कंडक्टर आपल्याला परिचित असतो सुट्या पैशांसाठी हुज्जत घालण्यावरून! पण हा कंडक्टर जरा वल्ली होता.
मुंबईची बेस्ट! गाडीत ब-यापैकी गर्दी. अंधेरीहून माटुंग्याला चाललो होतो. एक खेडूत बाई बसमध्ये चढली. तिकीट काढल्यावर तिला उरलेले सुटे पैसेही मिळाले, पण त्यातील दोनचं एक नाणं काळं होतं. ती बाई कंडक्टरला म्हणायला लागली, अहो हे नाणं काळं आहे , चालणार नाही.
कंडक्टर म्हणाला, बघू ?
अहो याला पायाच नाहीत! चालणार कसं ? माझ्याकडे पाय असलेलं नाणं नाही!
आणखी एक प्रवासातला किस्सा. कुठल्यातरी खेड्यातला. बसला हीSSS प्रचंड गर्दी आणि त्यामुळे प्रत्येक जण जागा पकडण्यासाठी धडपडत होता . कुणी दारातून जोर जबरदस्ती करून चढतोय, कुणी आपत्कालीन खिडकीतून चढतोय तर कुणी खिडकीतून रुमाल, पिशव्या किंवा काहीतरी टाकतोय.
असाच एकजण दारातून चढून कसाबसा एका सीटवर जाऊन बसला. थोड्यावेळाने दुसरा एक माणूस येऊन त्याचाशी जागेवरून हुज्जत घालू लागला.
अहो ही जागा माझी आहे. मी पकडलीय.
कशावरून?
अहो मी इथे रुमाल टाकला होता.
उद्या तू ताजमहालावर रुमाल टाकशील आणि म्हणशील ताजमहाल माझा आहे म्हणून.
हो म्हणीनच!
माग तो शहाजहान का कोण तो, तुला हत्तीच्या पायाखाली दिल्याशिवाय राहील होय?
आता बोला !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा