बुधवार, ७ सप्टेंबर, २०११

मी माणूस......(स्वार्थी, निर्लज्ज)

मी आज हरलो…..
सपशेल हरलो.
मागे एकदा कंपनीत ठीपकेवाल्या मुनियांनी घरटी केली होती. घरट्यात पिले दिली का ते माहित नाही पण कंपनीच्या इंजिनियरच्या लक्षात ते आलं. मग एक दोन दिवसांतच ज्या पाईपमागे ते घरट होतं, तो पाईपच बाहेरून बांधून बंदिस्त  केला गेला. मी त्या वेळी कंपनीच्या कारभाराला, वातावरणाला, माणसाच्या असंवेदनशीलतेला मनातल्या मनात शिव्यांची  लाखोली वाहिली. यांत्रिकीकरण आणि औद्योगिकरणाच्या नावाने खडे फोडले….
आज आमच्या प्लॉट वर घराचे बांधकाम सुरु करण्यासाठी सर्वेक्षण करायला गेलो होतो. भरपूर बाभळी वाढल्या होत्या. त्या बाभळीवर सुगरणींनी घरटी केली होती. इंजिनियरने सरळ सांगितलं की हे सगळं साफ करावं लागेल. घर बांधणे  सुरु करायचे असेल तर त्याला पर्याय नव्हता….पण मला त्या सुगरणींच्या घरांवरून फिरणारा JCB दिसत होता. त्या सुगरण  पक्षांची मेहनत दिसत होती….. त्यांची घरे पडताना होणा-या  केविलवाण्या तडफडीची कल्पनाही करवत नव्हती. मी माझ्या एका घरासाठी सुगरणींची पाच सहा घरटी मोडणार होतो….
बरेच दिवस ऐकलेला पण न उमजलेला मुद्दा आज अगदी -ह्दयात घर करून गेला. कुठून आणला माणसाने जमिनीवर मालकी हक्क? कुणी दिली त्याला जमिनीवर मालकी ? माणसाएवढाच हक्क या प्राण्यांचा नाही का?

कुठे गेला यांत्रिकीकरण आणि औद्योगिकरणाच्या नावाने खडे फोडणारा मी ? मीही त्याच व्यवस्थेचा एक भाग तर आहे….
मानव  विरुद्ध  निसर्ग  ह्या  लढ्यात मी माणसाच्याच बाजूने आहे. निसर्गाबद्दल कितीही सहानुभूती आणि आपुलकी दाखवली तरी मी मनुष्य प्राणीच…पूर्णपणे निसर्गाच्या बाजूने नाही उभा राहू शकत. निसर्गाच्या विरूद्धच असणार मी कायम. माणसाची प्रत्येक कृती कुठेतरी निसर्गाला हानी पोहोचवतेच आहे. या सगळ्याची जाणीव मला आज प्रकर्षाने  झाली आणि तिथेच मी  हरलो… 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.