बा. सी मर्ढेकरांची एक कविता माझी अत्यंत आवडती. "पितात सारे गोड हिवाळा". आम्हाला दहावीला होती. त्या कवितेने अनेक अमूर्त आणि नव्या संवेदना जागृत केल्या. त्यातल्या काही ओळी...
कुठे धुराचा जळका परिमल,
गरम चहाचा पत्ती गंध,
कुठे डांबरी रस्त्यावरल्या,
भुऱ्या शांततेचा निशीगंध
एकाच कडव्यात गंध, वातावरण निर्मीती, अन् अनुभव कसं गजऱ्यासारखं गुंफलंय ना !
अगदी पहाटे पाचच्या सुमारास फिरायला निघावं (तेही हिवाळ्यात) अन् रस्त्याच्या कडेला एखाद्या चहाच्या टपरीवर चहा उकळत असावा... पहाटे फिरायला येणाऱ्यांसाठीच. त्या उकळी फुटलेल्या चहाचा सुगंध जो दरवळतो... हाही एक अनुभवच. मी काही चहा वेडा वगैरे नाही पण चहाचा गंधवेडा आहे!
पावसाळ्यात कुठल्यातरी भ्रमंतीला जाऊन येताना मुसळधार पाऊस कोसळतो...कोळंदून आलेलं असतं. सगळीकडे चिंब. ओला गारवा. पावसाच्या माऱ्यानं पडलेला पानांचा सडा. त्यानंतर कुठल्यातरी चंद्रमौळी टपरीवर गरम कांदाभजी तळली जातायत... स्वतःला थांबवायचा प्रयत्न करून बघा!
जळक्या गंधावरून आणखी एक आठवण/अनुभव स्मृती... आई त्रिपूरी पौर्णिमेला त्रिपूर लावायची. तो त्रिपूर शमवतानाचा एक जळका सुगंध मला अजून हवाहवासा वाटतो. तसाच सणाच्या दिवशी आरती झाल्यानंतर जेंव्हा निरांजन मालवतो तो वास ही किंवा मध्यरात्री उठल्यावर सांजवेळचा दिवा मालवतो त्याचा धुरकट वास हे खूप खोल अध्यात्मिक अनुभूती देवून जातात. तेच कापराच्या बाबतीत. कापराचा वास आला की आपला धार्मिक अनुभव जागा होतो.
चाफ्याचं झाड भारतीय संस्कृतीत खोल रुजलंय. त्याची माझी पहिली भेट काही फार स्मरणात नाही पण चाफ्याचा आणि त्याच्या सुगंधाचा साक्षात्कार मला पारनेर जवळच्या सिद्धेश्वराजवळ झाला. पार बारावीनंतर. पण ती आठवण जी काही कोरली गेली...ती गेलीच. संध्याकाळची वेळ. दरीच्या अगदी कडेला निर्मनुष्य ठिकाणी वसलेलं ते देऊळ. वारा अगदीच पडलेला! ऊन्हाळ्याचे दिवस. चाफ्याचं एकच झाड. निष्पर्ण. पण झाडांना जशी पानं असावीत तशी फुलं लगडलेली. आसमंत भरून तो सुगंध ! वारा नसल्यानं तसाच साठून राहीलेला!. खोलात असलेली शंकराची पिंड. आत गाभाऱ्यात कमालीचा गारवा. पिंडीवरच्या अभिषेक पात्रातून थेंब थेंब पडत होते.. पिंडीवरही चाफ्याची फुलं वाहिलेली. मी माझ्या मित्राबरोबर ॐकार केला. त्याचा जो काही धीर-गंभिर स्वर त्या गाभाऱ्यात घुमला तोही मी नाही विसरू शकत. या सगळ्याची मिळून एक एकसंध आठवण, एकच एक गंधानुभव संचितात जमा झालाय. मोगरा तसा कधी आयुष्यात आला नाही लक्षात पण मोगऱ्याची एक आठवण जी गुंफली गेली ती आत्या आणि बाबांशी जोडलेली. दोघांनाही मोगरा खूप आवडतो. आत्या प्यायच्या पाण्याच्या माठात मोगऱ्याचं फूल टाकते, बाबा जेवणाच्या टेबलावर आणि उशाशी मोगऱ्याची फुलं ठेवतात....ती सुगंध देत राहतात.
प्रत्येक गंध हा सुगंधच असेल असं नाही. काही गंधांबरोबर काही कटू स्मृतीही जोडलेल्या असतात. नगरला शाळेत जाताना चितळे रोडवर एका कोपऱ्यावर बोंबीलचं दुकान होतं. त्या कोपऱ्यावरचा तो वास अगदी नकोसा होई. मी शाळेत तिथनं येताना/ जाताना श्वास कोंडून ठेवायचो. श्वास कोंडून ठेवायचा खूप सराव तिथं झाला. नंतर दहावीला गणिताच्या क्लासला जाताना/येताना बालिकाश्रम भागात एक कत्तलखाना लागायचा. तिथं कातड्याच्या थप्प्या वाळत घातलेल्या असायच्या. त्यांचाही भयंकर दर्प पसरलेला असायचा. श्वास कोंडून ठेवणं तिथंही चालूच राहीलं. ओल्या रक्त-मांसाचा वासही कसा कुठे कोण जाणे, पण डोक्यात भरून राहिलाय... अंगावर शहारा ऊठवणारा...नारायण धारपांच्या काही कथांमधून तो पक्का होत गेला....त्याच पठडीतला दर्प म्हणजे त्वचा/जिवंत सजीव किंवा शरिरं जळतात तो. शहारा आणणारा. (उदा. दिव्यावर झेप टाकून किडा/पतंग मरतो तेंव्हाचा)
बऱ्याचदा रस्त्यावरनं जाताना एखादा भपकारा येतो. अगदी नकोसा....कधी कुठला मेलेला प्राणी कुठल्यातरी मोकळ्या जागेत रस्त्याच्या बाजूला आणून टाकलेला असतो आणि मग दोन-तीन दिवसांत तो कुजायला लागतो. हा भपकारा मग पुढे १०-१५ दिवस येत राहतो. कधी उंदराला औषध घातल्यानंतर तो अडचणीत जाऊन मरतो आणि मग असह्य होणाऱ्या वासामुळं सगळा अडचणीतला पसारा काढणं आलं. हे हल्ली मात्र तसं कमी. परळीला असताना इरिगेशन कॉलनीत एक गाढव मेलं होतं. इरिगेशन कॉलनी असल्यानं तिकडे लक्ष कोण देणार? मग कुत्री जमा झाली आणि त्यांनी ते गाढव फाडून खायला सुरु केलं. ती कुत्री जबरदस्त आक्रमकही झाली. कुणाला त्या बाजूने जाऊ देईनात. त्यांची रक्ताने माखलेली तोंडं, त्यांचा आक्रमकपणा याची सगळीकडे दहशत बसली. आठ-दहा दिवस हा प्रकार चालला. त्यात ओळखीची कुत्रीही अनोळखी बनली होती! त्यांची आपसातली भांडणंही डोकेदुखी झाली होती. मेलेल्या प्राण्याचा दुर्गंध ही त्या गाढवाची कायमची आठवण बनून बसली. रस्त्यानं /रेल्वेनं प्रवास करताना आणखी एक भपकारा म्हणजे मळीचा!. बायकांचा पदर अचानक नाकाला, पुरूषांची तोंडं वेडीवाकडी....साखर कारखान्यांजवळून जातानाचा हा हमखास अनुभव. पूर्वी प्रवास जेंव्हा सर्रास झाला नव्हता तेंव्हा कधी काळी होणाऱ्या प्रवासात लिंबू/संत्र्याची साल हमखास सोबत असे. कुणाला ना कुणाला तरी गाडी लागत असे. मग एकाचं पाहून दुसऱ्याला असंही चक्र सुरु होई. त्यावर इलाज म्हणजे लिंबू/संत्री हुंगणे! लिंबाच्या वासाची अशी अनुभवाशी सांगड!
प्राण्यांशी निगडीत असेही अनेक गंधानुभव आहेत! गाई-म्हशी आणि बोकड हे उल्लेख तर आधीच आलेत, पण त्याव्यतिरीक्त अनेक गंध आहेत. आपल्या आयुष्य आणि अनुभवांशी निगडीत. मी मांजर किंवा कुत्रा आजारी आहे हे त्याच्या जवळ गेल्यावर येणाऱ्या वासावरून ओळखू शकतो. तसंच त्यांच्या जखमांनाही एक गंध/दर्प असतो. मी, आणि बहिण मांजर, कुत्रा यांच्या इतक्या जवळ वावरलोयत की त्यांच्या 'दात न घासलेल्या' तोंडाचा वास कसा असतो हे सांगू शकतो ! तसाच दर्प हा प्राणी संग्रहालयात जंगली प्राण्यांच्या पिंजऱ्यांजवळ येतो. थोड्या जास्त तिव्रतेनं.एखाद्या जुन्या पेटीत उंदराचं वास्तव्य किंवा येणंजाणं आहे हे ही मी वासानं ओळखू शकतो. आणि अशा ठिकाणी उंदराची पिलं सापडण्याची शक्यताही अधिक! मास्टर्सला असताना माझा प्रोजेक्ट उंदरावर होता. त्यासाठी एनिमल हाऊस ला जावं लागे. तिथल्या उंदरांचा, त्यांच्या लेंड्या आणि मुत्राचा वास डोक्यात बसलाय. त्यांच्या पिंजऱ्यांत खाली भाताची तूस टाकावी लागे आणि पिंजरे दररोज साफ करावे लागत...
लहानपणी शाळेत अनेक चित्र-विचित्र खेळ खेळले गेलेत. त्यातनं अगाध ज्ञान प्राप्त झालं. पुस्तकी ज्ञानापेक्षा कितीतरी वेगळं आणि अधिक. आपले हात हातावर घासले/त्वचा त्वचेवर घासली की त्याचा एक दर्प येतो. त्वचा जळण्याच्या दर्पाची ती आधीची अवस्था....गावातल्या शाळेत काही मुलं कित्येक दिवस अंघोळ न करता येत. शेतांमध्ये, गोठ्यांमध्येही कामं करुन येत असतील. आमच्या पांढऱ्या कॉलरवाल्या मुलांचे कपडे एकदम शुभ्र, स्वच्छ,नीळ दिेलेले, तर त्यांचे मळलेले, पिवळे पडलेले. त्यांच्या कपड्यांना कधी कधी वास येई. अंगालाही येई. त्यावेळी त्यांचा तीरस्कार वाटे, पण आज मागे वळून पाहताना घामाच्या वासाची किंमत कळालेली असते. शाळेतच सार्वजनीक मुतारीत जाण्याला सुरूवात झाली आणि आमोनियाचा डोक्याला मुंग्या आणणारा दर्प कळाला. पुढे कॉलेजला असताना बिकरमधला आमोनिया हुंगला होता... आठवणी ताज्या झाल्या पण मेंदू काही मिनिटं पूर्ण बधीर झाला! झिणझीण्या आल्या.
शाळेशी निगडीत वासांपैकी आणखी एक म्हणजे नविन पुस्तकांचा. नवं पुस्तक हातात धरून, त्यात नाक खुपसून पोट भरून वास घ्यावा. त्यातल्या शुभ्र पानांवरून, काळ्याभोर छपाईवरून हात फिरवत रहावा...
काही दुकानांशीही अनेक गंध चिकटून राहीलेत. किराणा दुकानातला तेल, डाळी, गूळ, मसाले, दाणे, लाल मिर्ची, हळद अशा जिनसांचा मिळून एक गंध (आताच्या सुपरमार्केट मध्ये हरवलेला, निसटलेला एक अनुभव) . घाण्याच्या तेलाचीही वेगळी दुकानं अन् त्यातल्या तेलांचाही एक विशिष्ट वास अनुभव बनून राहीलाय. न्हाव्याच्या दुकानातला साबण, तेल, वेगवेगळ्या क्रीम, आफ्टर शेव लोशन इ. गोष्टींचा एक संमिश्र गंध. कपड्याच्या दुकानातला नवीन कापडाचा, त्याच्या खळीचा आणि रंगांचा सूक्ष्म वास. मंडईतला ताज्या भाज्या आणि टाकून दिलेल्या भाज्या (सडण्याच्या आधीच्या अवस्थेतल्या) यांचा संमीश्र वास, त्यातच मंडईतल्या कोपऱ्यांवर असलेली मसाल्यांची दुकानं, फळांच्या दुकानातनं पिकलेली विविध फळं, त्यात भर घालतात. जर बाजाराचा दिवस असेल तर विकायला आलेल्या शेळ्या , मेंढ्या, कोंबड्या, त्यांनी टाकलेल्या लेंड्या, मूत यांचाही एक दर्प त्यात मिसळतो. पान टपरीवरचा पान मसाले, अस्मानतारा, वेगवेगळ्या पानात घालायच्या जिनसा,
आणि मुख्य म्हणजे सिगरेटींचे धूर यांचा संमिश्र दर्प. सिगरेटी ओढणारा जर
जवळनं गेला तरी तो दर्प येतो. तो लपवण्यासाठी मग पानटपऱ्यांवर मिंट सारखे
पदार्थ मिळायला लागले पण मला नाही वाटत तो दर्प लपतो. आजोबा सिगरेट ओढायचे. त्यांच्या मते ही वाईट सवय त्यांना त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांमुळे लागली. ते चारमिनार ओढायचे. त्यांच्याकडे त्या केशरी रंगाच्या पाकिटांच्या थप्प्या साचलेल्या असत. आम्ही नगरला आल्यावर त्याच्या अनेक गोष्टी करत असू. त्यात षटकोनी डबे, एका बाजूकडून दुसरीकडे जाणाऱ्या फोटोची जादू, त्यातल्या चंदेरी कागदाच्या आत छर्रा टाकून त्याच्या कोलांटउड्या मारणाऱ्या बाहुल्या अशा गोष्टी होत्या. मात्र डॉक्टरांनी सागितल्या दिवसापासून लगेच त्यांनी सिगरेट सोडली!
याच गंधांवरून एक गंमत आठवली. नगरच्या चितळे रस्त्यावरनं आणि गल्ली-बोळातनं माजलेले बोकड फिरायचे. दाढ्या वाढलेले, शिंगं वाढलेले. त्यांच्या पासून लांबच रहावं लागे नाहीतर कुणालाही सरळ ढुसणी मारून ते पुढं जायचे. ते बोकड कुठेही आसपास असतील तर लगेच कळायचं ते त्यांच्या अंगाला येणाऱ्या दर्पामुळे. अगदी दोन-तीनशे मिटरवरूनही हा दर्प सहज येई.
मसाल्यांच्या वर आलेल्या संदर्भांवरून आणखी एक त्याच्याशी निगडीत गंधानुभव वर आला. तो म्हणजे मसाले दळून आणण्यासाठी मसाल्यांच्या गिरणीत/कांडप यंत्रावर जाण्याचा. कांडपयंत्राच्या खडखडीच्या आठवणींनी एक कोपरा खडखडत राहतो. हळद, मसाल्यांमुळे पिवळसर झालेल्या गोष्टी. तोंडाला/नाकाला फडके बांधलेला मसाले दळून/कुटून देणारा तो माणूस आणि वेगवेगळ्या मसाल्यांमुळे उडणारा ठसका! हळदीचा, तिखटाचा, आणि गरम मसाल्यांचा... प्रत्येक वेळी दळणाला येणाऱ्या वेगळ्या पदार्थांमुळं येणारा वेगळा गंध अन् वेगळा अनुभव. शिकेकाई दळताना/कांडताना उठणारा ठसका हाही त्यातलाच एक अनुभव. त्या शिकेकाईच्या मिश्रणात कोणी संत्र्याच्या वाळलेल्या साली, नागरमोथा अशी सुगंधी द्रव्यं घालत. तो सुगंध काही वेगळाच.
पिकलेल्या फळांचा गंध हाही एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. रस्किन बाँड यांच्या कथेतल्या त्या एका मुलाची आठवण येते जो शाळेत जाता येता भुकेल्या पोटी फळांच्या दुकानाकडे पाही.
अति पिकलेली केळी, अति पिकलेले पेरू, यांचा नकोसा गोड,अति पिकलेली बोरं, चिंचा यांचा नकोसा आंबट हे वास नेहमीसाठी स्मृतीत साठवले गेलेले आहेत. पिकलेल्या आंब्यांचा वास हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांशी पक्का जोडलेला. कॉटखाली आंब्यांची छोटीशी अढीही कधीतरी लावलेली. तसाच कितीही पिकला तरी गोड आणि हवासा होत जाणारा अननसाचा वास...अननसाची गाठभेट तशी खूप उशिराची. पिकलेल्या खरबुजाचा वासही मंद पण हवाहवासा वाटणारा. बाबांचं पाहून मलाही खरबूज घेताना नाकाला लावून वास घेतल्याशिवाय समाधान होत नाही.
पिकलेल्या फणसाचा घमघमाट सगळ्यांनाच आवडेल असं नाही. माझ्या स्वतःच्या बाबतीत असं झालं की मी त्या वासामुळे फणस द्वेष्टा झालो होतो. बहिणीला मात्र फणस खूप आवडे. एकतर फणस नगरला मिळणं तसं दुर्मिळ. मराठवाड्यात तर फक्त चित्रांतून फणस माहीती. असा वर्षा-सहामहिन्याला नगरला आल्यावर जरी फणस आणला, तरी माझ्या नाक मुरडण्यामुळे बहिणीला काही त्याचा मनासारखा आस्वाद घेता आला नाही. पण आता फणस हे माझं दुसरं सर्वात आवडतं फळ झालंय. केळानंतर. हा बदल कसा झाला कोण जाणे. बहुधा कोकणात गेल्यानंतर जसं कोकण आवडायला लागलं तसं फणस आवडायला लागला. आणि त्याचा वासही! आता मी अख्खेच्या अख्खे फणस आणून, हाताला तेल बील लावून फणस सोलतो आणि गरे काढतो. आवडीने. माणसाच्या आवडी निवडी अशा बदलतात. फणस ऑफीस किंवा शाळेत नेण्याची मात्र चोरी. असा घमघमाट पसरतो! लपून राहूच शकत नाही.
त्यावरूनच लहानपणी खेळलं जाणारं
"भटो भटो कुठं गेला होतात?
कोकणात
कोकणातून काय आणलं?
फणस
कुठं कापू? इथं? तिथं असं करत जेंव्हा तो खराब निघतो, तेंव्हा पुढचा फणस वास घेतल्याशिवाय कापायचा नाही हेही लहान मुलांच्या मनावर कुठंतरी बिंबलं जातं!"
कुठंसं वाचलं होतं की लग्नानंतर घरातले सुगंध कसे बदलत जातात. लग्नानंतर पहिले वर्ष-दोन वर्षे अत्तर, परफ्यूम्स, सुगंधी तेलं अन पावडरी, डिओ वगैरे वगैरे. मग नंतर, बाळाच्या पावडरी, बाळाचे साबण, तेलं आणि मग आयोडेक्स, झंडू-बाम, अमृतांजन इ.इ. किती खरं आहे ना! आताशा मला आणि बायकोला एका प्रकारच्या विशिष्ट वाईप्सचा वास सहनच होत नाही कारण ते वाईप्स आम्ही मुलं लहान असताना त्यांचे डायपर बदलताना पुसायला वापरत असू ! त्यामुळं आता त्या वाईप्सचा वास जरी आला तरी त्या आठवणी जाग्या होऊन नकोसं होतं. शिसारी बसते ती अशी.
काही गंध हे सुगंध म्हणवत नसले तरी ते एक समाधान देतात. त्यातला एक म्हणजे डोक्याला खोबऱ्याचं तेल लावताना! स्वतः लावत असू तरीही किंवा कोणी लावून देत असेल तर आणखीनच! दुसरा म्हणजे दिवाळीत उटणं लावून अभ्यंग स्नान करताना! खोबऱ्याच्या तेलावरनं आठवलं. आमच्या मास्टर्सला एक केरळी होता. तो घरून एक पाच लिटरचा शुद्ध नारळाच्या तेलाचा डबाच घेऊन यायचा. तोपर्यंत मला हे माहितच नव्हतं हे तेल अशा मोठ्या प्रमाणात मिळतं. आम्हाला तोपर्यंत प्याराशूटची निळी बाटलीच ठाऊक. इकडे दक्षिणेत आल्यावर कळालं की नारळाच्या तेलात भाज्याही करतात आणि आता भेंडीची नारळाच्या तेलातली मिरे घातलेली भाजी मला खूप आवडते. केळाचे चीप्स नारळाच्या तेलातच छान लागतात! कपड्यांना इस्त्री करतानाचा किंवा कडक ऊन्हात वाळवलेल्या कपड्यांचा गंध हेही त्याच पठडीतले.
तसाच समाधान देणारा गंध म्हणजे स्वतःच्या ताज्या घामाचा! व्यायामानंतरचा हा ताज्या घामाचा वास केवढा आत्मविश्वास देतो!
आपल्या शरिरांना असलेले सूक्ष्म वास आपल्या नकळत आपण ओळखतो. आई, बाबा, भावंडं, आणि आपली मुलं, आपले जोडीदार, सगळ्यांच्या शरिरांचा सूक्ष्म वास आपल्या नकळत परिचयाचा असतो. पूर्वी बाळांच्या मस्तकाचं अवघ्राण करण्याच्या प्रथांचे बरेच उल्लेख आहेत.
शेवट करताना एका पुस्तकाबद्दल जे काळजाशी जोडलं गेलं त्यातल्या गंधानुभवाच्या उल्लेखावरुन. अरुंधती रॉय यांचं "God of small things". बसच्या, किंवा इतर ठिकाणच्या लोखंडी दांडीला येणारा असा चीर परिचीत सूक्ष्म वास. किंचीत खारट... धातूमय. किती बारिक निरिक्षण आणि टिपण! माझ्याही अनेक स्मृती त्याने चाळवल्या गेल्या. तसंच जाऊन ते ऱ्हदयाला भिडलं.
अजून असे अनेक अनामिक गंध आहेत. खूप परिचयाचे पण कशाचे ते सांगता न येणारे. वेगळ्या विश्वात नेणारे. त्यांच्याशी निगडीत स्मृतींची कवाडं खाड खाड उघडणारे.
👍निशब्द मी. हे वाचून लहानपणीच्या अठवणी ताज्या झाल्या. प्रत्येक संदर्भ नेटका आणि तंतोतंत उतरवला आहे. अप्रतिम लेखन कौशल्य!
उत्तर द्याहटवा