मंजुळा : (रागानं ताडकन उठते. ज्या दिशेला ते दोघे गेले तिकडं पाहून )
असं काय मास्तरसाहेब ? गधडी काय? नालायक? हरामजादी?
थांब
थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुज्या पापाचा भरलाय घडा!
मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर.
मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर.
तुजं मसणात गेलंय ग्यान, तुज्या त्वाँडात घालीन शान.
तुजा क, तुजा ख, तुजा ग, तुजा घ, मारे पैजंचा घेतोय इडा !
तुला शिकवीन चांगलाच धडा!
तुजा उतरीन समदा माज, तवा येशील गुंडाळून लाज,
माजी चाटत येशील बुटं, मी म्हनन, काय आज इकडं कुठं?
हात पसरून मागशील भीक, मी म्हनन जरा शुद्ध बोलायला शीक.
मग उडवून हात, सांगीन धरायला वाट, चाल भाईर मुकाट
उगं वळवळ करतोय किडा! तुला शिकवीन चांगलाच धडा!
तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील माझा तोरा,
ओ हो हो , आ हा हा, ओ हो हो , आ हा हा
हाऊ स्वीट, हाऊ स्वीट,
लव्हली, चार्मिंग, ब्युटी हाय, समदे धरत्याल मंजूचे पाय.
कुत्र्यावानी घोळवीत गोंडा, तरन्या पोरांचा दारात लोंढा
हाय मंजू, हाय दिलीप....
हाय मंजू, हाय फिलीप...
मंजुबेन केम छो, हाऊ डू यु डू
कम कम, गो हँगिंग गार्डन, आय बेग युवर पार्डन?
कुनी आनतील सिलीकची साडी, कुनी देतील मोत्याची कुडी,
कुनी घालतील फुलांचा सडा! तुला शिकवीन चांगलाच धडा!
मग ? कुठूनसा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार,
नदरेला जेव्हा नदर भिडंल, झटक्यात माज्या पायाच पडंल
म्हनल, रानी, तुज्यावर झालो फिदा, क्या खुबसुरती कैसी अदा.
माग, माग, काय हवं ते माग, प्यारी माज्यावर धरू नकोस राग.
मी मात्तर गावठीच बोलीन, मणाची गाठ हळूच खोलीन
गालावर चढंल लाजेची लाली, नदर जाईल अलगत खाली
म्हनेन त्याला, ह्ये काय असं, लोकांत उगंच होईल हसं
कुम्पणापातर सरड्याची धाव, टिटवीनं धरावी का दर्याची हाव?
हि-याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा? गटाराच्या पान्याला सोन्याचा घडा ?
मग राजाच येईल रथात बसून, म्हनंल, कसं बी कर पन हो माझी सून
दरबारी धरत्याल मुठीत नाक, म्हनत्याल, राजाचा मान तरी राख
तोरणं बांधा न् रांगोळ्या काढा, त्या अशोक्याला शिकवीन चांगलाच धडा !
मग मंजू म्हनल, म्हाराज ऐका, त्या अशोक मास्तरला बेड्याच ठोका.
शिशाचा रस त्याच्या कानांत वता, आन लखलख सुरीनं गर्दन छाटा
मास्तरला घोड्याच्या शेपटाला जोडा, आन पाटलून काढून चाबकानं फोडा.
म्हाराज म्हनत्याल, भले हुशार, धाडून द्या रे घोडंस्वार
हा हा हा हा
जावा राजाचं शिपाई धरत्याल तुला, म्हनशील मंजे सोडीव मला.
धरशील पाय आन लोळ्शील कसा, रडत -हाशील ढसाढसा
तुझा ए, तुझा ओ, तुझा न तुझा ण, तुज्या श्या, तुजं वसकन आंगाव येणं
भोग आता गप तुज्या कर्माची फळं, तुज्या चुरूचुरू जिभेला कायमचं टाळं
म्हाराज म्हनत्याल, ह्याची गर्दन तोडा, मी म्हनन जाऊद्या, गरिबाला सोडा
तू म्हनशील, मंजुदेवी तुला आलो मी शरन
मी म्हनन शरन आल्यावं देऊ नये मरन.
पुढच्या वेळी अशोकमास्तरचं स्वगत.