शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

जाणीवपूर्वक बदल....

हल्ली ऐकू येणाऱ्या कँसरच्या बातम्या,राहणीमानाशी निगडीत व्याधी, हे बरेच दिवस डोक्यात फिरत होतं. त्यातच अमितचं अकाली जाणं (माझा चुलत भाऊ, माझ्यापेक्षा लहानच, ३५-४०च्या दरम्यानचा)चटका लावून गेलं.

 गेल्या वर्षभरात राहणीमानात जाणीवपूर्वक अनेक बदल केलेत. मुख्य म्हणजे ऑफीसच्या जवळ रहायला आलो....शहरापासून थोडं दूरच. जेंव्हा घर पहायला आलो तेंव्हा वाटलं होतं इतक्या आत रहायला जमेल का? कारण काहीही घ्यायचं झालं तरी दोन तीन कि.मी. तरी जावं लागतं. आजूबाजूला बरीच शेती. आणि लेआऊट (१२० एकर जागा) मधे जवळ जवळ ८०% जागा/प्लॉट रिकामे असल्यानं भरपूर मोकळी जागा. मी लहानपणी कॉलनीत राहात असताना असायची तशी. पण जसं राहायला आलो, तसं आवडायला लागलं....

ऑफीसच्या जवळ आल्यानं येण्या जाण्याचा वेळ वाचला. पेट्रोल वाचलं, प्रदूषण वाचलं....

मुलांना संध्याकाळी फिरायला नेणं सुरू झालं. शनिवारच्या आठवडी बाजारात (हो कारण हा अजूनही तसा खेडवळ भाग, इथं शहरीपणा आला असला तरी तो तसा नवखाच) जाणं सुरू झालं, ताजी भाजी, ताजी स्थानिक फळं आणनं सुरू झालं...बाहेरचं खाणं खूपच कमी झालं. नियमीत व्यायाम अन् आहार नियंत्रणानं वजन १३ किलोनं कमी केलं. आठवड्यातून एक दिवस ऑफीसला सायकल सुरू केली (जाऊन-येऊन २० कि.मी.)....

आजूबाजूला शेती असल्यानं आणि शहरापासून अलग असल्यानं, मोकळी आणि प्रदुषणमुक्त हवा हा मोठा फायदा!

सध्या राहात असलेल्या सोसायटीत पाणी रीसायकल केलं जातं आणि फ्लश साठी वापरलं जातं. त्याचं मानसीक समाधान बरंच मोठं आहे. ओला कचरा शेतात नेऊन टाकतो. त्याचं तिथे खत होतं. RO चं वाया जाणारं पाणी साठवून वापरायला घेतो.

मागच्या हिवाळ्यात तर एका गोष्टीनं आम्हाला चकित केलं. मागच्या बाजूच्या रस्त्यावर दोन वडाची झाडं आहेत. त्यांना फळंही आली होती. अचानक शेकडो पोपटांचा थवा तिथे मुक्कामी आला. रोज सकाळी बरोबर साडेसहाला तो प्रचंड कलकलाट करत उडायचा. आम्ही चहा घेत,पहाटेच्या (हिवाळा असल्यानं )संधीप्रकाशात ते पहायचो. उडायच्या आधी पंधरा एक मिनीटं ते चाचपडत झाडावरच कलकलाट करीत रहायचे, मग उडायचे. 

पावसाळ्यात कित्येक वर्षांनी काजवे पाहिले. एक काजवा चुकून गच्चीत आला होता. तो सापडल्यावर नजर शोध घ्यायला लागली आणि पलीकडच्या झाडीत अनेक काजवे दृष्टीस पडले.

कुंपणाबाहेरच्या एका झाडावर शिंजिरनं केलेलं घरटं अदितीने पाहिलं. मग तो कसा घरट्यात येतो, कसा अंडी ऊबवतो, पिलं अंड्यातून बाहेर आल्यावर कसं त्यांच्यासाठी खाऊ आणतो, पिलं कशी किलबिलाट करतात हे सगळं पहायला मुलांनाही मजा आली. पावसाळा सुरू झाल्यावर ठिपकेवाल्या मुनियाची घरट्यासाठी चाललेली लगबग,त्याचं ते हिरवीगार लंबलचक गवताची पाती घेऊन येणं, येता जाता समोरच्या तारेवर विसावणं, हे पाहण्यात सुद्धा मजा होती!  

निनादला घेऊन दर शनिवारी/रवीवारी सायकलवर जाणं सुरू केलं आणि त्या वडाच्या दोन झाडांपैकी एका वडाला बिलगलेल्या सायलीचा वेलही सापडला.  जवळची वाडी ओलांडून गेलं की केळीची आणि नारळाची बाग सापडली. नारळाच्या बागेत फणस, आंबा आणि इतरही अनेक झाडं आहेत. दरवेळेस काहीबाही फळं मिळायला लागली.

आजूबाजूच्या शेतीत नाचणीचं पीक घेतात. काही शेतांमध्ये झेंडू, शेवंती, गुलाब अशी फूलशेती होते. काही ठिकाणी कोबी, कोथिंबीरही लावतात. हे सगळं मुलंना दाखवता आल्याचं समाधान मोठं आहे.

संध्याकाळी फिरायला जाताना एकदा मोठा विंचू दिसला. मुलांना केवढा आनंद. पुण्या-मुंबईत तर आता दिसणारही नाहीत विंचू. सूर्योदय-सूर्यास्त देखील नेहमी पाहता येतोय . गर्द निळ्या पार्श्वभूमीवर चंद्रोदय, शुक्राची चांदणी, गुरू, मंगळ हे किती छान दिसतात ना! जाणीवपूर्वक या गोष्टी अनुभवतोय, मुलांचं अनुभवविश्व समृद्ध करतोय....

हे सगळं किती दिवस असं राहील माहीत नाही पण अजुनही बदल करायचेत. फक्त माझ्यासाठी नाही तर समाजासाठी देखील. त्यातला एक सोपा प्रयत्न म्हणजे झाडं लावणं. सध्याच्या परिस्थितीत बांबू माझं लक्ष वेधून घेतो. त्याचा वाढण्याचा वेग आणि हिरवाई निर्माण करायची ताकद अफाट आहे. बघुया कधी ते अंमलात आणता येतंय..

बऱ्याच गोष्टी उमगायला लागल्या ज्यांच्याकडे कित्येक वर्षं दुर्लक्ष केलं जात होतं; जसं आयुष्यात थोडं थांबणंही आवश्यक आहे. थोडा विसावाही गरजेचा आहे. प्रवासात नाही का, एखाद्या ठिकाणी पोहोचायची घाई केल्यानं प्रवासाचा खरा आनंदच घेतला जात नाही. आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य अनुभवायचं राहूनच जातं. नंतर करू, नंतर करूच्या नावाखाली आवडत्या गोष्टी केल्या जात नाहीत अन् तो नंतर कधी येतच नाही. थांबायला हवंय, आवडीच्या गोष्टी करून त्यातला आनंद मिळवायला हवाय. मला तर वाटतं आपल्या जीवनाचा प्रचंड वेग अन् न थांबण्याची वृत्ती याच आपल्या दुःखाचं आणि ताण तणावाचं कारण आहे. हे मिळवायचंय म्हणत छाती फुटेस्तोवर धावणं जे प्रचलनात आलंय तेच थांबायला हवंय.. असो. बदल करायचेत अन् करत रहायचेत. ही जाणीव जी झालीय ती महत्वाची आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.