शनिवार, २५ डिसेंबर, २०१०

विचारांची गर्दी

अनेक तुटक विचारांची अशी गर्दी होते कधी कधी. 

स्वतः कमवायला लागलो आणि लग्नानंतरच्या जबाबदा-या अंगावर पडल्या की बाबा कळायला लागतात. मग लहानपणी एखादेवेळी बाबा असेच का वागले असतील ते कळतं. महिन्याभराच्या खर्चाची तोंडमिळवणी करताना कसा विचार करावा लागतो, कसे निर्णय घ्यावे लागतात याचं प्रात्यक्षिक करायची वेळ आल्यावर मग बाबा किती ग्रेट आहेत असं वाटून जातं. 




कॉलेजच्या दिवसांतला रविवार आणि आता नोकरी - संसार यांत मुरल्यावरचा रविवार यांतही किती अंतर न?

तो रविवार बेभान होऊन जगण्याचा तर हा रविवार संयमित.
तो रविवार झपाटून जाण्याचा तर हा रविवार स्वतःला शोधण्याच्या निरर्थक प्रयत्नात. 
त्या रविवारी आळशीपणे उठावं आणि मधेच अंगात आल्याप्रमाणे कसलातरी बेत ठरवून तो अमलात आणावा.
ह्या रविवारीही आळसच पण त्यात 'त्या' रविवारची मजा नाही, आठवड्याभराचा शीण; बेत तरी कसले ठरणार? तर किराणा संपलाय, बिलं भरायची आहेत आणि बरीच सटर फटर कामं तुंबून राहिलीयत.
तो रविवार म्हणजे मस्त पुस्तक वाचावं, मोठ्या आवाजात गाणी लावावीत, एखादं नाटक नाहीतर पिक्चर टाकावा, कुठेतरी भटकून यावं नाहीतर एखाद्या मित्राकडेच गप्पाष्टक रंगावं
ह्या रविवारी स्वतःला स्वतःसाठी वेळ मिळाला तरी खूप. घरच्याना वेळ द्यावा, कुणातरी ओळखीच्यांना नाहीतर नातेवाईकांना भेटून यावं  किंवा फोन करावेत (कमीत कमी जनरीत म्हणून तरी!) आणि पुन्हा ऐकावं की तुम्ही तर काही संबंधच ठेवत नाही (हे स्वतः किती ठेवतात ?). 

रविवार तेच पण अर्थ बदललेले.!!!





असाच udct तल्या दिवसांतला रविवार आठवतो. 

सकाळी रोजच्यापेक्षा थोडं उशिरा उठायची संधी (रोजही मेसवर जायचंच आणि आजही, पण रोज मेस नऊ पर्यंतच तर आज साडेनऊ पर्यंत!)
मेसवर तर जायचंच कारण आजचा स्पेशल नाश्ता म्हणजे फ्राय केलेली मॅगी आणि ग्लास भरून कॉफी. तशी मॅगी मला आजपर्यंत नाही जमली, आणि ती चवही जिभेवरून जात नाही. कॉफीही तशीच. आहा. का नाही जमत मला किंवा कोणालाच तशी  कॉफी, तशी मॅगी.....

मग तासभर रीडिंग रूम मध्ये सतराशे साठ  पेपरच्या पुरवण्या वाचायची मेजवानी. कधी कधी एखादा लेख वाचताना सेंटी होऊन जावं, तर कधी स्वतःशी हसावं तर कधी आपल्याशी किती मिळतं जुळतं आहे म्हणून खुश व्हावं. कधी कधी तर एवढा रमून जायचो की मी तिथे एकटाच उरलोय हेही लक्षात यायचं नाही. 

तिथून उठून मुन्ना कँटीन च्या कट्ट्यावर जाऊन बसायचं. रविवारी समोरच्या मैदानात क्रिकेट चालायचं, ते पहायचं. क्रिकेट नसेल तर स्वतःच्याच विचारात कंटाळा येईपर्यंत बसायचं. मित्र येत जाता १०-१५ मिनिट गप्पा मारून जायचे. तिथल्या मांजरी येऊन घोटाळत बसायच्या. कावळे कावकाव करून डोकं उठवायचे, नाहीतर कधीतरी प्रसादही द्यायचे. 
असं करता करता १२ वाजायचेच. मग पुन्हा मेसमध्ये फीस्टला जायचं. या फीस्ट चा अर्थ म्हणजे संध्याकाळी जेवण नाही.  ही आमच्यासाठी इष्टापत्ती! आज संध्याकाळी तरी मेसचं खावं नाही लागणार!
आणि मग स्वारी कुठेतरी आर्टगॅलरी किंवा मार्केट अशी भटकायला बाहेर पडणार. कॉलेजच्या बंद गेटकडे पाहून खुश होत,  कैलासपती च्या फळा फुलांकडे पाहत बाहेर!



जवळच्या चर्च मध्ये मास साठी जमलेली गर्दी, बाहेर विक्रीसाठी ठेवलेल्या काय काय वस्तू पाहताना मजा यायची. फ्लोरीष्टांच्या दुकानासमोरून गेलं की फ्रेश वाटायचं. 

ते रस्तेही शांत, गर्द अशा सावल्यांनी झाकलेले आणि कुठल्यातरी फुलांचा सडा सतत मिरवणारे असे होते. मुंबईतही असे रस्ते आहेत याची गंमत वाटायची. त्या रस्त्यांवर चालताना कावळ्यांच्या कावकाव बरोबर इतर पाखरांचेही आवाज येत. अशी शांतता अनुभवून कसं शांत शांत वाटायचं.



संध्याकाळी एखादं नाटक किंवा गाण्याचा कार्यक्रम असला तर तो ही करून यायचं.  कॉलेजच्याजवळच एक गावदेवीचं आणि गणपतीचं देऊळ आहे, तिथे सांजारतीला आवर्जून जायचं. तिथली गणपतीची काळ्या दगडातली मूर्ती मला फार आवडायची.

मग पुन्हा मुन्ना कँटीन गाठायचं. त्याच्याकडची ब्रेड आणि शेवभाजी म्हणजे अहाहा. तेच आमचं रात्रीचं जेवण. मग जवळच्या ग्राउंड शेजारील बाकावर जाऊन बसायचं समोरच्या काळोख्या मैदानाकडे पाहत. मागे मोठं वडाचं झाड, एक शांतसा दिवा आणि समोर काळोखात डूबलेलं मैदान....

रात्री मग पुन्हा त्या छोट्याश्या झोपडपट्टीतून चालत, तिथल्या जीवनाचे कंगोरे पाहत रूमवर.....





आणि आता अशोक मास्तरचं स्वगत

जा जा ........... मंजुळा, जा 
मी तुला केली क्षमा 
जरी तू केलास माझा कम्प्लीट मामा 
तसा मी अत्यंत क्षमाशील 
पण यानंतर जर परत येशील, 
तर यावं लागेल ढोपरांवर रांगत
'मी चुकले, चुकले, चुकले असं सांगत   
दारातच उभी राहा भीक मागत 
मी नाही आता तुझं देणं लागत 
साला! लग्न करणार म्हणे त्या वश्याशी ?
त्या आगाऊ येडपट बावळट घुश्याशी?
अगं, पण मला तुझी जडलीय सवय .....
तुझं हसणं,  रुसणं.... सगळं मला हवंय
जा जा जा .... खुशाल लग्न कर आणि मर!
नाही, पण ते शक्य नाही 
मागं ठेवलयस बरंच काही 
वातावरणात तुझा श्वास 
नकळत घेतलेला तुझा ध्यास 
'मंजू, हे आण,' 'मंजू, ते आण'
मंजू झालीय  सहावा प्राण 
या बायका साल्या पक्क्या चोर 
नाकात नकळत घालतात दोर. 
आपण अस्वल, ह्या दरवेशी 
आणि ह्या म्हणे पायाच्या दासी !

   

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.