रविवार, २ एप्रिल, २०२३

गंधानुभव १.


 

रस्कीन बाँडचं "My Favourite nature stories" वाचण्यात आलं अन् आपलेही असे काही अनुभव लिहावेत असं वाटलं.माझ्या स्वतःच्या गंधानुभवांबद्दल मला स्वतःलाच अप्रुप आहे. म्हटलं तेच उतरवावं.....

    तीन चार वर्षांचा असतानाची बालवाडीतली आठवण कोरीव आहे. आम्हाला कोवळ्या ऊन्हात बसवलेलं होतं. माझे हात मातीत फिरत होते. डोक्यात नक्की काय होतं माहित नाही. मला मातीत बांगडीची काच सापडली आणि मी ती नाकाजवळ नेऊन हुंगली. तिला कसला वास येतोय का?ती जरा जास्तच जोरात हुंगली गेली. इतकी की ती सरळ नाकातच जाऊन अडकली. मी जाम टरकलो. शिक्षक/शिक्षिका काय म्हणतायत इकडे जराही लक्ष न देता मी घरी पळत सुटलो (घर हाकेच्या अंतरावर). घरी सांगितल्यावर घरच्यांनी आणि शेजार-पाजारच्यांनी नाकात पाहिलं. काहीच दिसेना. कुणी म्हणालं पडली असेल, कुणी म्हणे नाकात गेलीच नसेल, पण मी ठाम होतो की ती नाकातच आहे. घरच्यांनीही विश्वास ठेवला माझ्यावर आणि तालुक्याच्या ठिकाणी कान,नाक,घसा त़ज्ञाकडे नेलं. त्याने तो बांगडीचा तुकडा काढला. ऐंशीच्या दशकात. हा माझा पहिला ठळक गंधानुभव. हे आठवल्यानंतर माझं गंधवेडं विश्व अन् गंधवेड्या अनुभवांची मालिकाच तयार झाली.

    पुसट आठवण. आजुबाजूचं विश्व समजाऊन घेणं चाललं होतं. कशाचे रंग कसे आहेत, कुणाच्या लकबी कशा आहेत, कशाचे कुठून कसे आवाज येतात आणि कशाचे कसे गंध आहेत. जग कशाला चांगलं म्हणतं अन् कशाला वाईट....आपलं शरिर चाचपडणं अन् समजून घेणंही सुरु झालं होतं. मग कानात बोट घाल अन् वास घे, बेंबीत बोट घाल अन् वास घे,आणि अजूनही कुठे कुठे बोट घालून वास घे हे प्रकार मी केले. हे अजून आठवतं कारण जगाला आणि स्वताःला समजून घेतानाचे हे अनुभव होते आणि त्या अनुभवांबरोबर गंध गुरफटला होता. माझं गंधविश्व मी गुंफत होतो....गंध असा अनुभवांबरोबर गुंफला गेला तेच अप्रुप.

    तेंव्हाचीच कधीची तरी आणखी एक आठवण. मला ट्रकच्या धुराड्यातून निघणाऱ्या धुराचा वास आवडायचा. मला आठवतंय की पाटबंधारे विभागाच्या आमच्या कॉलनीत शेजारीच टँकर ड्रायव्हर राहत. ते टँकरही घरीच घेऊन येत. कधी कधी तो सुरू करून ठेवीत. मी जाऊन धुराड्यासमोर नाक धरून भरभरून तो धूर आणि वास घेतलाय. कित्येक मिनीटं तो धूर घेत मी ऊभा होतो. तंद्रीच.   

    अगदी लहानपणी आजोळी गेल्यानंतर तिथे न्हाणीघरात अंघोळी असायच्या. ती मजाच काही वेगळी. न्हाणीघरात कुठल्या कुठल्या फटींमधून सूर्यप्रकाश आत शिरत असे. तो अंगावर घेत अंघोळ करणं म्हणजे परमसूख होतं. वाफाही त्या सूर्यप्रकाशात उठून दिसत. सूर्यप्रकाशात वरवर जाणाऱ्या वाफा. न्हाणीघरात मध्यभागी मोठा दगडी चौथरा होता, त्यावर बसून अंघोळ करायची. न्हाणीघराच्या बाहेरच्या आडातून पोहऱ्यानं पाणी काढून चुलीवर किंवा बंबात तापवायचं आणि ते वाफाळतं पाणी अंघोळीला. तांब्याच्या बंबात गरम केलेलं पाणी. तांबूस रंगाचा ठोकेदार बंब आणि धूरानं काळी झालेली त्याची चिमणी. बंब चकाकतो सकाळच्या कोवळ्या ऊन्हात. बंबातून बादलीत सोडलेलं पाणी. त्या पाण्याला एक धुरकट वास असतो. ते धुरकट वासाचं पाणी अन् त्या धुरकट वासाच्या पाण्यानं त्या न्हाणीघरात सूर्यप्रकाशात केलेली वाफाळती अंघोळ हे सोनेरी क्षणच स्मृतींच्या कोंदणात बसवले गेलेत. त्यात त्या वेळी खेड्यांतून मिळणारा एकमेव लाईफबॉय साबण अन त्याचा वासही न विसरता येणारा. 

    याच मालिकेत येणारे काही पाहुणे अनुभव....शेणाने सारवलेलं अंगण, शेणाने सारवलेलं धाब्याचं घर अन सकाळी चुलीवर तुराट्याच्या काड्या घालून दूध तापवताना झरोक्यातून हुंगलेला धूर.

    आजोळीच आंधळी आजी म्हणजे माझी पणजी होती. तिला बऱ्याच वर्षांपासून काही दिसत नसल्यानं तिला आम्ही आंधळी आजी म्हणूनच ओळखायचो. तिचे सुरकूतलेले हात आणि त्या सुरकूतलेल्या हातांनी चाचपडणं अजून आठवतं. तोंडाचं बोळकं आणि त्या बोळक्या तोंडानंच ती बऱ्याचदा काहीतरी बडबड करायची. तिला पतवंडांना म्हणजे मला आणि बहिणीला कुरवाळायला आवडायचं. दिसत काहीच नसल्यानं ती स्पर्शानेच आम्हाला पहात होती. ती आमचे मुके घ्यायची. आम्हाला घट्ट कुशीत घ्यायला पहायची पण मला ते अजिबात आवडायचं नाही. तिच्या जवळ कसलासा वास यायचा. तो मला नकोसा असे. नंतर कळलं की ती सारखी तपकीर ओढायची अन् तांबूलही खायची. बहुधा त्याचाच तो वास असावा.

    आजोळी टाकरवणला आणि केसापुरी-परभणीला गोठा होता, गायी होत्या...आणि त्या गोठ्यात येणारा गायींच्या शेणा-मुताचा वास. तो भपकारा मला अजिबात आवडत नसे. माझा या वासाचा तिटकारा पाहून माझ्या आजीच्या भावांना मजा वाटे. मला ते धारोष्ण दूध प्यायला बोलावीत, ज्याला माझा स्पष्ट नकार असे. मग मला चिडवण्यासाठी ते विचारत, मग तू घरी दूध कसं पितोस ? त्यावर माझं ऊत्तर : आम्ही गायी म्हशींचं दूध नाही पीत. आम्हाला दूधवाले काका आणून देतात.

    दुसरी आठवण नगरला आल्यानंतरची. आम्ही जिथं रहायचो, तिथं एक मोठा वाडा आमच्या घराला चिकटूनच होता. तो होता गवळ्यांचा वाडा. पाच भाऊ त्यांच्या कुटूंबांसमवेत तिथं राहत. त्यातले चार दूधाचा व्यवसाय करायचे. एका कडे म्हशी आणि गोठा होता. ते म्हशींना धुवायला नदीवर घेऊन जात. त्याची गंमत म्हणजे आम्ही जिथं राहत होतो तिथं अगदी अरूंद बोळातून जावं लागे. साधारण शंभर मिटरचा तो अरूंद बोळ...जेमतेम एक माणूस किंवा एखादी दुचाकी जाऊ शकेल एवढंच. तिथनं या म्हशी जायच्या, एकामागून एक, संथपणे...लांबच लांब शिंगांच्या, जाफराबादी. आम्ही मोजायचे. नक्की आठवत नाही पण साधारण दहा बारा असतील. त्या जाईपर्यंत आणि पुन्हा परत येईपर्यंत ती बोळ पूर्णतः बंद ! कोणीतरी पुकारा करी... म्हशी आल्या रे... एखादा माणूस त्या बोळातून येत असेल तर तो मागं फिरे. पण जर दुचाकीवर कोणी असेल तर मात्र पंचाईत ! मागे घेणं अवघड. त्यात कोणी डबल सीट असेल तर अजून अवघड. कित्येकदा म्हशींनी अनेकांना पाडलंय. तर या म्हशी जातानाही हा वास यायचा आणि गवळी वाड्यातल्या बऱ्याच जणांच्या कपड्यांना देखील तो येई.

    नगर टांग्यांसाठी प्रसिद्ध होतं. रिक्षांच्या पूर्वी टांगा हेच साधन होतं गावात फिरायचं. बस स्टँडबाहेर टांग्यांचं स्टँड होतं आणि तिथंच कुठंतरी घोड्यांना पाणी पिण्यासाठी हौद होता. शहरात अनेक ठिकाणी तसे हौद होते. त्या टांगा स्टँडजवळ घोड्यांच्या लीदीचा भपकारा येई. तो गोठ्यातल्या वासाच्याच पठडीतला पण जरा बऱ्या बाजूचा!

    मेंदी हा प्रकार पहिल्यांदा कळाला तोही आजोळीच, टाकरवणला. तिथं लग्न म्हणजे दारात मांडव, अंगणात मोठा चुलाणा, त्याच्यावर स्वयंपाक, गावातले जमतील ते सर्व मदतीला आणि रात्री गप्पाष्टक. त्याच गप्पांमध्ये मेंदी लावणे हा कार्यक्रम. मला मेंदी हा प्रकार माहीत नव्हता तेंव्हा मला सगळ्या मोठ्यांनी चिडवलं की हाताला शेण लावणार आहेत आणि मग मी लांब कुठेतरी जाऊन बसलो. नंतर दुसऱ्या दिवशी हातांचे रंग पाहून हरखून गेलो. नंतर कधी कोण जाणे, बहुधा वृषाली मेंदी काढायला लागली तेंव्हा असेल, त्याच्या गंधाची जाणीव झाली. मी मुग्ध झालो. दुसऱ्या दिवशीही हातांना येणारा तो वास भरभरून घ्यावासा वाटला आणि आताही मी तो जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा भरभरून घेतो.

    दवाखान्याचं पहिलं दृश्य लक्षात आहे ते ग‌ॅस/स्टोव्हवर सिरींज आणि सुया ऊकळत ठेवल्याचं. आणि वातावरण निर्मितीला स्पिरीटचा वास. लहानपणी खोकल्याचा त्रास व्हायचा आणि मग पेनिसिलीनचा कोर्स सुरू व्हायचा. पाच दिवस इंजेक्शन्स. इतर वेळीही मग कुठे पडापड झाली की ड्रेसींगला दवाखान्यात. तेंव्हाही टी.टी. चं इंजेक्शन. ते देण्याआधी स्पिरीटच्या बोळ्याने साफ करताना त्याचा मस्त वास यायचा आणि त्वचेला गार सुखद स्पर्श जाणवायचा! आयोडीन टिंक्चरने जखम साफ करताना आग तर व्हायची पण त्या टिंक्चरचा वासही आवडायचा! दोनदा काटेरी तारांनी हात आणि पायाची कातडी फाटली होती तेंव्हाच्या जखमा लक्षात आहेत आणि ड्रेसींगही. पण इतर अनेक किरकोळ जखमा डेटॉलवर भागल्यात आणि डेटॉलने त्याचा वास स्मृतींत पक्का केलाय.

    शिरीष. हे नाव तसं धीर-गंभिर. शिरीषाच्या प्रौढ व्यक्तिमत्वाला साजेसं. त्या फुलांचा रंगही काही आकर्षक वगैरे नाही. आपल्या आई-बाबांच्या पिढीतल्या कुणीतरी जसं नविन कपडे घ्यायला जावं अन् मळखाऊ रंगाचे कपडे घेऊन यावे तसं. तसाच त्या फुलांचा सुवासही. फार काही भडकपणा त्यांना झेपत नाही. आपला मंद सुगंधच बरा! परळीला असताना, रात्रीचं जेवण झाल्यावर फेरफटका मारायला सिंचन भवनला जाताना रस्त्यात दोन-तीन शिरीषाची झाडं होती. तिथली पहिली भेट. तेंव्हा त्यांचं नाव ठाऊक नव्हतं.आम्ही त्या फुलांचा दाढीचा ब्रश करायचो. आता जर दाढीच्या क्रीममध्ये हा सुगंध आला, तर मला ती क्रीम नक्कीच आवडेल.

    लहानपणी चक्का खेळायचो. कुठल्यातरी गाडीचं टायर कुठूनतरी मिळवायचं.त्याला आम्ही चक्का म्हणायचो. चक्का जाम मधल्यासारखं. (दह्याचा चक्का कळाला तेंव्हा मजा वाटली होती) मग त्या चक्क्याची शर्यत लावायचो. कधी काठीनं तर कधी हातानं तो पळवायचा ! तो रस्त्यावरनं, मातीतनं,चिखलातून, गवतातून, शेणातून, रस्त्यावरून असा पळवायचा. तो पळवून हाताला एक विशिष्ट वास येतो...रबरी वस्तूंना येतो तसाच काहीसा, पण बाकीच्या वस्तूस्पर्शांमुळे काहीसा बदललेला. गाडीचं टायर बदलतांनाही तसाच काहीसा वास हाताला येतो.

   इवली इवलीशी ती रंगरहित फुलं. गुच्छांमध्ये फुललेली. कुणी त्यांची दखल घ्यावी असं काही नाहीच. त्यातून ती कडूलिंबाची फुलं....

    चैत्र-पाडव्याच्या सुमारास कडूलिंब पूर्ण बहरात येतो. ऊन्हाळ्याचे दिवस सुरू होतायत. ऊन्हं तापायला लागलीयत पण अजूनही वसंताची शोभा टवटवीतच आहे असा हा काळ. सकाळच्या मंद गार झुळूकेबरोबरच येणारा अन् धुंद करून सोडणारासा सुगंध. आपल्याला कसला तरी वास येतोय हेही लक्षात येणार नाही इतका मंद पण आपलं मन आणि वातावरण प्रसन्न करून सोडणारा असा मधुर. नगरला असताना वरच्या खोलिच्या पत्र्याच्या छतावर जाऊन बसणं हा माझा आवडता उद्योग. त्याच ठिकाणी मागच्या वाड्यात उभ्या असणाऱ्या लिंबाची फांदी तिथे आली होती. त्या फांदीला ही फुलं लगडली होती आणि कधीतरी रात्री तारे पाहत बसलेलो असताना मला त्यांंचा साक्षात्कार झाला आणि मग मी त्यांच्या प्रेमात पडलो. आता कधीही कुठेही हा मंद सुगंध आला की मी तो ओळखू शकतो.

    शाळेत सातवी आठवीत असताना रस्त्यात एक बंगला होता. राहता नव्हता. कसल्यातरी दुकानाचं गोदाम म्हणून तो वापरला जायचा. त्याच्या आवारात एक प्रचंड बुचाचं झाड होतं. त्याची फुलं रस्त्यावर पडत. ती थोडी निशीगंधासारखी दिसणारी पण वेगळाच सुगंध असणारी फुलं आम्ही उचलून घ्यायचो. तो सुगंध मोहक होता. त्या वेळी त्या फुलांचं नाव माहित नसावं कदाचित. पण त्यांनी मनात घर केलं,आणि कालांतराने कधीतरी ओळखही पटली...

    शिक्षक वर्गात नसताना बऱ्याचदा बाकावर डोकं ठेऊन बसायचो/झोपायचो. त्या लाकडी बाकांना एक विशिष्ट वास असतो. प्रामुख्याने लाकडाचा पण त्यात अजून बरेच वास मिसळून तयार झालेला... शाई,डब्यात आणलेले पदार्थ सांडून, वर्षानुवर्षे धूळ साठून, पोरा-टोरांचे घामट हात घसटत राहून आणि अशा बऱ्याच गोष्टी एकत्र होऊन तयार झालेला असा तो विशिष्ट वास.

    गौरी गणपतीच्या वेळी माझ्याकडे असलेल्या कामांपैकी एक म्हणजे माळ्यावरच्या पत्र्याच्या पेटीतून गौरी-गणपतीच्या सजावटीच्या वस्तू, पडदे, गालीचा इ. वस्तू काढायच्या. ती पेटी उघडली की एक विशीष्ट वास येई. सणाची, मंगलमय पर्वाची सुरुवात झाल्याची ती खूण असे. अत्तर, उदबत्त्या, सुगंधी पदार्थ, कापूर या सर्वांबरोबरच वर्षभर ठेऊन दिलेल्या कपड्याचा कुबटपणाही त्यात मिसळलेला असतो. त्यातच धूळ, काही कीटकांनी तिथे घर केल्यानंही तो विशिष्ट दर्प येत असेल. पण तो आवडतो. कारण ती सणाच्या सुरुवातीची खूण असते आणि मागल्या समृद्ध सणांचंही ते संचित असतं. दरवेळी या गंधांबरोबरच शांता शेळकेंची ' पैठणी ' कविताही हमखास आठवते.

     सणासुदीच्या तयारीत एक तयारी फराळ/गोडाधोडाचं करणे ही देखील असे आणि मग रवा / बेसन भाजतानाचा आईचा प्रश्न असे... वास येतोय का रे? आम्ही आमच्याच तंद्रीत घरात कुठेतरी काहीतरी करण्यात मग्न असताना तो खमंग वास नाकात शिरायचा आणि तोंडात पाणी येणं सुरू झालेलं असे. आईला पावती देतांना असं आमचं नाकही तयार झालं....

    संध्याकाळची जेवणं, गप्पा आटोपून, 'अंथरूण घालणे' हा कार्यक्रम करून मग सगळीकडे निजानीज होते. वेळ काही फार नाही. अगदी कुठे ८-९. विजेच्या दिव्यांचं प्रदूषण नाही. जर माळवदावर झोपलो असू तर वर चांदण्यांचं छत अन् त्यातली अज्ञात विश्वं आपल्याकडे पाहतायत अशा कल्पना करत असताना कुठल्या तरी देवळातून भजनाचे सूर कानावर पडतात.देवघरात/देवाजवळ सांजवात करताना लावलेला दिवा एखादी खोली पिवळ्या केशरी प्रकाशानं उजळून टाकत असतो.दुसऱ्या कुठल्या कृत्रिम प्रकाशाची त्यात भेसळ नाही. त्याच्या मिणमिणत्या प्रकाशाबरोबर दोलायमान होणारे विचार, मन.... उगाचच झोप लागत नाही. दिव्याची ज्योत तेल संपल्यावर मोठी होते. फडफडते. मालवते. धुराची काजळी युक्त संपृक्त रेघ उमटते. घरभर तो दिवा मालवल्यानंतरचा विशिष्ठ वास भरून राहतो.

    शनिवारी मारुतीच्या देवळात गेल्यावर तेल ओतून कुळकुळीत काळी झालेली शनिची मूर्ती आणि तसाच काळा झालेला त्याच्या पुढचा दिवा, तेल, शेंदूर, धूप, ऊदबत्त्यांचा संमिश्र वास,धूरानं भरलेलं देऊळ,आणि त्यातच येऊन मिसळणारा बाहेर फोडलेल्या नारळांपैकी एखाद्या पावलेल्या नारळाचा वास. हा नगरच्या दिल्ली दरवाजालगतच्या शनी मारूतिच्या देवळातला माझा गंधानुभव. संचित. त्यालाच संलग्न असा दुसरा गंधानुभव हा दत्ताच्या देवळातला. तिथं तेल, धूप, शेंदूर, नारळ यांतलं काही नाही. देवळाबाहेर बसणाऱ्या फुलवाल्याच्या दुकानातील निशिगंधाचे हार...हीच माझी आणि निशिगंधाची पहिली गंधभेट!  

    पोस्टाच्या विशिष्ट वातावरणाबरोबरच अजून एक गोष्ट पोस्टाच्या आठवणींचा अविभाज्य भाग बनून गेलीय. तिथल्या मेजावरची डिंकाची बाटली. सगळीकडून ओघळ जाऊन, ते वाळून अन् त्यावर अजून नवे थर चढून डिंकमय झालेली ती बाटली आणि त्यात ठेवलेली काडी. या झाडापासून बनवलेल्या डिंकाचा उग्र वास. त्याचीही या गंधानुभवांत बरीच वर वर्णी लागते. दुसरी त्या डिंक अन् त्याच्या वासाशी निगडीत आठवण आजोबांची. त्यांच्याकडेही तशीच डिंकाची बाटली असे. त्यात नियमीत पाणीही घालावं लागे. नाहीतर डिंक वाळून जाई. स्वतः तो डिंक तयार करण्याचं समाधानही वेगळंच. पतंग उडवताना बऱ्याच वेळा फाटलेला पतंग चिकटवायलाही तो वापरला जाई. या डिंकाचा वास काही फार सुगंधी वगैरे नाही. उलट तो दुर्गंधीकडेच जाणारा पण गंधानुभव समृद्ध करणारा.

    डिंकाच्याच जात कुळीतील आणखी काही गोष्टी गंधवेडं करणाऱ्या. फेवीकॉल. कधी त्याच्याशी गाठ पडली ते नाही लक्षात पण त्याचा वास आणि बोटावर किंवा त्वचेवर तयार होणारा पापुद्रा या गोष्टी हे खेळणंच झालं. तीच गत रबर चिकटवायच्या सोल्युशन ची. बाबा सायकलचं पंक्चर घरीच काढायचे. एका टोपल्यात पाणी, हवा भरायचा पंप, रबरी ट्यूब चे तुकडे, कात्री, कानस आणि ती लाल पिवळी, हळदी कुंकवा सारखी दिसणारी सोल्युशन ची ट्यूब. त्या ट्यूब मधे लाल रंगाचं पारदर्शक सोल्युशन असे. ते बोटावर घेतलं की त्यातली सेंद्रीय द्रव्ये उडून जायला लागतात. मग बोटाला गार लागतं आणि त्या सेंद्रीय द्रव्याचा एक वास नाकात शिरतो. भयंकर आवडतो मला तो. काही वेळानं त्यातली द्रव्यं पूर्ण उडून गेल्यावर एक पापूद्रा बोटावर तयार होतो. तो ही काढायला मला आवडतं.

   काही गंधांबरोबरच्या आठवणी अमूर्त. त्यांची विशिष्ठ अशी आठवण नाही पण तो गंध आला की समोर आपोआप एक दृश्य तयार होतं. अनेक अनुभवांची ती सरमिसळ असेल, सार असेल... दंवारलेल्या सकाळी गारवा भरल्या हवेत चमकदार सोनेरी किरणांनी प्रवेश करावा, त्याची ऊब जाणवावी, हवीहवीशी वाटावी. कुठेतरी कुठल्यातरी कोनातून एक दंवाचा थेंब चमकून जावा. तसा तो दिसत/सापडत नाहीच. मग प्राजक्ताचा सडा वेचायला जावं. ओलसर जमिनीवर पडलेली पांढऱ्या पाकळ्या अन् केशरी देठांच्या फुलांची नक्षी. आसमंतात भरून राहिलेला त्यांचा सुगंध. थोड्याशा वाऱ्याच्या झुळूकीबरोबर की आपल्या श्वासोच्छवासाच्या आघातानं कळत नाही, आणखी काही फुलं टपटपतात.

    पाऊस पडल्यानंतरचा मातीचा सुगंध. त्याच्यावर  बऱ्याच जणांकडून बरंच लिहून झालंय....तोच सुगंध कडक ऊन्हात तापलेल्या भिंतींवर पाणी मारल्यावरही येतो. आणि त्याच सुगंधाच्या काही इतर आवृत्त्याही आहेत. म्हणजे वाळलेल्या पानांच्या राशींना पाऊस चींब ओलं करतो, तेंव्हा त्या पानांच्या राशींनाही एक सुगंध येतो आणि तो मातीच्या सुगंधाच्याच कुळातला अन् त्याच तोडीचा. जळणाऱ्या लाकूडफाट्यावर, पेटलेल्या पाला-पाचोळ्यावर पाऊस पडून ती आग शमते आणि दुसऱ्या दिवशी त्यातून एक जळकट सुगंध उमलतो तो ही अवर्णनीयच असतो.

    बीडला मामाच्या घराशेजारचा रिकामा प्लॉट एका राजस्थानी सुताराला दिलेला होता. मामाकडे गेलं की त्या सुताराकडे जाऊन बसायचो. दारं करणं, फळ्या कापून रंधा मारणं, काही नक्षी काढून ती कोरणं, फळ्यांना खाचा करून दुसऱ्या फळ्या त्यांत बसवणं, सांधे जोडणं इ. त्याची चाललेली कामं मी पाहत बसायचो. सगळीकडे लाकडाचा भुसा, रंधा मारताना निघालेल्या लाकडाच्या वळ्या पडलेल्या असत. त्याबरोबरच लाकडाचा वास. तो वास हाही एक अनुभवच. लाकडाच्या कुठल्याही वखारीत तो येतो. तसंच लाकूडकाम करतानाही तो येतो. एकदा त्या सुताराकडे कुठूनतरी चंदनाचं लाकूड आलं होतं. बाभूळ किंवा कडूलिंबाचं समजून कोणीतरी विकलेलं. कापताना त्याला सुगंध आला आणि मग त्याला कळालं. मला वाटतं की तेंव्हाच पहिल्यांदा चंदनाचा सुगंध घेतला असेल मी. लाकूडकामाबरोबरच आणखी एक काम म्हणजे लाकडाला वार्निश करणं. त्या वार्निशचा वासही पेट्रोलियम मंडळींच्याच संगतीचा! बहुधा माझा पहिला अनुभव. आता लाकडाचा वास नकोसा होतो.  कारण त्यामागे मेलेलं झाड,त्याचं ते प्रेत, त्यावरचे मोडलेले पाखरांचे संसार आणि उद्ध्वस्त निसर्ग दिसायला लागतो. 

     गवतातही बरेच गंध दडलेले असतात. नुसतं बागेतल्या हिरव्या गवतात लोळलं तरी एक गंध जाणवतो. गवत कापल्यावरही एक वेगळाच गंध जाणवतो. हा गंध नुसतं गवतात लोळल्यावर येणाऱ्या गंधापेक्षा वेगळा असतो. मोकळ्या मैदानात/जंगलात/डोंगर-उतारांवर कमरेएवढं वाढलेल्या गवतात येणारा गंध वेगळाच. त्यातच गवताच्या अनेक सुगंधी जातीही...केरळातल्या चेंब्रा माथ्यावर जाताना लागलेल्या जंगलात गवती चहा माजला होता. कंबरेएवढा! जेंव्हा तोडून वास घेऊन पाहिला तेंव्हा आश्चर्याचा धक्का होता तो आम्हाला. लहानपणी नागरमोथ्याचे कंद जमिनीतनं उपटून काढायचो. त्याचा तो मातकट सुगंधही गवत सुगंधांच्या स्मृतींत बसलेला. वाळा ही त्यांचाच भाऊबंद. ऊन्हाळ्यात नव्या माठातलं वाळा घातलेलं थंड पाणी पिणं हे एक श्रीमंती सूख (पण खरंतर गरीबाघरीच मिळणारं)!

    सिनेमा थिएटरमधील एक गंध कायम लक्षात राहील. बंद थिएटरमध्ये कोंडून राहिलेला गंध. मुख्यतः सिगरेटचा धूर, खाद्यपदार्थ (भजी, समोसे, वडे इ.), पान, तंबाखू आणि गुटखा कुठल्यातरी कोपऱ्यात थुंकल्याचा, दमट अंधाराचा (हो, हाही एक गंध असतो, तो अनुभवावाच लागतो), जून होत चाललेल्या भिंती, पडदे, खुर्च्या इ. सगळ्याचा सरमिसळ झालेला असा तो ' थिएटरचा '  गंध ! मल्टीप्लेक्स च्या आधीच्या जमान्यातला ! नाट्यगृहांमध्येही (नाटकांची) काही गोष्टी वजा जाता तो येतोच. सिगरेटचा धूर थोडा कमी,गुटखा तंबाखू कमी, जून पडदे, खुर्च्या जास्त, त्यात थोडी अत्तरे, अशी त्याची रेसिपी सांगता येईल.

    घट्ट बांधलेली त्वचा खूप काळानं मोकळी झाल्यानंतर त्या ओलसर त्वचेलाही एक वास येतो. नक्की काय रासायनीक संयुगे,रेणू ,आणि क्रिया यात समाविष्ट आहेत कोण जाणे....
    मोज्यांचा दुर्गंध काय असतो ते तो अनुभवलेल्यांनाच माहित ! मी मास्टर्सला असताना माझ्या मोज्यांना तो दुर्गंध येत असे. त्यामुळे माझ्या रु.पा. नी काय सहन केलंय ते मला माहित आहे आणि त्यासाठी मी त्यांचा आयुष्यभराचा ऋणी राहीन.माझ्या पायांना फार पटकन घाम येतो आणि त्यात आणखी भर म्हणजे मी मुंबईत राहत होतो. तिथलं दमट हवामान ! आम्ही रोज कॉलेजला दोन तीन कि.मी. येणं जाणं करायचो, त्यानंही घाम अन् दुर्गंधीत भर. रूमवर पोहचल्यावर माझं पहिलं काम म्हणजे शूज गॅलरीत नेऊन ठेवणं. कॉलेजला असताना रोज मोजे धुणं माहीत नाही! आणि मग कुठंही गेलो आणि शूज काढावे लागतील असं वाटलं की भयंकर लाजीरवाणं व्हायचं. मोज्यांवर जंतूनाशक पावडर जी फक्त याच कारणासाठी मिळते, ती देखील वापरून पाहिली....पण नाही. आजही त्या आठवणींनी लाजिरवाणं होतं.
    मास्टर्सला असतानाच नाशिकला अतुलकडे गेलो होतो. आम्ही पाच सहा मित्र त्यांच्या गच्चीत झोपलो होतो. तेंव्हा धुंद करणारा सुगंध पसरला होता. दुर्लक्ष न करता येण्यासारखा. ठसठशीतपणे आपली ओळख सांगणारा.तेंव्हा कळलं हा रातराणीचा सुगंध आहे हे. तोपर्यंत तो फक्त ऐकूनच माहीत होता; त्याचं अन् सापांचं समिकरणही ऐकून माहित होतं. आता विश्वास बसू शकतो की त्या सुगंधानं साप वेडे होऊ शकतात.

    धरणं, मोठमोठे जलाशय अशा मोठ्या गोड पाण्याच्या साठ्यांजवळ सहसा एक वास येतो. माहित नाही नक्की कसला पण बहुधा माशांशी निगडीत असा तो वास. कधी कधी वाटतं की नुकत्याच मेलेल्या माशांचा किंवा त्यांच्या विष्ठेचा तो असावा. लांबूनच हा वास येतो, अन् त्याबरोबर हवेतली आर्द्रता, दमटपणा वाढत जातो. मग ओळखावं जवळपास जलाशय आहे. ह्याचा पहिला अनुभव आणि आठवण आम्ही पैठणचं धरण पहायला गेलो तेंव्हाची.

    इकडं दक्षिणेत आल्यावर गंधानुभवांत बरीच भर पडली. मुख्यतः रस्त्यालगतच्या "सागर" आणि "दर्शिनी" उपहारगृहांत मोठ्या चौकोनी लोखंडी तव्यावर दोसा आणि उत्तप्प्याचं पीठ पडतं आणि वाफा निघतात तो गंध, त्यातच उत्तप्प्यावर चिरलेल्या बारीक कांद्याचा एक थर चढतो,आणि तो कांदा परतला जातो तेंव्हा येणारा एक खमंग वास ही दक्षिणेतली खासीयत.

  

अजून तशी एक भली मोठी यादी आहे. हळूहळू उतरवावं म्हटलं.

 

 

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.