शनिवार, ७ एप्रिल, २०१२

उबुंटू

उबुंटूची नवी आवृत्ती येत्या २६ तारखेला खुली होतेय. काय आहे उबुंटू?
शब्दशः पाहिलं तर हे एक तत्वज्ञान आहे. आफ्रिकेतलं. माणुसकीचं तत्वज्ञान.
पण मी ज्या उबुंटू बद्दल बोलतोय, ती आहे एक लिनक्स वर आधारीत काँप्युटर ऑपरेटिंग सिस्टीम. लिनक्सचं तत्वज्ञानही असंच. म्हणजे तुम्ही वापरा, सुधारणा करा आणि सुधारीत आवृत्ती इतरांना वापरायला द्या. हे सगळं फुकट. माणुसकीसाठी.
आपल्याला काँप्युटर म्हटलं की विंडोज हेच समिकरण माहीत आहे आणि विंडोजवाल्या मायक्रोसॉफ्टचा कोट्याधीश झालेला बिल गेटस माहित आहे. हे 'फुकट'चं तत्वज्ञान नाही माहित आपल्याला. त्याच्यामागेही काही गैरसमज आहेत. त्याकडे आपण नंतर येऊ.
तर लिनक्सचा जन्म कसा झाला?
लिनस तोरवाल्ड्सने लिनक्सचा कर्नेल ५ ऑक्टोबर १९९१ला सर्वप्रथम प्रसारीत केला. त्याआधी १९८३ मध्ये रिचर्ड स्टालमनने युनिक्स वर चालणारी सर्व सॉफ्टवेअर्स तयार करून सर्व लोकांना मोफत उपलब्ध करून दिली होती (या प्रोजेक्टचं नाव होतं GNU). मग GNU आणि Linux मिळून एक परिपूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम तयार झाली.
तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम घेऊन त्यात छोट्या मोठ्या सुधारणा करून (मुख्यतः ग्राफिक युसर इंटरफेस) त्याचे केलेले वेगवेगळे प्रकार सर्वांसाठी आज खुले आहेत. त्यात उबुंटू सर्वांत वर आहे. उबुंटूव्यतिरिक्त फेडोरा, मिंट आणि खुद्द उबुंटूचेही अनेक प्रकार आहेत. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही  विंडोजपेक्षा कितीतरी चांगली व सुरक्षित आहे. व्हायरस अजून तरी लिनक्सला बाधित करू शकत नाही. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे लिनक्सची काम करण्याची पद्धत आणि दुसरं म्हणजे त्याचा जगभरातला कमी वापर. आणखी एक असं की जगभरात कुणी ना कुणी सतत लिनक्सला सतत चांगली बनवत असतं. त्यामुळं लिनक्सला धोका जरी निर्माण झाला तरी त्यावर उपाय ताबडतोब तयार असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लिनक्स अगदी मोफत आहे. विंडोजवर असणा-या प्रोग्राम्सच्या तोडीचे किंवा त्याहूनही चांगले प्रोग्राम्स लिनक्स साठी मोफत मिळून जातात. विंडोजशिवाय आपलं कुठलंच काम अडत नाही.
मग तरीही लोक लिनक्स का वापरत नाहीत? यामागे एक सर्वात मोठा गैरसमज असा आहे की लिनक्सवर काम करणं म्हणजे DOS वर काम करण्यासारखं आहे. सर्व काही कमांड वरच चालतं. हा साफ चुकीचा गैरसमज आहे.  उबुंटू किंवा इतर आवृत्त्यांमध्ये आपण अगदी विंडोजसारखं माऊसने क्लिक करत काम करू शकतो. यांचा ग्राफिक युजर इंटरफेस अगदी विंडोजच्या तोडीचा किंवा ॲपलच्या तोडीचा आहे!!!
तर मग वाट कसली पाहताय? चला लगेच http://www.ubuntu.com/download
इथनं उबुंटू डाऊनलोड करा आणि वापरायला लागा! जर काही अडलंच तर मी मदत करायला तयार आहे. आणि हो, उबुंटू वापरणारे हजारो जण इंटरनेटवर तुम्हाला मदतीसाठी उत्सुक आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर इंटरनेटवर आधीच कुणी देऊनही ठेवलं असेल!!!


पहा माझ्या काँप्युटरवर उबुंटू असं दिसतं!!!




शनिवार, १० मार्च, २०१२

रंगोत्सव

ऊन्हं तापू लागली अन् वसंताची चाहूल या झाडांना लागली. चैत्र पाडवा आलाय... रंगपंचमीही तोंडावर आहे... मग यांनीही रंगोत्सव सुरू केला....



शनिवार, ३ मार्च, २०१२

वावटळ

दुपारचं ऊन तापायला लागलंय. चटका बसतो. पानगळ झालेली झाडे शांत उभी या काहिलीत. कौतुक म्हणजे पोपटी हिरवी पालवी या झाडांवर अशा रखरखीत उन्हातही चैतन्यरसाने सळसळते.
खाली वाळलेल्या पानांचा खच, वाऱ्याचा झोत आला की उडाल्यासारखा होतो. वावटळीत मात्र पार उंचावर जाऊन नंतर कुठेतरी धुळीत विसावतो.
काही अमूर्त आठवणी या वातावरणात वावटळीत उडणाऱ्या पाचोळ्यासारख्या वर येतात. या आठवणींना काही गोष्ट नसते किंवा कथा नसते की जी सांगता येईल. असतात त्या फक्त भावना...व्यक्त न करता येणाऱ्या.
म्हणजे दुपारचा बारा एकचा प्रहर. टळटळीत ऊन. माठाच्या गार पाण्याचे दिवस. रेडिओवर दुपारची सभा सुरू होतानाचं संगीत. म्हणजे दुपारच्या ऊन्हात शून्यात दृष्टी लावून गुंगीत असल्यासारखं ते संगीत ऐकतोय तेंव्हाची ती भावना....
किंवा कडक ऊन्हापासून बचाव व्हावा म्हणून झाडाच्या विरळ सावलीत थांबावं तर सावलीबरोबरच आत्माही थंड होईल असं काही तरी जाणवतं... वर पाहिल्यावर कळतं की हा तर कडूलिंबाच्या नाजूक लक्षातही न येणाऱ्या फुलांचा मंद पण धुंद करणारा गंध आहे... आत्मा कसा सुखावतो नं.... तशी भावना....
ऊन्हातून घामाघूम होऊन यावं, समोर नव्या माठातलं मातकट वासाचं थंडगार पाणी...आणि पाण्याचा एक घोट घशाखाली उतरला की आत्म्याला सुखावणारा वाळ्याचा वास, सुगंध....
किंवा परिक्षेच्या दिवसांतल्या वर्णन न करता येणाऱ्या आठवणी... म्हणजे परिक्षा आल्यात... सर्वच जण अभ्यासात मग्न. मित्रांच्या भेटीही अभ्यास आणि परिक्षेपुरत्याच. एरवी रखरखीत ऊन...आणि परिक्षा झाल्यानंतर लागलेल्या सुट्या...एकतर सर्वच मित्र गावाला गेलेले, किंवा आपणच कुठेतरी मामाकडे वगैरे आलेलो...मग नेहमीसारखं थोडीच खेळता येतंय. बाहेर तापणारं ऊन. दुपारी घरातील मोठी माणसं वामकुक्षी घेत असलेली. आवाज असा कशाचाच नाही... पाखरांचाही नाही. तीही चिडीचूप. मग आपल्याच कल्पनाशक्तीला जोर देत, कल्पना लढवत बसावं... नाहीतर परिकथा आणि जादू असलेली गोष्टीची पुस्तकं वाचावीत.
पन्हं...
आंबे...
संध्याकाळी सुटणारा वेगवेगळ्या सुगंधी फुलांचा वास...
घरात चाललेली वेगवेगळी वाळवणं आणि चवीसाठी मिळणाऱ्या कायकाय गोष्टी....गव्हाचा चीक अन् पापडाच्या लाट्या. लोणच्याची करकरीत फोड किंवा ताज्या मसाल्यात तेल मीठ घालून केलेली न्याहारी...

कधीकाळी खेडेगावी गेल्यावर परतताना बैलगाडीतून फाट्यापर्यंत केलेला प्रवास, तिथं भर दुपारी झाडाच्या सावलीत बसची वाट पाहणं. खेड्यातल्या बाया, बाप्ये अन् पोरं सगळेच तिथं जमलेले. पोरांच्या हातात चिवड्याचं पाकिट नाहीतर घरचा लाडू किंवा बाजारातून आणलेली गोडी शेव. जवळपास कुत्रीही सावलीसाठी आलेली. बस स्टॅंड नाही अन् स्टॉप नाही. काळ्या डांबरी रस्त्यावर उष्णतेने उठणाऱ्या लाटा आणि त्या लाटांत दिसणारं मृगजळ. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, माणसं, सारं पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाप्रमाणे हलताना दिसायचं...बाया डोईवरला पदर अधूनमधून सारखा करीत. बाप्ये डोळ्यांवर हात धरून दूरवरून येणाऱ्या वाहनाचा वेध घेत. भयानक शांतता बाभळीच्या झाडावरून अखंड येणारा किर्रर्रर्र आवाज... आणि वाहन दृष्टीच्या टप्प्यात येण्याच्या आधीपासून येणारा त्याचा धीरगंभीर आवाज. सरावलेले गावकरी त्या आवाजावरून कुठलं वाहन आहे ते ओळखत. हा सगळा अनुभव. याला ना कथा ना गोष्ट... फक्त भावना. थोडी विरक्तीची.... विश्वाचा विचार करायला हीच ती वेळ आणि वातावरण... माणसाचा खुजेपणा त्याला जाणवून देणारी... कमीत कमी  मला तरी हा साक्षात्कार होतोच या वातावरणात.

रविवार, २९ जानेवारी, २०१२

काळ

 संग्रहालयातील एक मोठा हॉल. तुडुंब भरलेला. सगळ्यांच्या नजरा एका मोठ्या लाकडी घड्याळावर खिळलेल्या. घड्याळावर सुंदर नक्षी. 
जुनाट वस्तूंवर एक  गुढतेची छटा येत जाते आणि तसतसं त्यांचं मूल्यही वाढत जातं. त्या मौल्यवान होत जातात. लहानपणी तर अशा जुनाट, गूढतेचं अभ्र पांघरलेल्या वस्तू परीराज्यातून आल्यात असं वाटायचं. त्यांच्यामागे अल्लाउद्दीनच्या दिव्यासारखी काही जादू लपली असेलसं वाटायचं. त्यामुळे अशा वस्तूंचं (मग ते काहीही असो) मूल्य आमच्यालेखी अनमोलच असे. 
तसंच दिसणारं हे घड्याळ...

सेकंदही बराच मोठा वाटतोय. काळ मंद झालाय, एक एक पाऊल तो चालतोय. त्याच्या एका पावलामागे 
ऱ्हदयाचे अनेक ठोके पडलेले..... क्षणात वाटून जातं,  इथं काळ एवढा मंद, हळू कसा? आयुष्याची तीस वर्षं कशी क्षणात निघून गेली आणि इथं एक एक मिनिट जाता जात नाही. वाट पहावी लागतेय. 

मृत्युशय्येवर वृद्धापकाळीही असंच असेल. काळाचं जवळ येणारं पाऊल असंच संथ पडत असेल. 


पंधरा मिनिटे राहिली. मंजूळ किणकिण ऐकू येते.

आता एक अस्वस्थ शांतता पसरलीय. लोकांच्या अस्वस्थ नजरा. घड्याळातील नगारा वाजवणारा माणूस. सेकंदाच्या लयीत त्याचा हात नगाऱ्यावर पडतोय. 

बरोबर तीन मिनिटे राहिली. दार उघडलं घड्याळातलं अन तिथं एक माणूस अवतरला. शंभर दोनशे लोकांची अस्पष्ट पण एका लयीत असल्यासारखी कुजबुज, आणि मग पुन्हा सगळं शांत. नगाऱ्यावरचा हात, क्षण, सेकंद, काळ सगळं शांत, मंद हळू .... अधीरता, उत्सुकता ताणली गेलेली.

बारा वाजतात. मघाचा दारात आलेला माणूस घंटेवर ठोके द्यायला लागतो. एक, दोन, तीन....
आता प्रेक्षाकांमधूनही अस्फुट शब्दोच्चार ...त्या ठेक्यांच्या लयीत. चार पाच सहा...

जणू काळ ठोके देतोय....काळाचेच तर ठोके न हे ? त्यांची लय ऱ्हदयातल्या ठोक्यांशी जोडल्यासारखी वाटतेय. 

सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा...पाहता पाहता ठोके देणारा माणूस अदृश्य होऊन जातो. संपलं सगळं. काळही असंच झडप घालत असतो न ? काळाबरोबर आपण आयुष्य मोजत राहावं, बारा वाजतात आणि 
ऱ्हदयात ठोके देणारा गायब. ठोके शांत सगळं शांत.

अचानक आनंदाचे, हर्षाचे चित्कार आणि टाळ्या उमटतात. शंभर दोनशे लोकांनी एकदम व्यक्त केलेला आनंद. 
हा आनंद नवा तास, नवा डाव सुरु झाल्याचा ? पुन्हा एक पासून गणना सुरु होणार म्हणून ? 

मी भानावर येतो. समोर सुंदर नक्षीकाम केलेलं लाकडी गूढ घड्याळ आणि आजूबाजूला पांगत चाललेली गर्दी.....                                                  

रविवार, १ जानेवारी, २०१२

भोंगीर (भुवनगिरी)

काल मला हैदराबादेत जीवन असल्याची जाणीव झाली... इतके दिवस घुसमटत जगत होतो इथे....काल जरा मोकळा श्वास घ्यायला मिळाला... निमीत्त झालं भोंगीरच्या (भुवनगिरी) चढाईचं!
माझी इथे आल्यापासून कायम तक्रार होती... इथे आजुबाजूला काहीच नाहीय....फिरायला, ट्रेकींगला....कमीत कमी १८० कि.मी. जावं तेंव्हा कुठे नागार्जुनसागर सारखं एखादं ठिकाण सापडतं... पण आता मी अशी तक्रार नाही करणार.
काही दिवसांपूर्वी आलेर (कुलपाकजी) या जैन तीर्थक्षेत्री जाताना ट्रेनमधून  एका प्रचंड मोठ्या  एकसंध पाषाण कड्यावर एक किल्ला दिसला. गाडी या किल्ल्याला अर्धवर्तुळाकार वळसा मारून जाते. ठरवलं, या किल्ल्यावर यायचं.
काल योग आला. किल्ला दुर्गम नाही. पण तहानच ती. दुध नाही मिळालं तर ताकावर भागते..

View Larger Map

घरातून सकाळी सात वाजता निघालो. सिकंदराबाद, उप्पल मार्गे भुवनगिरी असा सरळ रस्ता आहे. उप्पल पासून वारंगळ हायवे ने साधारणतः ४० कि. मी. गेल्यावर समोेर हा एकसंध शिलाखंड असणारा डोंगर अन् त्यावर ठेवल्यासारखी दिसणारी भग्न इमारत दिसू लागते. इथेच डाव्या हाताला भुवनगिरीचा फाटा फुटतो. रस्ता चांगला आहे. गावात गेल्यानंतर बस स्टँडच्या मागच्या बाजूचा रस्ता किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी नेवून सोडतो. पायथ्याशी एक देवीचं आणि मारुतीचं देऊळ आहे. वर जाणारा रस्ता थोडा अलिकडेच आहे. त्याला कमान आहे अन् तिथून पायऱ्या सुरू होतात. तटबंदी बऱ्याच ठिकाणी शाबूत आहे. झाड झाडोरा वाढलाय. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर त्या मोठ्या शीलाखंडाचा दुसरा टप्पा दिसू लागतो. या दोन टप्प्यांच्या मधल्या खोबणींना बंधारा घालून तिन टप्प्यांमध्ये पाणी साठवायची व्यवस्था केलेली दिसते. (आता त्या कुंडांत कमळं उगवलीत) इथून पुढे दगडातच पायऱ्या कोरल्यात.
अगदी वर गेल्यावर घोंघावणारे वारे सुरू होतात... वरही कुठेकुठे बांध घालून पाणी साठवायची व्यवस्था केलीय.

वर जावं, हैदराबादच्या कलकलाटापासून, जीवघेण्या ट्राफीकपासून, शहरी आणि कृत्रीम जीवनापासून दूर, शांत-निवांत बसावं, मोकळी हवा खावी, खाली खेळण्यातल्या सारख्या दिसणाऱ्या झुकझुकगाड्या पहाव्यात, शांत पडून रहावं, फुप्फुसांमध्ये जीवन भरून घ्यावं दोन चार सुंदर घटका अनुभवून खाली यावं
एक दिवसात जावून येण्यासाठी छान ठिकाण आहे. मोटारसायकलने जायलाही मजा येइल. गाडीने जायची इच्छा नसेल तर सिकंदराबादहून भुवनगिरीला सकाळी भरपूर ट्रेनही आहेत.

भुवनगिरी पासून १३ कि.मी. वर यादगिरीगुट्टा इथं श्री नृसिंहाचं देऊळ आहे. भुवनगिरी ते यादगिरीगुट्टा हा रस्ताही सुंदर आहे. दोन्ही बाजूंना व्हिडीओ गेममध्ये असतात तसे डोंगर, तलाव..... तलावांमध्ये चित्र-बलाक अन् तत्सम पक्षी.....

 या रस्त्यावर मला नीराही पहायला मिळाली! लोक ताजी नीरा झाडावरून काढून आणून त्याच माठांमधून विकत होते...

खाली काही छायाचित्रे देत आहे....

.







































 


Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.