शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

तांबट

 माझा आवडता पक्षी कोणता असं कुणी विचारलं तर मी सांगेन तांबट. बऱ्याच जणांना तो माहितीही नसेल. त्याच्याशी नातं जुळलं माझ्या तारूण्याच्या संवेदनशील दिवसांत. इंद्रधनुष्यी दिवसांत. तसंच नातं जुळलं पांगाऱ्याशीही. आणि त्या दोघांनी माझ्या मनावर असा काही खोल ठसा उमटवला की तो कधीच मिटण्याची शक्यता नाहीय! ती एक अमूर्त भावना बनून राहिलीय. काही स्मृतींच्याही भावना होतात. प्रत्येक संवेदनशील अस्तीत्वाच्या अशा अनेक भावना असतील....व्यवहारी जगाने मान्यता दिलेल्या ५-६ भावनांच्या पलीकडच्या!

‌क‍ॉलेजला होतो. सकाळचं क‍ॉलेज (म्हणजे अगदी ७-७.३०). मी खिडकीशेजारी बसायचो. हिवाळ्याच्या दिवसांत कोवळं ऊन अंगावर घेत. तिसऱ्या मजल्यावर....

झाडांच्या, इतर ऋतूंत गच्च असणाऱ्या, आणि हिवाळ्यात निष्पर्ण होणाऱ्या फांद्या खिडकीतून दिसायच्या. टोकाची विरक्ती आणि सृजनोन्माद यांच्या सीमेवर समतोल साधणाऱ्या त्या फांद्यांबद्दल एक आकर्षण वाटायचं. तसंच आकर्षण मला दुपारी भीक्षा मागायला येणाऱ्या दोन साधूंबद्दलही वाटायचं. (बहिण तर मला आत्माराम म्हणून चिडवायची).त्यातल्या त्यात पांगाऱ्याचं झाड अन् फांद्या या परमोच्च स्थिती गाठायच्या!

अशा सकाळी, हवेत गारवा आणि ऊन्हात ऊब असताना, तांबटाची एकसूरी टुकटुक ऐकू येई. ही टुकटुक लहानपणापासून ऐकत आलेलो. तिचा ऊगम शोधायचा निरर्थक प्रयत्न बऱ्याच वेळा करून झाला होता. ह्या टुकटुकिचं साम्य लहानपणी ऐकलेल्या मोटेच्या इंजिनाच्या टुकटुकीशी वाटायचं.

 क‍ॉलेजात बसल्या बसल्या खिडकीतून नजर आपोआप शोध घ्यायला लागली...आणि सापडला! काय आनंद झाला होता तेंव्हा! एवढासा तो हिरवट-पिवळट जीव. जाडीभरडी चोच. चोचीजवळ मिशांसारखे चार दोन केस, डोक्यावर आणि गळ्यावर लाल टिळा! (वारकरी अबिर-गुलाल-बुक्का लावतात तसं वाटलं मला ते.) तसं पाहिलं तर रूढार्थानं त्यात सौंदर्य असं म्हणता येणार नाही...पण मला तो आवडला.

मला त्याची लकब आवडली. इकडून तिकडे झुलत झुलत टुक-टुक करण्याची. किती एकतानता त्या टुक-टुकीत. चोच न उघडता घशातून आवाज काढायची. कितीही वेळ त्याच सुरात ती टुक टुक चालू राहते. निवांत क्षणी, काही काम न करता ती ऐकत रहावी. तंद्री लागावी अशी. कुणाला ध्यान करायला प्रेरणा आणि वातावरण हवं असेल तर ती टुक टुक ऐकत रहावी. कुणा रसिकानं त्याचं नाव तांबट ठेवलं?

अगदी शहराच्या गदारोळातही शोधू गेलं तर सहज सापडणारी आणि सापडली की प्रयत्न करूनही साथ न सोडणारी. म्हणतात ना, मनापासून शोधलं तर इश्वरही सापडतो. त्याचाच प्रत्यय देणारी. तशीच एक गोष्ट अजुन आहे. रातकिड्यांची किर किर. तोच अनुभव. शोधलं तर सहज सापडेल अन् सापडली कि साथ सोडणार नाही. कुठं अन् कसं शोधायचं हे माहित हवं!

तो तांबट, त्याची ती लकब, अन् तो ज्या पांगाऱ्याच्या निष्पर्ण फांदीवर बसला होता, तिथं नुकतीच उमलू लागलेली लालचुटूक फुलं, अगदी त्याच्या गळा आणि डोक्यावरच्या लाल चट्ट्यांसारखी...ते दृश्य पाहत माझी तंद्री लागली. त्याच्या स्मृतींच्या भावना झाल्या. त्या भावनेत वैराग्य आहे, ऊन्मेष आहे, सृजनाच्या जल्लोषाची, नवनिर्माणाची, चाहूल आहे,एकतानता आणि ध्यान आहे, सगळं विसरायला लावणारं एक रिकामपण, रिक्तपण आहे....

कधी कधी ती मला माझ्या अस्तित्वाची देखील जाणिव करून देते.   


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.