सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

आटपाट नगर......


नगरशी ज्यांचा चांगला संबंध आलाय किंवा जे नगरमध्ये राहिलेत/राहतायत त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी...

loksatta, 07-10-2011 :DigitalEdition


म्हणजे काका, दादा, मामा, भैय्या, किंवा तत्सम लोकांमुळे गांजलेल्या नगरकरांच्या वाहत्या जखमेवर ही एक हळुवार फुंकर... याचा अर्थ जखम भरली असा नाही पण कुठेतरी आशा आहे म्हणायची ....
मी पाहिलं आणि अनुभवलं ते नगर सुंदर, शांत होतं....दादागिरी, मारामारी खून वगैरे प्रकार बातमीत फार क्वचित....
दिल्ली दरवाजा ही त्यावेळी शान होती, ऐतिहासिक वास्तू होती.
आता दिल्ली दरवाजाची वेस घरातल्या खुंटी सारखी झालीय. पाहिजे ते अडकवा. कुठल्या तरी 'महान' नेत्याला मानाचा मुजरा, कुणाला तरी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि काही बाही. त्यावर कुठल्यातरी टग्या लोकांचे फोटो. 
 
लाल टाकीच्या चौकात अप्पू दिमाखात उभा होता, त्याच्या भोवती बाग होती (ती कुठल्या भ्रष्टाचारात खाल्ली गेली कुणास ठाऊक?). शेजारीच आणखी एक बाग आणि कारंजे होते, त्यावर रंगीत रोषणाई होती, नेहरूंचा भाषण देतानाचा पुतळा होता....

लाल टाकी ते अमरधाम असा एक चांगला रस्ता होता अशीही अफवा आहे!!!! त्या रस्त्याला आणखी चांगला बनवण्यास सर्व पक्षांचे राजकारणी पुढे आले आणि श्रेय मिळत नाही हे पाहताच गायबही झाले!!! आता तो रस्ता वाट पाहतोय नशीब उघडायची.    
नेप्ती चौकात सुंदर गोल होता ज्यात बाग होती, मोठमोठी झाडे होती (त्याच्याजागी सुशोभीकरण म्हणून नक्की काय उभं केलाय कुणास ठाऊक आणि त्याची रक्कमही कुणाच्या घशात गेली न ठावे)         
दिल्ली दरवाजा जवळ गरिबांचे गाळे होते, ते जमीनदोस्त केल्यावरच तिथल्या भूखंडाचं श्रीखंड आम्हाला दिसलं... ते कुणाच्या घशात जातंय त्याची वाट पहायची....
तीच गत चितळे रोड वरच्या नेहरू मार्केटची.... काय होणार त्याचं पुढे?

आणि मग अचानक जाणवलं कि टागेगीरीही चांगलीच वाढलीय कुणाकुणाचा वरदहस्त लाभल्यानं. कुणाच्या तरी गाडीला वकिलाचा कि कोणाचा धक्का लागला म्हणून त्या बिचा-याला बेदम चोपला वगैरे.   

आधी कोणी बार्शीकर म्हणून होता... आता तसं कोणी का नाही असं वाटायला लागलंय.    

बुधवार, ७ सप्टेंबर, २०११

मी माणूस......(स्वार्थी, निर्लज्ज)

मी आज हरलो…..
सपशेल हरलो.
मागे एकदा कंपनीत ठीपकेवाल्या मुनियांनी घरटी केली होती. घरट्यात पिले दिली का ते माहित नाही पण कंपनीच्या इंजिनियरच्या लक्षात ते आलं. मग एक दोन दिवसांतच ज्या पाईपमागे ते घरट होतं, तो पाईपच बाहेरून बांधून बंदिस्त  केला गेला. मी त्या वेळी कंपनीच्या कारभाराला, वातावरणाला, माणसाच्या असंवेदनशीलतेला मनातल्या मनात शिव्यांची  लाखोली वाहिली. यांत्रिकीकरण आणि औद्योगिकरणाच्या नावाने खडे फोडले….
आज आमच्या प्लॉट वर घराचे बांधकाम सुरु करण्यासाठी सर्वेक्षण करायला गेलो होतो. भरपूर बाभळी वाढल्या होत्या. त्या बाभळीवर सुगरणींनी घरटी केली होती. इंजिनियरने सरळ सांगितलं की हे सगळं साफ करावं लागेल. घर बांधणे  सुरु करायचे असेल तर त्याला पर्याय नव्हता….पण मला त्या सुगरणींच्या घरांवरून फिरणारा JCB दिसत होता. त्या सुगरण  पक्षांची मेहनत दिसत होती….. त्यांची घरे पडताना होणा-या  केविलवाण्या तडफडीची कल्पनाही करवत नव्हती. मी माझ्या एका घरासाठी सुगरणींची पाच सहा घरटी मोडणार होतो….
बरेच दिवस ऐकलेला पण न उमजलेला मुद्दा आज अगदी -ह्दयात घर करून गेला. कुठून आणला माणसाने जमिनीवर मालकी हक्क? कुणी दिली त्याला जमिनीवर मालकी ? माणसाएवढाच हक्क या प्राण्यांचा नाही का?

कुठे गेला यांत्रिकीकरण आणि औद्योगिकरणाच्या नावाने खडे फोडणारा मी ? मीही त्याच व्यवस्थेचा एक भाग तर आहे….
मानव  विरुद्ध  निसर्ग  ह्या  लढ्यात मी माणसाच्याच बाजूने आहे. निसर्गाबद्दल कितीही सहानुभूती आणि आपुलकी दाखवली तरी मी मनुष्य प्राणीच…पूर्णपणे निसर्गाच्या बाजूने नाही उभा राहू शकत. निसर्गाच्या विरूद्धच असणार मी कायम. माणसाची प्रत्येक कृती कुठेतरी निसर्गाला हानी पोहोचवतेच आहे. या सगळ्याची जाणीव मला आज प्रकर्षाने  झाली आणि तिथेच मी  हरलो… 
 

भिकारी

मागे एकदा शेतकरी बाजारात गेलो होतो. मला थोडा मोकळा वेळ मिळाला आणि मग मी बाजाराच्या गेटवर थांबलो. आजूबाजूच्या हालचाली, भाजीच्या शोधात फिरतानाची लोकांची शोधक, पारखी  नजर, आपला माल आधी खपावा म्हणून शेतकऱ्यांच्या क्लृप्त्या, त्यांची जाहिरात (तेलुगुत असले तरी भावार्थ कळत होता) या सगळ्यांची मजा वाटत होती.  
हे सगळं पाहताना माझी नजर गेट जवळच बसलेल्या भिकाऱ्यावर स्थिरावली आणि विचारचक्र सुरु झालं. तो भिकारी बाजारात येणाऱ्या जाणाऱ्याकडे आशाळभूतपणे पाहत होता, त्याचे थकलेले हात वर जात होते. तोंडातून शब्द निघत नव्हता...... आणि बाजारात खुळखुळणाऱ्या सुट्या नाण्यांपैकी एखादं नाणं त्याच्या पुढ्यात पडत होतं. असं नाणं पडलं की तो तिकडे पाही. मग पुन्हा एकदा सर्व नाण्यांवरून नजर फिरवी. नजरेनेच किती नाणी पडलीत ते मोजत असावा, आणि मनातच त्याचा हिशेबही सुरु असावा. काय हिशेब करत असेल? पोटा-पाण्यासाठी, एक वेळच्या आणि जमलंच तर दोन वेळच्या जेवणासाठी किती पैसे लागतील ? किती जमा झालेत ? मग जेवण पोटभर मिळेल का? थोडे जास्त पैसे मिळाले तर एखादा छानसा पदार्थही मिळेल....
वी. स. खांडेकरांच्या 'वनदेवता' मधील पहिलीच कथा ‘प्रदक्षिणा’ आठवली. त्यात एक परिच्छेद आहे ….
"ती गर्दी पाहून एक भिकाऱ्याचे पोर आशाळभूतपणाने देवळाकडे आले.
देवळाचा कळस सूर्यकिरणांत चमकत होता. एखाद्या सम्राटाच्या मुकुटातल्या देदीप्यमान रत्नासारखा.
त्या पोराने क्षणभर सुद्धा त्या कळसाकडे कुतूहलाने पहिले नाही. देवालयाच्या महाद्वारातून माणसे मुंग्यांसारखी आत जात होती. साखरेचे कण जवळ असल्याशिवाय मुंग्या गर्दी करीत नाहीत, एवढे त्या पोराने पहिले होते."
मग शाळेत जाता येताना मित्रांबरोबर झालेल्या गप्पा आठवल्या. छोट्या शहरांमध्ये भिकाऱ्यांशीही  तोंड ओळख असते. असेच काही भिकारी आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या दंतकथाही आठवल्या. गोपाळ होता. थोडा वेडसर होता. रस्त्याने शिव्या देत जायचा. डोक्याला स्वतःच मालिश करत बसायचा,  लहान मुलांची टाळू तेलाने भरताना आजी करते तसा. त्याच्याकडे म्हणे खूप संपत्ती होती आणि नातेवाईकांनी त्याला देशोधडीला लावलं म्हणून तो वेडा झाला. तो एका बँकेशेजारी बसायचा. आम्हा मुलांमध्ये अशीही अफवा होती की ती बँकेची जागा त्याच्या मालकीची आहे. त्याला लोक गोपाळराव म्हणायचे. कोणी खायला द्यायचे, कोणी कपडे द्यायचे... लोक त्याला चांगले ओळखत. त्याने भीक अशी मागितली नाही, पण कधीतरी चहाला पैसे मागायचा आणि खरेच जाऊन चहा प्यायचा.कधी पैसे देणा-यालाही चहाचा आग्रह करायचा.
असाच अजून एक वेडसर मनुष्य होता. गोपाळच्याच वर्गातला. त्याच्या भावाचं म्हणे एक दुकान होतं. तिथनं तो कंगवे, fair & Lovely आणायचा आणि  १  रु . २  रु  अशा  वाटेल  त्या  किमतीत  विकायचा.
ब-याच भिका-यांबरोबर काही दंतकथा जोडलेल्या असतात, आणि हे प्रत्येक गावात असतंच. अमुक एक भिका- याकडे  म्हणे लाखो रुपये आहेत पण तरीही तो भीक मागतो. कुणाची म्हणे भाड्याने दिलेली प्रॉपर्टी, घर आहे पण स्वतः भीक मागतो ….काही  चित्रपटांमधून, विनोदांमधून याच गोष्टी मांडल्या जातात .
आणखी एक प्रसंग आठवला. M.tech. ला मुंबईला होतो. किंग्ज सर्कलहून  अंधेरी कडे चाललो होतो. स्टेशन वर एक भिकारी अत्यंत दीन अवस्थेत बसला होता. तेलकट चेहरा, लाल डोळे, मळलेले कपडे. आधी वाटले की प्यालाय, पण मग लक्षात आलं की याला भयंकर ताप असणार. सर्दीही झालेली दिसली. आणि त्याला भयंकर भूक लागलेली असावी.  त्याला सुचत काहीच नव्हते. तापाचा अंमल असावा. त्याने फक्त एक दोनदा हातानेच खूण करून सांगितले की शेजारच्या वडा पावच्या गाडीवरून वडा पाव आणून दे. माझ्या लक्षात आलं  की हे नाटक नक्कीच नाहीय. तो आजारी आहे हे स्पष्ट कळत होतं…. मी दोन वडा पाव घेऊन  त्याला दिले. त्याने अक्षरशः ते अधाशासारखे  कोंबले. मला  ते समाधान खूप मोठं होतं…. त्याला अजून भूक होती. खायला हवं होतं, पण त्यावेळी मी त्यापेक्षा जास्त  काहीच करू शकलो नाही….
भीक मागणे हा काही मोठ्या शहरांमध्ये व्यवसाय झालाय हे मान्य, धड  धाकट लोकही भीक मागतात हेही मान्य. आपण  म्हणतोही की हा धड धाकट असूनही काम करायला नको , ऐतं पाहिजे….
पण त्या दिवशी त्या भिका-याकडे पाहिल्यावर जे विचारचक्र सुरु झालं त्यात काही प्रश्नचीन्हंही होती.
कोणाकडे लाखो रुपये,प्रॉपर्टी असूनही ते भीक मागतील? नाही पटत....
फक्त ऐतं मिळावं, श्रम नको म्हणून कोणी भीक मागेल? शक्यता खूपच कमी...
नोक-या किंवा काम खरेच एवढं सहज उपलब्ध आहे?


मग आपण भिका-यांना  १-२ रु द्यायलाही एवढा का विचार करतो?
४००- ५०० चा पिझा आपण सहज मजा म्हणून खातो... त्यामानाने १-२ रु म्हणजे ते किती?
 भाजीवाले, फेरीवाले यांच्याशी थोड्या पैशांसाठीही घासाघीस करतो पण मॉलमधून अवाजवी किमतीच्या ब्रांडेड वस्तूही घासाघीस न करता घेतो. तिथे घासाघीस करूच शकत नाही  ना...

त्या एका परदेशी मुलाची गोष्ट आठवली. त्याच्याकडे १०० रु. होते. तो आईस्क्रीमच्या दुकानात गेला. त्याने संडे आईस्क्रीमच्या किमती विचारल्या. १०० रु...
साधे आईस्क्रीम कमी किमतीत होते. तो बराच घुटमळला, मग त्याने साधे आईस्क्रीम घेतले आणि उरलेल्या पैशांची टीप दिली. तो संडेही घेऊ शकत होता...टीप ही कल्पना आपल्याकडे अजून तितकीशी पटत नाही. पण आपण एक करू शकतो. जे पैसे आपण मजा म्हणून खर्च करतो त्याच्या दहा टक्के सत्पात्री दान करू शकतो. पैसेच असं नाही ...काहीही जे आपल्याकडे जास्त आहे पण इतरांकडे नाही.....


 वरचा विचार करताना वनदेवता मधीलच आणखी दोन गोष्टी आठवल्या. एक कथा 'वाढदिवस'. राजाच्या वाढदिवसाला राजाला भेटायला आलेल्या भिका-याची आणि त्याला हवं ते माग म्हणून आपण फसलो की काय असं वाटणा-या राजाची. राजाच्या मनातील न सुटणारा लोभ लक्षात येऊन तो भिकारीच राजाला वाढदिवसाची भेट म्हणून त्या दिवशी मिळालेलं सर्व धान्य देऊन निघून जातो.
दुस-या गोष्टीत भरभरून दान करणाऱ्या राजाला एक भिकारी हसतो. राजाने त्याला कारण विचारल्यावर तो भिकारी सांगतो की माझे आजोबा सुद्धा राजा होते पण तुझ्यासारखाच त्यांनीही दान धर्म केला होता!!!
:)

 तर तात्पर्य असं की दोन्ही टोकांची भूमिका घेऊन उपयोगी नाही. मध्यम मार्ग स्वीकारावा !!!



रविवार, १० जुलै, २०११

नवखा हैदराबादी

नावडतीचं मीठ अळणी म्हणतात तसंही असेल, पण हैदराबाद काही अजून आवडत नाही. आवडायचा प्रयत्न करूनही नाही...  

इथे 'आवडती' म्हणजे बंगळूर....
आपला साउथ इंडिया म्हणजे आंध्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू इतकाच (उत्तर भारतीय आपल्याला म्हणजे मराठी माणसांनासुधा साउथ इंडियन्स मधेच धरतात! ती गोष्ट वेगळी!!!)   पण हैदराबाद कुठल्याही दृष्टीकोनातून साउथ इंडियात आहे असं वाटत नाही.
दक्षिण भारताची खास निशाणी म्हणजे डोसा, इडली, वडा, उत्तप्पा आणि कॉफी... हे सगळं हैदराबाद मध्ये शोधावं लागतं आणि त्याची चव अशी की महाराष्ट्रातल्या एखाद्या हॉटेलातही या गोष्टी जास्त चांगल्या मिळतील. तसं नाही म्हणायला चटणी'ज म्हणून एक हॉटेल्स ची साखळी इथे आहे की जिथे या गोष्टी उत्तम मिळतात, पण आपण परदेशात येऊन खातो आहोत असं वाटावं. कारण ?  डोसा १२० रु. !!!
मग बंगळूर आठवतं. इडली, डोसा, वडा किंवा उत्तपा, या गोष्टी तिथे चविष्ट आणि १०-१५ रु. मिळतात!!! अगदीच चांगल्या हॉटेलात (A2B खूप प्रसिद्ध) गेलो तर ४० रु....
दक्षिण भारतात कुठल्याही हॉटेलात गेलो तरी केळीच्या पानावर जेवायला मिळेल, पण हैदराबादेत केळीचं पान जेवायला कुठेच मिळणार नाही.
दक्षिण भारताचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे फुलं. दक्षिण भारतीयांना फुलांचं भयंकर वेड. बंगळुरात एवढी फुलं की बस.... कॉलेज कुमारीही ब-याच वेळा गजरे लावतात. प्रत्येक बाजारात फुलांची दुकानंच दुकानं. दक्षिण भारतीय नटीला गजरा हा हवाच. पण हे इथे कुठेच नाही दिसत.
दक्षिण भारत खुपसा आपल्या कोकण सारखा. वातावरण, निसर्ग, लोक, संस्कृती, अशा ब-याचशा गोष्टींत. पण या सगळ्यात हैदराबाद अपवाद आहे. नारळाची झाडीही इथे नाही.    
हे म्हणजे कोकणात गेल्यावर वाडी आणि त्यातली आंबे, काजू, फणस, नारळ, पोफळी आणि केळी दिसू नये असं !!! 
लुंगी हा पोशाख अगदी संस्कृतीचा भाग आहे आणि एका काळानंतर आपणही  तो स्वीकारतो.
बंगळुरात राहणं म्हणजे एखाद्या सुटीत सहलीच्या ठिकाणी राहण्यासारखंच आहे. अगदी सकाळी जाऊन संध्याकाळी परतण्यासारखी ठिकाणं भरपूर. शनिवार रविवार आला की पाठीवर सॅक टाकून निघाले भटकायला. मग ती ट्रेकिंग असो, जुन्या उत्तम शिल्पकृती असलेल्या देवळांची ठिकाणं असोत, जंगलं असोत किंवा सुंदर निसर्गरम्य ठिकाणं असोत. बंगळूर आपल्याला आपलंसं करून टाकतं. लोकांमध्ये एक अदब आहे. एक संस्कृती वावरते. कोकणच्या माणसांसारखीच ही माणसंही साधी भोळी.
हैदराबादेत एक हैदराबादी आडमुठेपणा आहे. अगदी हैदराबादी भाषेपासून ते लोकांच्या वागण्यापर्यंत..... एका दुचाकीस्वाराला तो वाहतुकीच्या नियमाप्रमाणे चालल्यामुळे दुस-याने झापलेला पाहिलंय. बंगळुरुला असताना तिथल्या ट्रफिकच्या नावाने ओरडायचो पण वाईट ट्रफिक काय असते ते इथे आल्यावर पाहिलं. म्हणजे बाईकवाला volvo सारखी बाईक चालवतो तर volvo वाला बाईक सारखी volvo  चालवतो!!!निसर्गरम्य ठिकाणे नाहीत ते जाऊ द्या पण निसर्गाबद्दलची एक आवड असावी, तर ती ही नाही. सगळे उदासीन. कोणे एके काळी हैदराबाद विशाल शिळा असलेल्या टेकड्यांनी वेढलं होतं, त्याची जागा आता सिमेंटच्या इमारतींनी घेतलीय. त्यात तरी सौंदर्यदृष्टी असावी तर ते ही नाही. जिथे जागा मिळेल तिथे हवी तशी बांधकामं होतायत. निझामाची सौंदर्यदृष्टी शहरात नाहीच.... एक के बी आर पार्क म्हणून छोटासा जंगलाचा तुकडा शहरात अंग चोरून उभा आहे.
बंगळूर हिरवं आहे. एक आजूबाजूचा निसर्ग जपण्याची इच्छा तरी लोकांमध्ये दिसते. बोलण्यात, वागण्यात आणि भाषेत गोडवा आहे.    
इथलं सरकार तरी काय करतं माहित नाही. ते कायम तेलंगणच्या कात्रीत सापडलेलं. बाकीचं राजकारण जाउद्या पण इतर उपक्रम, पर्यटन, कला या गोष्टींचंही  सरकारला वावडं असावं.  लोकही कलेच्या बाबतीत निरस. चित्रमयी म्हणून असलेल्या सरकारी आर्ट गॅलरीची अवस्था बिकट आहे. (बंगाळूरातली कर्नाटक चित्रकला परिषद आठवते. ती सोन्याचे दिवस पाहतेय!!!). जुन्या काळच्या कथांमध्ये, इतिहासात आपण वाचतो की एखाद्या राज्याचा सुवर्णकाळ म्हणजे कला संस्कृती आणि व्यापार भरभराटीला आलेले असतात. तसं आत्ता बंगळूर भरभराटीला आलंय.
त्या दृष्टीने आता हैदराबादचे दिवस भारत आलेत... कारण कला आणि संस्कृतीच्या नावाने बोंबच, पण सांस्कृतिक वारसाही टिकवता येत नाहीय या सरकारला. तेलंगणाच्या नावाखाली माथेफिरूंनी आंध्रच्या कवी आणि लेखकांचे पुतळे फोडले पण सरकार हतबल......तेलंगणाची मागणी काय आणि कशी हा वेगळा विषय पण त्या नावाखाली शिक्षणाचे जे काही धिंडवडे चाललेत ते पाहवत नाही. जी टगेगिरी चाललीये त्या बद्दल सरकार काहीच नाही करू शकत.
बंगळुरात किंवा कर्नाटकात कुठेही जा, रस्त्यांवर व्यवस्थित पाट्या आणि पर्यटन स्थळांच्या वेगळ्या पिवळ्या पाट्याही! इथे कुठे पाट्याही पाहायला नाही मिळत.
अशी लिस्ट काढली तर संपणारच नाही... काहीतरी चांगलं असेल इथे असं स्वतःला पटवण्याचा प्रयत्न करतोय....शोधतोय .....

   

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०११

ध्वज

आपल्या देशाचा ध्वज जर कोणा दहशतवाद्याने चुरगळून रस्त्यावर चिखलात फेकला तर तुम्ही काय कराल?
रक्त खवळलं ना? 
असे अनेक दहशतवादी आपल्या समाजात फिरतायत ..... २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट नंतर भरपूर सापडतील...

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.