बुधवार, ७ सप्टेंबर, २०११

भिकारी

मागे एकदा शेतकरी बाजारात गेलो होतो. मला थोडा मोकळा वेळ मिळाला आणि मग मी बाजाराच्या गेटवर थांबलो. आजूबाजूच्या हालचाली, भाजीच्या शोधात फिरतानाची लोकांची शोधक, पारखी  नजर, आपला माल आधी खपावा म्हणून शेतकऱ्यांच्या क्लृप्त्या, त्यांची जाहिरात (तेलुगुत असले तरी भावार्थ कळत होता) या सगळ्यांची मजा वाटत होती.  
हे सगळं पाहताना माझी नजर गेट जवळच बसलेल्या भिकाऱ्यावर स्थिरावली आणि विचारचक्र सुरु झालं. तो भिकारी बाजारात येणाऱ्या जाणाऱ्याकडे आशाळभूतपणे पाहत होता, त्याचे थकलेले हात वर जात होते. तोंडातून शब्द निघत नव्हता...... आणि बाजारात खुळखुळणाऱ्या सुट्या नाण्यांपैकी एखादं नाणं त्याच्या पुढ्यात पडत होतं. असं नाणं पडलं की तो तिकडे पाही. मग पुन्हा एकदा सर्व नाण्यांवरून नजर फिरवी. नजरेनेच किती नाणी पडलीत ते मोजत असावा, आणि मनातच त्याचा हिशेबही सुरु असावा. काय हिशेब करत असेल? पोटा-पाण्यासाठी, एक वेळच्या आणि जमलंच तर दोन वेळच्या जेवणासाठी किती पैसे लागतील ? किती जमा झालेत ? मग जेवण पोटभर मिळेल का? थोडे जास्त पैसे मिळाले तर एखादा छानसा पदार्थही मिळेल....
वी. स. खांडेकरांच्या 'वनदेवता' मधील पहिलीच कथा ‘प्रदक्षिणा’ आठवली. त्यात एक परिच्छेद आहे ….
"ती गर्दी पाहून एक भिकाऱ्याचे पोर आशाळभूतपणाने देवळाकडे आले.
देवळाचा कळस सूर्यकिरणांत चमकत होता. एखाद्या सम्राटाच्या मुकुटातल्या देदीप्यमान रत्नासारखा.
त्या पोराने क्षणभर सुद्धा त्या कळसाकडे कुतूहलाने पहिले नाही. देवालयाच्या महाद्वारातून माणसे मुंग्यांसारखी आत जात होती. साखरेचे कण जवळ असल्याशिवाय मुंग्या गर्दी करीत नाहीत, एवढे त्या पोराने पहिले होते."
मग शाळेत जाता येताना मित्रांबरोबर झालेल्या गप्पा आठवल्या. छोट्या शहरांमध्ये भिकाऱ्यांशीही  तोंड ओळख असते. असेच काही भिकारी आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या दंतकथाही आठवल्या. गोपाळ होता. थोडा वेडसर होता. रस्त्याने शिव्या देत जायचा. डोक्याला स्वतःच मालिश करत बसायचा,  लहान मुलांची टाळू तेलाने भरताना आजी करते तसा. त्याच्याकडे म्हणे खूप संपत्ती होती आणि नातेवाईकांनी त्याला देशोधडीला लावलं म्हणून तो वेडा झाला. तो एका बँकेशेजारी बसायचा. आम्हा मुलांमध्ये अशीही अफवा होती की ती बँकेची जागा त्याच्या मालकीची आहे. त्याला लोक गोपाळराव म्हणायचे. कोणी खायला द्यायचे, कोणी कपडे द्यायचे... लोक त्याला चांगले ओळखत. त्याने भीक अशी मागितली नाही, पण कधीतरी चहाला पैसे मागायचा आणि खरेच जाऊन चहा प्यायचा.कधी पैसे देणा-यालाही चहाचा आग्रह करायचा.
असाच अजून एक वेडसर मनुष्य होता. गोपाळच्याच वर्गातला. त्याच्या भावाचं म्हणे एक दुकान होतं. तिथनं तो कंगवे, fair & Lovely आणायचा आणि  १  रु . २  रु  अशा  वाटेल  त्या  किमतीत  विकायचा.
ब-याच भिका-यांबरोबर काही दंतकथा जोडलेल्या असतात, आणि हे प्रत्येक गावात असतंच. अमुक एक भिका- याकडे  म्हणे लाखो रुपये आहेत पण तरीही तो भीक मागतो. कुणाची म्हणे भाड्याने दिलेली प्रॉपर्टी, घर आहे पण स्वतः भीक मागतो ….काही  चित्रपटांमधून, विनोदांमधून याच गोष्टी मांडल्या जातात .
आणखी एक प्रसंग आठवला. M.tech. ला मुंबईला होतो. किंग्ज सर्कलहून  अंधेरी कडे चाललो होतो. स्टेशन वर एक भिकारी अत्यंत दीन अवस्थेत बसला होता. तेलकट चेहरा, लाल डोळे, मळलेले कपडे. आधी वाटले की प्यालाय, पण मग लक्षात आलं की याला भयंकर ताप असणार. सर्दीही झालेली दिसली. आणि त्याला भयंकर भूक लागलेली असावी.  त्याला सुचत काहीच नव्हते. तापाचा अंमल असावा. त्याने फक्त एक दोनदा हातानेच खूण करून सांगितले की शेजारच्या वडा पावच्या गाडीवरून वडा पाव आणून दे. माझ्या लक्षात आलं  की हे नाटक नक्कीच नाहीय. तो आजारी आहे हे स्पष्ट कळत होतं…. मी दोन वडा पाव घेऊन  त्याला दिले. त्याने अक्षरशः ते अधाशासारखे  कोंबले. मला  ते समाधान खूप मोठं होतं…. त्याला अजून भूक होती. खायला हवं होतं, पण त्यावेळी मी त्यापेक्षा जास्त  काहीच करू शकलो नाही….
भीक मागणे हा काही मोठ्या शहरांमध्ये व्यवसाय झालाय हे मान्य, धड  धाकट लोकही भीक मागतात हेही मान्य. आपण  म्हणतोही की हा धड धाकट असूनही काम करायला नको , ऐतं पाहिजे….
पण त्या दिवशी त्या भिका-याकडे पाहिल्यावर जे विचारचक्र सुरु झालं त्यात काही प्रश्नचीन्हंही होती.
कोणाकडे लाखो रुपये,प्रॉपर्टी असूनही ते भीक मागतील? नाही पटत....
फक्त ऐतं मिळावं, श्रम नको म्हणून कोणी भीक मागेल? शक्यता खूपच कमी...
नोक-या किंवा काम खरेच एवढं सहज उपलब्ध आहे?


मग आपण भिका-यांना  १-२ रु द्यायलाही एवढा का विचार करतो?
४००- ५०० चा पिझा आपण सहज मजा म्हणून खातो... त्यामानाने १-२ रु म्हणजे ते किती?
 भाजीवाले, फेरीवाले यांच्याशी थोड्या पैशांसाठीही घासाघीस करतो पण मॉलमधून अवाजवी किमतीच्या ब्रांडेड वस्तूही घासाघीस न करता घेतो. तिथे घासाघीस करूच शकत नाही  ना...

त्या एका परदेशी मुलाची गोष्ट आठवली. त्याच्याकडे १०० रु. होते. तो आईस्क्रीमच्या दुकानात गेला. त्याने संडे आईस्क्रीमच्या किमती विचारल्या. १०० रु...
साधे आईस्क्रीम कमी किमतीत होते. तो बराच घुटमळला, मग त्याने साधे आईस्क्रीम घेतले आणि उरलेल्या पैशांची टीप दिली. तो संडेही घेऊ शकत होता...टीप ही कल्पना आपल्याकडे अजून तितकीशी पटत नाही. पण आपण एक करू शकतो. जे पैसे आपण मजा म्हणून खर्च करतो त्याच्या दहा टक्के सत्पात्री दान करू शकतो. पैसेच असं नाही ...काहीही जे आपल्याकडे जास्त आहे पण इतरांकडे नाही.....


 वरचा विचार करताना वनदेवता मधीलच आणखी दोन गोष्टी आठवल्या. एक कथा 'वाढदिवस'. राजाच्या वाढदिवसाला राजाला भेटायला आलेल्या भिका-याची आणि त्याला हवं ते माग म्हणून आपण फसलो की काय असं वाटणा-या राजाची. राजाच्या मनातील न सुटणारा लोभ लक्षात येऊन तो भिकारीच राजाला वाढदिवसाची भेट म्हणून त्या दिवशी मिळालेलं सर्व धान्य देऊन निघून जातो.
दुस-या गोष्टीत भरभरून दान करणाऱ्या राजाला एक भिकारी हसतो. राजाने त्याला कारण विचारल्यावर तो भिकारी सांगतो की माझे आजोबा सुद्धा राजा होते पण तुझ्यासारखाच त्यांनीही दान धर्म केला होता!!!
:)

 तर तात्पर्य असं की दोन्ही टोकांची भूमिका घेऊन उपयोगी नाही. मध्यम मार्ग स्वीकारावा !!!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.