सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

शब्द

 


माझ्यासारख्या गुराख्यांना नाही जमत ग्रेसबाबांसारखं वागणं. ते सहज बैलांच्या खांद्यावर जू टाकावा तसं शब्दांच्या मानेवर जू ठेवून भाषेच्या बैलगाड्या थेट गाडा शर्यतीत नेतात. किंवा घोड्यावर मांड ठोकावी तशी शब्दांवर मांड ठोकून शब्द चौखूर उधळून देतात.

पाहणारे डोळे चोळतात, डोळे पुसतात. अविश्वासानं किंवा डोळ्यात धूळफेक झाल्यानं. उधळलेल्या शब्दांनी केलेली. ते वेदनेचे अश्रू नसतातच मुळी.

वेदना कळावी लागते ती रात्रीच्या गुडूप अंधारात कोणीतरी उसासे टाकल्याचा आवाज येतो तशी. किंवा कोणीतरी हुंदका छातीत, गळ्यात किंवा ओठात दाबतो तशी. बाहेर पडली तर वेदना मोकळी होते. हंबरड्यासारखी. पण मग ती आपलीही राहत नाही. 

आम्हा गुराख्यांना फारतर गुरांना घेऊन चरून आणता येतं. किंवा त्यांचं शेण-मूत काढता येतं. एखादं वाघरु किंवा बिबट्या येऊन एखादं कोकरू घेऊनही जातो. आजकाल तर काय गाई दावणीलाच बांधलेल्या. जर्सी गाईंची औलाद. फक्त १०-२०ली. दूध काढायचं आणि शेण मूत आवरायचं.

त्या हंबरडा फोडत नाहीत बहुतेक. फक्त रवंथ करतात आणि शेणात बरबटतात.

ते लेख तरी कसे लिहितात? एखाद्या पाश्चिमात्य पुरुषाने ताटावर बसावं. आत रांधणं चाललेलं दिसतंय. अगम्य गोष्टी अगम्य पुरातन भांड्यातून भरडल्या, भाजल्या, ऊकडल्या जातायत, दळल्या जातायत, चूल भडकलेली, चुलीवर भांड्यात ही रटरट, काय चाललंय कळत नाही....मग ताटात गरम पुरणपोळी येऊन पडते, आमटीच्या वाटीबरोबर. चवीचा घास छान लागतो पण कसं खायचं ते कळत नाही आणि आतल्या रांधण्याचा आणि पुरणपोळीचा संबंधही जमत नाही. बरं त्या रांधणा शिवाय ताटातल्या स्वादिष्ट पुरणपोळीला अर्थ नाही....

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.