मंगळवार, १५ जून, २०१०

समर्थांचं काव्य

असंच मला आवडलेलं समर्थांचं आणखी एक काव्य!!! पाहू तुम्हाला यातील किती नावं ठाऊक आहेत ते !!!


प्रसंग निघाला स्वभावें । बागेमध्ये काय लावावे ।
म्हणुनी घेतली नावे । काही एक ॥
कांटी रामकांटी फुलेकांटी ।  नेपती सहमुळी करमाटी ।
सावी चीलारी सागरगोटी । हिंवर खैर खरमाटी ॥ 
पांढरफळी करवंदी तरटी । आळवी तोरणी चिंचोरटी । 
सिकेकाई वाकेरी घोंटी ।  करंज विळस समुद्रशोक ॥
अव्हाटी बोराटी हिंगणबेटी । विकळी टांकळी वाघांटी ।
शेर निवडुंग कारवेटी । कांटेशेवरी पांगेरे ॥
निरगुडी येरंड शेवरी । कासवेद कासळी पेरारी ।
तरवड उन्हाळ्या कुसरी । शिबी तिव्हा अंबोटी ॥
कांतुती काचकुहिरी सराटी । उतरणी गुळवेल चित्रकुटी 
कडोची काटली गोमाटी । घोळ घुगरी विरभोटी ॥
भोंस बरु वाळा मोळा । ऊंस कास देवनळा ।
लव्हे पानि पारोस पिंपळा । गुंज कोळसरे देवपाळा ॥
वेत कळकी चिवारी । ताड माड पायरी पिंपरी ।
उंबरी अंबरी गंभिरी । अडुळसा मोही भोपळा ॥
साव सिसवे सिरस कुड । कोळ कुंभा धावडा मोड ।
काळकुडा भुता बोकडा ।  कुरंडी हिरंडी लोखंडी ॥
विहाळ गिळी टेंभुरणी  । अवीट एणके सोरकिन्ही ।
घोळी   दालचिनी ।  कबाबचीनी जे ॥
निंबारे  गोडे निंब । नाना महावृक्ष तळंब ।
गोरक्षचिंच लातंब । परोपरीची ॥
गोधनी शेलवंटी भोंकरी । मोहो बिब्बा रायबोरी ।
बेल फणस जांब भरी । चिंच अंबसोल अंबाडे ॥ 
चांफे चंदन रातांजन । पतंग मैलागर कांचन । 
पोपये खेलेले खपान । वट पिंपळ उंबर ॥
आंबे निंबे साखरनिंबे । रेकण्या खरजूरी तूंते दाळिंबे ।
तुरडे विडे नारिंगे । रोवे कविट अंजीर सीताफळे ॥

जांब अननस देवदार । सुरमे खासे मंदार । 
पांढरे जंगली लाल पुरे। उद्वे चित्रकी ॥
केळी नारळी पोफळी । आवळी रायआवळी जांभळी ।
कुणकी गुगुळी सालफळी । वेलफळी माहाळुंगी ॥     
भुईचांफे नागचांफे मोगरे । पारिजातक बटमोगरे ।
शंखासुर काळे मोगरे । सोनतरवड सोनफुले ॥
जाई सखजाई पीतजाई । त्रिविध शेवंती मालती जुई । 
पाडळी बकुळी अबई । नेवाळी केतकी चमेली ॥
सुर्यकमळिणी चंद्रकमळिणी । जास्वनी हनुमंतजास्वनी ।
केशर  कुसुंबी  कमळिणी । बहुरंग निळायति ॥
तुळसी काळी त्रिसेंदरी । त्रिसिंगी रायचचु रायपेटारी ।
गुलखत निगुलचीन कनेरी । नानाविध मखमाली ॥
काळा वाळा मरुवा नाना । कचोरे गवले दवणा । 
पाच राजगिरे नाना । हळदी करडी गुलटोप ॥
वांगी चाकवत मेथी पोकळर । माठ शेपु खोळ बसळा ।
चवळी चुका वेल सबळा । अंबुजिरे मोहरी ॥
कांदे मोळकांदे माईणमुळे । लसूण आले रताळे । 
कांचन कारिजे माठमुळे । सुरण गाजरे ॥
भोंपळे नाना प्रकारचे । लहानथोर पत्रवेलीचे ।
गळ्याचे पेढ्या सांगडीचे । वक्र वर्तुळ लंबायमान ॥ 
गंगाफळ काशीफळे क्षीरसागर । सुगरवे सिंगाडे देवडांगर । 
दुधे गंगारूढे प्रकार । किन-या रुद्रविण्याचे ॥
वाळक्या काकड्या चिवड्या । कोहाळे सेंदण्या सेंदाड्या ।
खरबूजा तरबुजा कलंगड्या । द्राक्षी मिरवेली पानवेली ॥
दोडक्या पारोशा पडवळ्या । चवळ्या कारल्या तोंडल्या ।
घेवड्या कुही-या खरमुळ्या । वेली अळूचमकोरे ॥
अठराभार वनस्पती । नामे सांगावी किती ।
अल्प बोलिलो श्रोती । क्षमा केली पाहिजे ॥

२ टिप्पण्या:

  1. Hello Rishikesh!
    मी काही निमित्ताने या काव्यातील सर्व वनस्पती शोधण्याचा प्रयत्न केला होता. बऱ्याचशा मिळाल्या. त्यांची मिळालेली माहिती मी संकलित केली आहे. या 'बाग' प्रकरणावर वर काही विख्यात वनस्पतीतज्ञांचे शोधनिबंधही प्रसिद्ध झालेले आहेत. यावर मी लिहिलेला
    ब्लॉग वाचण्यासाठी दुवा:
    http://www.jainvicharitranfula.blogspot.in/

    -अश्विनी

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. माहितीबद्दल धन्यवाद. लेखही छान जमलाय. या सगळ्या वनस्पतींची शास्त्रीय नावे मिळू शकतील का?
      तुम्ही व्यक्त केलेली समर्थ उद्यानाची कल्पना माझ्याही मनात खूप दिवसांपासून आहे....

      हटवा

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.