सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०

पुढा-याचे हेडमास्तरांस पत्र

प्रिय मास्तर,
सगळीच माणसं पुढारी होत नसतात ,
नसतात सगळीच मंत्री,
हे शिकेलच माझं पोरगं कधी न कधी. 
मात्र त्याला हे देखील शिकवा,
जगात प्रत्येक चांगल्या माणसागणिक 
असतो एक पैशासाठी काहीही करणारा.
स्वार्थी राजकारणी असतात जगात; त्यांचा नीट अभ्यास कर म्हणावं.
असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही,
त्यांच्या वाटेला जाऊ नको म्हणावं.
असतात पाडायला टपलेले वैरी,
तसेच पाठींबा देणारे मित्रही.
मैत्री करून लोक जमवायला शिकवा त्याला. 
पण प्रसंगी खुर्चीसाठी कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसायला घाबरू नकोस म्हणावं.
वेळ आल्यावर स्वतःचं पिलू पायाखाली घेऊन जिवंत राहणाऱ्या माकडीणीची गोष्ट सांगा त्याला. 
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत.
तरीही जमलं तर शिकवा त्याला,
घाम गाळून माझ्यासारखे बंगले नाही बांधता येत.
त्यापेक्षा आयतं मिळालेलं घबाड फार मौल्यवान.
हार कशी स्वीकारावी हे त्याला शिकवू नका; 
कारण राजकारणात हरणाऱ्याला किंमत नाही.
साम, दाम, दंड, भेद वापरून फक्त 
विजय मिळवायला शिकवा त्याला. 
कोठेही भ्रष्टाचार करायला मागे पुढे पाहू नको म्हणावं,
आणि शिकावा तरीही उजळ माथ्यानं वावरायला.
लोकांच्या पुढे भाषण करायला शिकवा त्याला,
आणि त्यांच्यासमोर खोटं बोलायला कचरू नकोस म्हणावं.
कारण लोकांना फसवणं फार सोपं असतं.
आश्वासनं देताना विचार करू नकोस म्हणावं,
कारण आश्वासनं ही पुरी करण्यासाठी नसतात.
हे त्याला कळू दे!
निवडणुकीत अपयश मिळण्यापेक्षा 
फसवून आलेलं यश महत्वाचं आहे.
लोकांचावर पैसा खर्च करायला शिकवा त्याला;
पण त्याच्या पाचपट पैसा वसूल करण्याची कला
त्याच्या अंगी बाणवा.
त्याला हेही सांगा,
लहान स्वप्नं बाळगू नकोस म्हणावं 
पण मोठ्यांना तोंडावर विरोध करू नकोस  
काट्याने काटा काढून प्रतिस्पर्ध्याला 
संपविण्याची कला शिकवा त्याला.
तसंच मनासारखं झालं तरी 
जगाला दाखवू नकोस म्हणावं.
शाळेच्या अभ्यासात जास्त वेळ घालवू नकोस म्हणावं.
त्याला पास करायला तुम्ही आहातच
कुठेही वेळेवर जात जाऊ नकोस म्हणावं,
अगदी शाळेतसुद्धा 
त्यामुळे आपली किंमत कमी होते हे सांगा त्याला.
कुठेही चांगलं घडो अथवा वाईट; त्याचा फायदा उठवायला शिकवा त्याला
जनतेत फुट पाडायला मागेपुढे पाहू नकोस म्हणावं
कारण फुट पडली तरच तुला मते मिळतील.
कुणालाही तोंडावर नाही म्हणू नकोस म्हणावं;
पण फक्त उपयोगाच्या माणसांची कामे करत जा,
आणि त्यांचा उपयोग संपला , कि 
त्यांना लाथ मारून हाकलून द्यायचं धैर्य 
त्याच्या अंगी बाणवा.    

आणखीही सांगत राहा त्याला 
कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नकोस;
अगदी सख्या बापावरही,
कारण राजकारणात विश्वास ठेवणं हाच गुन्हा आहे 
प्रत्येकाकडं संशयानं बघायला हवं त्यानं.
आणि धीर धरायला शिकवा त्याला;
कारण चांगली माणसं जास्त दिवस राजकारणात 
टिकत नाही म्हणावं.   
इतरांच्या दोषांवर कावळ्यासारखी नजर ठेवावी 
कारण त्यामुळे आपले गुण वाढतात म्हणावं 
चोर, गुंडांना नवे ठेवू नकोस म्हणावं;
कारण निवडणुकीत हीच माणसं खरी मदत करतात
पोलीस पत्रकार, इन्कमटॅक्सवाले 
यांच्याशी वैर करू नको म्हणावं 
त्यांचा चांगला पाहुणचार करायला शिकवा त्याला 
कारण पाण्यात राहून माशाशी वैर करू नये.
मास्तर खूप काही बोलतोय,
खूप काही मागतोय, 
पण एवढं कराच तुम्ही (नाहीतर तुमची बदली करीन)
मग फार मोठा पुढारी होईल बघा तो!
कारण माझं पोरगं 
माझ्यासारखंच नाठाळ  कार्टं आहे हो ते!
-प्रा. जी. व्ही. बोरकर, शिरूर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.