्याबरोबरच तिथल्या वातावरणाला साजेशी घरं का बांधली जात नाहीत ? उन्हाळ्यात concrete तापतं, मग AC बसवा... धाब्याच्या घरांत कसं थंड असायचं...
तंत्रज्ञानाचा अविचारी वापर आपल्याला कुठे घेऊन जाईल ?
आणि आजकाल मंत्रीमंडळाच्या शपथविधीत किंवा त्यानंतर आणखी एक शपथविधी का नको? म्हणजे घोटाळे करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बाजाविनच असा ....
आणि दंगे, बंद, कुठल्याही क्षुल्लक कारणावरून चालणारा गदारोळ यात भारताची जी उर्जा वाया जातेय, त्यात एखादा अणुउर्जा प्रकल्पाच्या तोडीचा प्रकल्प चालेल काय ?
आणखी बरेच प्रश्न... म्हणजे बिन झाडांची पृथ्वी किती छान दिसेल ?.... आपण सर्व झाडे संपवून टाकू... जंगलेही संपवू. (कोळशाच्या अन कशाकशाच्या खाणी जंगलातच राहिल्यात ना आता.... त्याशिवाय नासायला, जाहिरात फलक झळकवायला वीज कशी मिळणार?)
शेतजमिनीही NA करून बंगले बंधू... शेतांचं काय... आत्महत्या करणारे शेतकरी करतीलच काहीतरी.
२५० फुट, ४०० फुट, ८५० फुट, ११०० फुट.....आणखी किती खोल जात राहणार आणि आणखी किती छिद्रे पाडणार या पृथ्वीला ? आणि जे पाणी भूगर्भात आहे ते कधी संप(व)णार? मी बोर-वेल बद्दल बोलतोय. ११०० फुट ही आमच्या बिल्डींग मधील आजची परिस्थिती आहे, जी तिसरी अशी बोर-वेल आहे. आजूबाजूला रोज एक बोर घेणं चाललंय.....
पावसाचं पाणी स्वतः पुढाकार घेऊन नाही साठवता येणार का? कि त्यासाठीही शासनाने नियमच करायला हवाय ?
हल्ली रस्त्यांवर पाहतो....कारमध्ये फक्त एकच जण बसलेला...बाकी ३-४ सीट रिकाम्याच....म्हणजे आपली एफिशियन्सी १/५ आहे नाही? आणि अशा कारमुळे जी जागा रस्त्यांवर अडते, त्यामुळे वाया जाणाऱ्या कार्यक्षमतेचं काय ?
मला कारण माहित आहे. कंपन्या याला प्रोत्साहन देतात. त्यांच्या म्यानेजर्सना टिकवून ठेवण्यासाठीच्या योजनांपैकी ही एक. वाढलेल्या पेट्रोलच्या किमतीचं त्यांना काय ? मग या १/५ एफिशियन्सीचा बोजा कुणावर टाकायचा ? हाही एक प्रश्नच...
आणि याच तथाकथित सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोकांच्या कार मधून कचरा रस्त्यांवर फेकला जातो तेंव्हा त्यांच्या सुसंस्कृत आणि सुशिक्षितपणाचं पारितोषिक कुणाला द्यायचं ?
डार्विन एक थेअरी लिहायला विसरला वाटतं... म्हणजे सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट असं तो म्हणाला. म्हणजे माणूस... पण माजोर्ड्यांचा विनाश हे लिहायला विसरला तो. म्हणजे डायनोसोरचा झाला तसाच....




