Saturday, 28 November 2020

प्लास्टीकच्या भावना

 दिवाळीच्या सणासाठी बाजारपेठेत अनेक वस्तूंबरोबर सजावटी साठी प्लास्टीकची फुलं दिसली. मनात विचार आला, लांबून ही छान दिसतीलही, न सुकलेली, न कोमेजणारी, पण खरंच ती भावतील का? त्यांचं ते बेगडी ताजेपण खऱ्या फुलांचा स्पर्शाचा आनंद देईल का?खऱ्या फुलांची नजाकत त्यांच्यात येईल? आणि खऱ्या फुलांना सुगंध नसला तरी त्यांचा तो जिवंतपणाची जाणीव करून देणारा सुक्ष्म वास...त्याचं काय करायचं?पायदळी गेल्यानं सुकणाऱ्या, कोमेजणाऱ्या भावना महत्वाच्याच नाहीत का? त्याच तर माणूसपणाचं, जिवंतपणाचं आणि अस्तित्वाचं लक्षण आहेत ना ?

सणाच्या दिवशी वातावरणात प्रफुल्लता आणणारी ताजी फुलं दुसऱ्या दिवशी सुकतात आणि सणाच्या दिवसाचं महत्व अधोरेखीत करतात, सण संपल्याची जाणीव करून देतात, मनाला रूखरूख लावून जातात. महत्वाचंच नाही का ते?एखाद्या गोष्टीचा अभाव त्या गोष्टीचा भाव, अस्तित्व, उपलब्धतेचं महत्व ठसवून जातो. 

ताजी टवटवीत फुलं अन् भावना सारख्याच नाहीत का? प्लास्टीकच्या भावना आपल्याला माणूस म्हणून जगू देतील?

Saturday, 14 November 2020

जाणीवपूर्वक बदल....

हल्ली ऐकू येणाऱ्या कँसरच्या बातम्या,राहणीमानाशी निगडीत व्याधी, हे बरेच दिवस डोक्यात फिरत होतं. त्यातच अमितचं अकाली जाणं (माझा चुलत भाऊ, माझ्यापेक्षा लहानच, ३५-४०च्या दरम्यानचा)चटका लावून गेलं.

 गेल्या वर्षभरात राहणीमानात जाणीवपूर्वक अनेक बदल केलेत. मुख्य म्हणजे ऑफीसच्या जवळ रहायला आलो....शहरापासून थोडं दूरच. जेंव्हा घर पहायला आलो तेंव्हा वाटलं होतं इतक्या आत रहायला जमेल का? कारण काहीही घ्यायचं झालं तरी दोन तीन कि.मी. तरी जावं लागतं. आजूबाजूला बरीच शेती. आणि लेआऊट (१२० एकर जागा) मधे जवळ जवळ ८०% जागा/प्लॉट रिकामे असल्यानं भरपूर मोकळी जागा. मी लहानपणी कॉलनीत राहात असताना असायची तशी. पण जसं राहायला आलो, तसं आवडायला लागलं....

ऑफीसच्या जवळ आल्यानं येण्या जाण्याचा वेळ वाचला. पेट्रोल वाचलं, प्रदूषण वाचलं....

मुलांना संध्याकाळी फिरायला नेणं सुरू झालं. शनिवारच्या आठवडी बाजारात (हो कारण हा अजूनही तसा खेडवळ भाग, इथं शहरीपणा आला असला तरी तो तसा नवखाच) जाणं सुरू झालं, ताजी भाजी, ताजी स्थानिक फळं आणनं सुरू झालं...बाहेरचं खाणं खूपच कमी झालं. नियमीत व्यायाम अन् आहार नियंत्रणानं वजन १३ किलोनं कमी केलं. आठवड्यातून एक दिवस ऑफीसला सायकल सुरू केली (जाऊन-येऊन २० कि.मी.)....

आजूबाजूला शेती असल्यानं आणि शहरापासून अलग असल्यानं, मोकळी आणि प्रदुषणमुक्त हवा हा मोठा फायदा!

सध्या राहात असलेल्या सोसायटीत पाणी रीसायकल केलं जातं आणि फ्लश साठी वापरलं जातं. त्याचं मानसीक समाधान बरंच मोठं आहे. ओला कचरा शेतात नेऊन टाकतो. त्याचं तिथे खत होतं. RO चं वाया जाणारं पाणी साठवून वापरायला घेतो.

मागच्या हिवाळ्यात तर एका गोष्टीनं आम्हाला चकित केलं. मागच्या बाजूच्या रस्त्यावर दोन वडाची झाडं आहेत. त्यांना फळंही आली होती. अचानक शेकडो पोपटांचा थवा तिथे मुक्कामी आला. रोज सकाळी बरोबर साडेसहाला तो प्रचंड कलकलाट करत उडायचा. आम्ही चहा घेत,पहाटेच्या (हिवाळा असल्यानं )संधीप्रकाशात ते पहायचो. उडायच्या आधी पंधरा एक मिनीटं ते चाचपडत झाडावरच कलकलाट करीत रहायचे, मग उडायचे. 

पावसाळ्यात कित्येक वर्षांनी काजवे पाहिले. एक काजवा चुकून गच्चीत आला होता. तो सापडल्यावर नजर शोध घ्यायला लागली आणि पलीकडच्या झाडीत अनेक काजवे दृष्टीस पडले.

कुंपणाबाहेरच्या एका झाडावर शिंजिरनं केलेलं घरटं अदितीने पाहिलं. मग तो कसा घरट्यात येतो, कसा अंडी ऊबवतो, पिलं अंड्यातून बाहेर आल्यावर कसं त्यांच्यासाठी खाऊ आणतो, पिलं कशी किलबिलाट करतात हे सगळं पहायला मुलांनाही मजा आली. पावसाळा सुरू झाल्यावर ठिपकेवाल्या मुनियाची घरट्यासाठी चाललेली लगबग,त्याचं ते हिरवीगार लंबलचक गवताची पाती घेऊन येणं, येता जाता समोरच्या तारेवर विसावणं, हे पाहण्यात सुद्धा मजा होती!  

निनादला घेऊन दर शनिवारी/रवीवारी सायकलवर जाणं सुरू केलं आणि त्या वडाच्या दोन झाडांपैकी एका वडाला बिलगलेल्या सायलीचा वेलही सापडला.  जवळची वाडी ओलांडून गेलं की केळीची आणि नारळाची बाग सापडली. नारळाच्या बागेत फणस, आंबा आणि इतरही अनेक झाडं आहेत. दरवेळेस काहीबाही फळं मिळायला लागली.

आजूबाजूच्या शेतीत नाचणीचं पीक घेतात. काही शेतांमध्ये झेंडू, शेवंती, गुलाब अशी फूलशेती होते. काही ठिकाणी कोबी, कोथिंबीरही लावतात. हे सगळं मुलंना दाखवता आल्याचं समाधान मोठं आहे.

संध्याकाळी फिरायला जाताना एकदा मोठा विंचू दिसला. मुलांना केवढा आनंद. पुण्या-मुंबईत तर आता दिसणारही नाहीत विंचू. सूर्योदय-सूर्यास्त देखील नेहमी पाहता येतोय . गर्द निळ्या पार्श्वभूमीवर चंद्रोदय, शुक्राची चांदणी, गुरू, मंगळ हे किती छान दिसतात ना! जाणीवपूर्वक या गोष्टी अनुभवतोय, मुलांचं अनुभवविश्व समृद्ध करतोय....

हे सगळं किती दिवस असं राहील माहीत नाही पण अजुनही बदल करायचेत. फक्त माझ्यासाठी नाही तर समाजासाठी देखील. त्यातला एक सोपा प्रयत्न म्हणजे झाडं लावणं. सध्याच्या परिस्थितीत बांबू माझं लक्ष वेधून घेतो. त्याचा वाढण्याचा वेग आणि हिरवाई निर्माण करायची ताकद अफाट आहे. बघुया कधी ते अंमलात आणता येतंय..

बऱ्याच गोष्टी उमगायला लागल्या ज्यांच्याकडे कित्येक वर्षं दुर्लक्ष केलं जात होतं; जसं आयुष्यात थोडं थांबणंही आवश्यक आहे. थोडा विसावाही गरजेचा आहे. प्रवासात नाही का, एखाद्या ठिकाणी पोहोचायची घाई केल्यानं प्रवासाचा खरा आनंदच घेतला जात नाही. आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य अनुभवायचं राहूनच जातं. नंतर करू, नंतर करूच्या नावाखाली आवडत्या गोष्टी केल्या जात नाहीत अन् तो नंतर कधी येतच नाही. थांबायला हवंय, आवडीच्या गोष्टी करून त्यातला आनंद मिळवायला हवाय. मला तर वाटतं आपल्या जीवनाचा प्रचंड वेग अन् न थांबण्याची वृत्ती याच आपल्या दुःखाचं आणि ताण तणावाचं कारण आहे. हे मिळवायचंय म्हणत छाती फुटेस्तोवर धावणं जे प्रचलनात आलंय तेच थांबायला हवंय.. असो. बदल करायचेत अन् करत रहायचेत. ही जाणीव जी झालीय ती महत्वाची आहे.Tuesday, 21 February 2017

अशोक वनात....

परवा पुण्यातल्या एका अशोक वनात जायला मिळालं. तिथला बहरलेला अशोक.
Saraca Asoka.

Sunday, 27 November 2016

आपण रासायनीक झालोयत...

या ठिकाणी रसायनं म्हणजे मानवनिर्मीत कृत्रिमरित्या तयार केलेले पदार्थ... रसायनशास्त्राच्या व्याख्येतील नाही.
सकाळी उठलं की दात घासायला रासायनीक पेस्ट. मग रासायनीक साबण, शँपू वगैरे ने अंघोळ. कपडे धुवायला वेगवेगळ्या रासायनीक पावडरी. मग वेगवेगळ्या रसायनांचे थर चेहरा आणि केसांवर चोपडणं. कृत्रीम सुगंधी रसायनांचे अंगावर फवारे (फेरोमोन्स शी साधर्म्य साधण्याचा प्रयत्न करणारे आणि आणि अंगच्या वासाबरोबर आपली ओळख ही लपवून ठेवणारे).
खाण्या-पिण्यात प्रिजर्वेटिव्ज....म्हणजे रसायनं. जरी साधं जेवलं तरी रासायनीक किटकनाशकांचे, खतांचे अंश  येतातच. त्यांना कसं थोपवणार ? कृत्रीम रासायनीक स्वादांची तर रेलचेल !
औषधांमध्ये विटॅमीन्सचा भरमार (यातील बराच अंश शरीराला न लागणारा अन टाकून दिला जाणारा), हॅार्मोन्स इ. इ.
भांडी घासायला रासायनीक साबण (फारशी खराब झाली नसली तरी), फरशी़ धुवायला अशीच अनेक रसायनं). टॉयलेट क्लीनर्स तर विचारूच नका.
डास पळवून लावायला, झुरळं मारायला, उंदीर मारायला वेगवेगळी विषं.... यादी खूप मोठी होईल...

याचे काय कसे आणि किती परिणाम आपल्या शरिरावर होतात किंवा वर्षानुवर्षांच्या वापराने होऊ शकतात याचा विचार कोण करतो?

ही सर्व रसायनं सांडपाण्यात मिसळून नद्या, तळी अशा ठिकाणी साठत जातात. भूजलात मिसळतात. अन पिण्याच्या पाण्यावाटे पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश करतात. मग यातल्या काही गोष्टी आपण वापरत नसलो तरीही.

आणि हे सर्व जाहिरातींनी हळूहळू आपल्यावर थोपवलेलं. आपला ब्रेन वॅाश केलेला. म्हणजे हे काही वापरलं नाही तर आपण किती मागास नाही तर अस्वच्छ आहोत हे सांगत.
 या सर्व गोष्टींना नैसर्गीक पर्याय असताना?

फक्त वीस-तीस वर्षांपूर्वी या सगळ्या गोष्टी किती कमी होत्या?

Wednesday, 24 December 2014

नातं

आताशा आभाळाशी नातं राहीलं नाही. तारांगण परकं झालंय. गॅलरीतून पलिकडच्या बिल्डींगमधल्या अनोळखी चेहऱ्यांकडे, व्यक्तींकडे पहावं तसं या ताऱ्यांकडे पाहणं होतं. कधीतरीच....
तसं मातीशी तरी कुठं राहीलंय नातं? तीही तर परकीच झालीय ना. कुठे तरी तिसऱ्या मजल्यावर अधांतरी जगायचं....खाली मातीवर सहा इंचांचा काँक्रीटचा नाहीतर डांबरी थर.

नावं, ओळखीच्या खुणा, लकबी, लांब राहून कालांतराने अपरिचीत व्हायला लागतात तसं. आणि मग चेहरेही अपरिचीत होतात.  

कुठं ते तासन् तास छतावर कुडकुडत तारे पाहत जागणं, नावांनिशी नक्षत्रं, तारे हुडकणं, चिखलांतून गज खुपसा-खुपशी खेळत अंतराचं भान विसरून हुंदडणं...

केंव्हा भरले होते शेवटचे मातीने हात? केंव्हा पाहिले होते शेवटचे डोळेभरून तारे आणि केंव्हा शेवटची जाणीव झाली होती माणसाच्या क्षुल्लकपणाची या अफाट विश्वात?

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.