शनिवार, ९ जून, २०१२

सायकल

सायकल चालवायला मी दुसरीत असतानाच शिकलो. त्यावेळी काही दोन्ही बाजूंनी चाकांचा आधार असलेल्या छोट्या सायकली नव्हत्या. बाबांच्या मोठ्या सायकलवरच मी शिकलो.

आम्ही त्यावेळी माजलगाव जवळच्या इरिगेशन कॉलनीत राहायचो. बाबा नगरहून नवी सायकल घेऊन येणार होते. खूप उशीर झाला त्यांना यायला संध्याकाळी. बसच्या टपावर टाकून ते सायकल घेऊन आले होते. आणि मग माजलगावहून चालवत. चांगलं १०-१२ कि. मी. चं अंतर असावं. त्यात चढ. (आधीची सायकल चोरीला गेली होती. ती आजोबांची होती ...)   मी आणि माझं मित्रमंडळ बाबांची वाटच पाहत होतो. केवढं कुतूहल होतं येणा-या नव्या सायकल बद्दल... आणि सायकल आल्यावरचा हर्ष.....कॉलनीत जेवढे ओळखीचे होते, तेही आले होते सायकल पाहायला. त्यांनाही केवढं कौतुक, कुतूहल... कोणत्या कंपनीची आणली.... केवढ्यात बसली वगैरे.....
आणि मग या नव्या सायकलवर माझं शिकणं सुरु झालं. पाय पुरणं तर शक्यच नव्हतं. मग आधी डावा पाय डाव्या पॅडल वर ठेवून उजव्या पायाने वेग घ्यायचा. असं बरंच अंतर जावं लागे. मग बऱ्यापैकी वेग आलाय असं वाटलं कि पटकन उजवा पाय सायकलच्या त्रिकोणी फ्रेम मधून पलीकडे टाकायचा. इथेही पॅडल पूर्ण मारताच यायचं नाही. मग अर्धं  पॅडल मारत मारताच सायकल चालवायची... हे सर्व चालू असताना बाबा आधी मागून सीटला धरून पळत, आणि मग मध्येच कधीतरी सीट सोडून देत, पण मागेच पळत राहत. असं मी त्यांना खूप पळवलंय. शिकायला फार दिवस लागले नाहीत. पण मग रोज बाबा ऑफिसमधून आले कि सायकल पळवायला न्यायचो. अख्या कॉलनीत सायकल पळवायचो. मित्रांबरोबर अशी "कैची" पद्धतीने सायकल चालवायच्या शर्यतीही व्हायच्या. गुडघे तर कित्येक वेळा फुटायचे. आणि त्या सायकलचे तर पाडून पाडून एवढे हाल केले कि सायकल दुकानदार सर्व्हीसिंगच्या वेळी ही नवी सायकल आहे यावर विश्वास ठेवायलाच तयार होईना.
आजोबाही सायकल चालवायचे हे माहित होतं. त्यांना सायकल चालवताना मात्र कधी पाहिलं नाही. पण त्यांच्याकडे दोन लोखंडी क्लिप होत्या. त्या म्हणे पँट चेन किंवा चाकात अडकू नये म्हणून  पँटला लावून सायकल चालवायचे.

बाबा आम्हाला कुठेही बाहेर घेवून जायचे ते याच सायकलवर. सायकलच्या त्रिकोणी  फ्रेमच्या आडव्या दांडीवर सीट बसवलं होतं आणि पुढच्या चाकामागच्या दांडीवर पाय ठेवायला पट्टी. मी मागे कॅरिअरवर बसायचो तर छोटी बहिण पुढच्या सीटवर. मी सायकल शिकल्यावर बहिणीला बसवून न्यायची भारी हौस. ती नको म्हणत असताना तिला सायकल वर बसवून चक्कर मारायला गेलो आणि दोघेही पडलो. तेंव्हापासून तिने माझ्याबरोबर डबलसीट बसायचा धसकाच घेतला..   
एकदा मामाकडे गेलो होतो. तिथे एक रु. वर एक तास अशी भाड्याने सायकल आणून खेळायचो. अशीच एकदा ही सायकल घेऊन फिरत होतो. सायकलला ब्रेक नव्हते. एका म्हातारीला जाऊन धडकलो. ती कळवळून म्हणाली, टाका बाबा मारून तू तरी म्हणजे सुटेन एकदाची...
भाड्याच्या सायकलचे असे किस्से नेहमी व्हायचे कारण त्या कधीच नीट मेंटेन नसायच्या.

दर आठवडे  बाजाराला बाबा मला सायकलवर बसवून न्यायचे. येताना भाजीपाल्याने अन फळांनी गच्च भरलेल्या दोन पिशव्या हँडलला असायच्या.  
एक दोनदा तर भयंकर वादळातून आमची सायकल फेरी निघाली. म्हणजे ओपन थेटर मध्ये आम्ही पिक्चर पाहायला गेलो अन वादळ आणि पाऊस सुरु झाला. पिक्चर तसाच सोडून उठावं लागलं. बाबांना सायकल चालवणे मुश्कील झाले. शेवटी ते खाली उतरले आणि ढकलत घरापर्यंत सायकल आणली.

आणि सायकलचंं पंक्चर काढताना पाहायला तर भारी आवडायचं. रबर चिकटवायच्या सोलुशनची लाल पिवळी ट्यूब आणि त्याचा तो वास अजून आठवतो. आन ते लाल जेल सारखं सोलुशन हातावर पापुद्रा येईपर्यंत वाळू द्यायचं आणि तो पापुद्रा काढायचा हा आवडता खेळ. कधी कधी वाटतं कि एवर युथ ऑरेंज फेसपॅकची कल्पना याच्यावरून सुचली कीं काय. 
सायकललाही छान सजवायची पद्धत होती (हे प्रत्येकाच्या शौक नुसार !!!) . मुठींना झिरमिळ्या असायच्या....कुशनचे रंगीत सीट कव्हर असायचे. सायकलच्या चाकांच्या तारांमध्ये रंगीत मणी असायचे. पिक्चरची नावं किंवा चित्रं असलेले रबरी मडगार्ड मिळायचे  आणखी बरंच काही मिळायचं यासाठी... 


चौथी पाचवी पर्यंत अशीच सायकल चालवली. प्रगती म्हणजे फुल पॅडल मारता यायला लागलं. मग सहावी सातवीला त्रिकोणी फ्रेमच्या दांडीवरून अन मग सीटवरून अशी प्रगती झाली.
 आठवीनंतर शनिवारी शाळेत सायकल न्यायला मिळाली. केवढा भाव खायचो सायकल शाळेत नेल्यावर. आणि दहावी ते डिग्री पर्यंत हीच आमची सखी सोबतीण झाली.    
 
 मग घरी M80 आली तरी एवढं कौतुक नाही वाटलं जेवढं सायकल आल्यावर वाटलं होतं. तीच गत स्वतःच्या कमाईची गाडी घेतल्यावर...तेंव्हाही एवढं कौतुक नाहीच. 

हे सगळं का आठवतंय ? तर आज स्वतःच्या कमाईची सायकल घेतलीय. हा सगळा चित्रपट डोळ्यांसमोरून सरकतोय... 


शनिवार, २ जून, २०१२

प्रश्न

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात  प्रश्न पडणंही कमीच झालंय पण तरीही मला कधी कधी प्रश्न पडतात .....

शिवाजी महाराज किंवा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू किंवा लाल बाल पाल त्रयी यांना त्यांची आई बोर्नविटा किंवा होर्लीक्स किंवा बुस्ट हेच प्यायला द्यायची का ?
कारण त्याशिवाय ते मोठे कसे होतील ? 

पूर्वीच्या बाया आणि बाप्ये केसांना काय लावायच्या? म्हणजे त्यांचे केस लांब आणि काळेभोर कसे व्हायचे ? 

इंग्रजांच्या डोकेदुखीला कंटाळून सर्वच जण डोकेदुखीच्या गोळ्या घेत असतील, नाही ?

आणि इतिहासात कुणीच कसं जाड नव्हतं ? अगदी अफजलखानही धिप्पाड होता पण जाड नसावा....
काय खायचे अन कुठल्या जिममध्ये  जायचे ते ?

    

आणि आपलं तोंड किती घाण आहे हे आपल्या पूर्वजांना माहीतच नसेल. (जाहिरातीत नाही का कुठे कुठे लपलेले किटाणू दाखवतात.. टॉयलेट क्लीनर आणि टूथ पेस्ट च्या जाहिरातींतल्या साम्यावरूनच हे ओळखून घ्यावं .) नाहीतर त्यांनी माकडछाप काळं दंतमंजन कशाला वापरलं असतं ? (पलीकडच्या आजोबांचे दात अजूनही चांगले कसे राहिले कोण जाणे...कोणती टूथ पेस्ट वापरायचे ते लहानपणी ? अजून ऊस सोलून खातात)


   माणूस उत्क्रांत खराच... नाहीतर लांडोरीला आकर्षित करण्यासाठी मोराला किंवा मैनेला आकर्षित करण्यासाठी मिस्टर कोकीळला deodorant सारखा सोप्पा पर्याय का नाही सुचला ?

आणि मी शास्त्र उगाच शिकलो. त्यात साबण म्हणजे काय, तो कसे कार्य करतो ते सांगितलंय. साबण म्हणे पृष्ठीय तणाव कमी करून तेलकट पदार्थ पाण्यात विरघळायला मदत करतो आणि अशा प्रकारे हातावरची घाण अन किटाणू धुवून जातात. मरत नाहीत. (मेले तर ते मुख्यतः साबणाच्या pH अर्थात सामू मुळे) . पण जाहिरातीत मात्र काय काय सांगतात...तेच खरं असावं नाही का ? म्हणजे अमुक एक साबणच किटाणूंना मारून टाकू शकतो. आणि अमुक एक साबणच तुम्हाला सुंदर बनवू शकतो (हे तर शास्त्रात शिकवलंच नव्हतं ) शिक्षण बोर्डाने सर्व जाहिरातीतील माहितीची आणि त्यांच्या शोधांची दाखल घेवून अभ्यासक्रम बदलायला हवा.

अरे हो, आणि भाजीवाले काका, फुगेवाले काका यांच्यापासून किटाणूंचा फैलाव होतो हेही शिकवायलाच हवं.उष्ण आणि कोरड्या प्रदेशातील घरांची छपरं धाब्याची असतात, तर खूप पाऊस असणाऱ्या भागातील घरं ही उतरत्या छपरांची अन कौलारू असतात.
शेकडो वर्षांचा अनुभव गाठीला घेऊन माणसाने ही रचना केली न ? मग आता हे सारं कालबाह्य आणि भूगोलाच्या पुस्तकापर्यांतच मर्यादित होऊन बसलंय, असं का ?

तंत्रज्ञान प्रगत झालं हे खरं पण त्याने फक्त पक्की घरं बांधण्याबरोबरच तिथल्या वातावरणाला साजेशी घरं का बांधली जात नाहीत ? उन्हाळ्यात concrete तापतं, मग AC बसवा... धाब्याच्या घरांत कसं थंड असायचं...
तंत्रज्ञानाचा अविचारी वापर आपल्याला कुठे घेऊन जाईल ? 

आणि आजकाल मंत्रीमंडळाच्या शपथविधीत किंवा त्यानंतर आणखी एक शपथविधी का नको? म्हणजे घोटाळे करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बाजाविनच असा ....

आणि दंगे, बंद, कुठल्याही क्षुल्लक कारणावरून चालणारा गदारोळ यात भारताची जी उर्जा वाया जातेय, त्यात एखादा अणुउर्जा प्रकल्पाच्या तोडीचा प्रकल्प चालेल काय ?

आणखी बरेच प्रश्न... म्हणजे बिन झाडांची पृथ्वी किती छान दिसेल ?.... आपण सर्व झाडे संपवून टाकू... जंगलेही संपवू. (कोळशाच्या अन कशाकशाच्या खाणी जंगलातच राहिल्यात ना आता.... त्याशिवाय नासायला, जाहिरात फलक झळकवायला वीज कशी मिळणार?)
शेतजमिनीही NA करून बंगले बंधू... शेतांचं काय... आत्महत्या करणारे शेतकरी करतीलच काहीतरी.

२५० फुट, ४०० फुट, ८५० फुट, ११०० फुट.....आणखी किती खोल जात राहणार आणि आणखी किती छिद्रे पाडणार या पृथ्वीला ? आणि जे पाणी भूगर्भात आहे ते कधी संप(व)णार? मी बोर-वेल बद्दल बोलतोय. ११०० फुट ही आमच्या बिल्डींग मधील आजची परिस्थिती आहे, जी तिसरी अशी बोर-वेल आहे. आजूबाजूला रोज एक बोर घेणं चाललंय.....
पावसाचं पाणी स्वतः पुढाकार घेऊन नाही साठवता येणार का? कि त्यासाठीही शासनाने नियमच करायला हवाय ? 

हल्ली रस्त्यांवर पाहतो....कारमध्ये फक्त एकच जण बसलेला...बाकी ३-४ सीट रिकाम्याच....म्हणजे आपली एफिशियन्सी १/५ आहे नाही? आणि अशा कारमुळे जी जागा रस्त्यांवर अडते, त्यामुळे वाया जाणाऱ्या  कार्यक्षमतेचं काय ?
मला कारण माहित आहे. कंपन्या याला प्रोत्साहन देतात. त्यांच्या म्यानेजर्सना टिकवून ठेवण्यासाठीच्या योजनांपैकी ही एक. वाढलेल्या पेट्रोलच्या किमतीचं त्यांना काय ? मग या १/५ एफिशियन्सीचा बोजा कुणावर टाकायचा ? हाही एक प्रश्नच...

आणि याच तथाकथित सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोकांच्या कार मधून कचरा रस्त्यांवर फेकला जातो तेंव्हा त्यांच्या सुसंस्कृत आणि सुशिक्षितपणाचं पारितोषिक कुणाला द्यायचं ?

डार्विन एक थेअरी लिहायला विसरला वाटतं... म्हणजे सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट असं तो म्हणाला. म्हणजे माणूस... पण माजोर्ड्यांचा विनाश हे लिहायला विसरला तो.  म्हणजे डायनोसोरचा झाला तसाच....


  

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.