शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०१४

कुकीज्

व्हाट्स  ॲपवरून एक ॲनिमेटेड व्हिडीओ आला… एक मनमौजी आणि निरागस दिसणारं डुकराचं पिलू ऐटीत डुलत चाललंय आणि त्याला फ्रीजवर बिस्कीटांची बरणी दिसते. लहान मुलांना साजेसे भाव त्याच्या डोळ्यांत उमटतात. त्याला ती बिस्कीटं हवीयत, पण काढायची कशी? मग बालवयाला साजेशा खटपटी सुरू होतात!
झाडू, शिडी, आणि नंतर अनेक क्लृप्त्या! लहान मुलांची अफाट कल्पनाशक्ती कशी असते ते,   ॲनिमेटेड असल्याचा फायदा घेत क्लृप्त्यांच्या रुपाने समोर येत राहतं. इतका सुंदर व्हिडीओ आपल्यातल्या बाल्याला आव्हान देत खिळवून ठेवतो. त्या डुकराच्या चेहऱ्यावरचे सर्व भाव तर अप्रतिम!
पण हे नव्हतं सांगायचं. तो व्हिडीओ खूप आधी पाहिला होता! पण यावेळी तो जास्त खिळवून ठेवणारा ठरला! का बरं?
आता त्या व्हिडीओत कुणीतरी पार्श्वसंगीत म्हणून एक गाणं टाकलं होतं. भाषा माहित नाही पण गाणं एका लहान मुलीच्या आवाजात होतं आणि अगदी चपखल बसत होतं. जणू याचसाठी आहे हे गाणं.  त्या पिलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव जणू गाण्यातून व्यक्त होतायत. त्या डुकराचं नाव ऑर्मी! (डिस्नेचंच पिलू!)
शोध घ्यायचा प्रयत्न केला तेंव्हा क्लिओपात्रा स्ट्रॅटन नावाच्या एका गोड मुलीचा अल्बम आणि ते गाणं सापडलं. ती भाषा बहुतेक रोमानियन आहे. त्याच मुलीची आणखी काही गोड गाणी तिच्या नावाने शोधल्यावर सापडली. युरेका! मी सगळ्या व्हिडीओच्या लिंक खाली देत आहे. आवडल्यास जरूर सांगा!
१. http://www.youtube.com/watch?v=vyZ9izU85_Q

२. http://www.youtube.com/watch?v=dS1Gf7qq2sI

३. http://www.youtube.com/watch?v=OY1vv7hQQCg

त्या गाण्याचं सार जे मला समजलं ते असं. मी एका बाटलीतून खिडकीतल्या झाडांना पाणी घातलं आणि उरलेलं आमच्या माऊला दिलं आणि माऊ गायला लागली. मग मी थोडं पाणी माशांना पण दिलं. त्यांनी पण शांत न राहता गावं म्हणून!. त्या बाटलीत काय होतं कोण जाणे!
फक्त  परसातली बदकं मात्र शांत होती ती शांतच राहिली. उद्या काय होईल कोण जाणे पण आता तर मजा आहे ना! तशी आणखी एक बाटली मिळायला हवी!सकाळपर्यंत मात्र सगळे गातच राहिले!!!

शुक्रवार, १ ऑगस्ट, २०१४

बोलकी ढलपी

हल्ली बोलक्या ढलप्यांची गोष्ट वारंवार प्रत्ययाला येते. कधीतरी 'सकाळ' मध्ये  गंगाजळीत वाचलेली...

काही नाही, चेकबुक सापडत नव्हतं म्हणून पुर्ण ड्रॉवर काढला आणि त्यात अनेक कागद, चिठोऱ्या, बिलं सापडली...बरीच जुनी. काही फक्त बिलं, कारण त्यांच्यावरून दुसरा कुठलाही संदर्भ लागत नव्हता. नुसते आकडे. पण काही मात्र लांबलचक गोष्टी सागत होती.
हे होम नीडस फर्नीचरचं बिल. 'बायको'ला शिवण मशिन ठेवायला कपाट कम टेबल आणलं पण ती जागा पटकावली फिश टँकने. त्यावेळी बरेच मासे काचेच्या बाऊल मध्ये होते, काही (मित्राने घर सोडून जाताना दिलेले) चक्क बादलीत होते. फिश टँकला प्राधान्य मिळालं अन् त्याने जी जागा पटकावली ती आजपर्यंत. शिवण मशीन अजून जागा शोधतंय. दोन वर्षं झाली त्याला.
घराच्या बांधकामाचं कोटेशन... किती सोपं वाटलं होतं तेंव्हा घर बांधणं...पूर्ण घर बांधण्याच्या एक वर्षाचा कालावधी सरकला डोळ्यांसमोरून. आर्थिक, मानसीक, शारिरीक  ओढाताण... हैदराबाद वरुन घरी केलेल्या चकरा, अनेक वेळा घ्यावे लागलेले निर्णय, काही चुकलेले, काही अचूक. आई-बाबांना घालाव्या लागलेल्या चकरा...आणि बांधकाम पूर्ण झाल्यावरचं समाधान. सोबतच घरासाठी, बाथरुमसाठी टाईल्स निवडताना त्यांच्या डिझाईन्सची लिहून घेतलेली पन्नास एक नावांची लिस्ट. त्यातल्या टाईल्स घेतल्या नाहीतच कारण बजेट खूप वाढलेलं... नंतर कसाबसा पेललेला आणि आधीचं कोटेशन पाहताना अंदाजही न आलेला खर्च... खरंतर आता कोटेशन पाहताना वाटतं की हे म्हणजे हत्तीची फक्त सोंड पाहण्यासारखं. खऱ्या हत्तीचा कसा अंदाज यावा...
दूध, साखर, तांदूळ,उदबत्ती...अशी यादी..
कपड्यांचं बिल. मागच्या वाढदिवसाच्या दिवशी घेतलेले कपडे
प्रेस्टीज चं बील. त्यावेळी एक्सचेंज चालू होतं. मग काय, जो बिवीसे करे प्यार वो प्रेस्टीज से कैसे करे इन्कार... तसंही सौंना कढया फार आवडतात.
एक इमर्जंन्सी लाइटचं बिल. आता इन्वर्टर घेतलाय.
एक चांदीच्या चमचा वाटीचं बिल. समोरच्या हारुण चा पहिला वाढदिवस. समोर आजी-आजोबा राहतात. त्यांचा नातू. आजी आजोबांचा मुलगा आणि सून सिंगापूरला. तिथे पाळणाघरात विशिष्ट वयाच्या आतील मुलं घेत नाहीत. आजी आजोबांनी हारूण आणि त्याचा मोठा भाऊ अर्णव दोघांनाही सहा महिन्यांहून जास्त सांभाळलं. वाढदिवसाचा कार्यक्रम जोरातच झाला पण त्यातच त्यांच्या मुलाने अन सुनेने आजी आजोबांच्या लग्नाचा वाढदिवसही केला. सर्वांसाठीच तो सुखद धक्का होता!
एटीएम मधून पैसे काढल्याच्या पावत्या, खूप दिवस राहून कोऱ्या झालेल्या. पैशांचा, काढलेल्या रकमेचा निरर्थकपणा सांगणाऱ्या.
एक लगेजच्या दुकानाची पावती. जर्मनीला, पहिल्या परदेशवारीला जाण्यासाठी तिथून बॅगा घेतल्या होत्या. त्याबरोबरीने केलेली गरम कपड्यांची खरेदी..आणि त्याआधीच्या वर्षी जायची हुकलेली संधीही आठवली.पासपोर्ट हरवलेला होता तेंव्हा. कसा हरवला ह्याची तर चित्तरकथाच.एका पावतीवर एकमेकांना जोडलेले असे सुखाचे अन् दुःखाचे क्षण एकदम वर आले.
सौंनी सुरू केलेल्या एरोबीक्स क्लासचीही पावती सापडली...त्या क्लासच्या गंमती सौ सांगायच्या.त्यांचे शनिवारच्या स्पेशल क्लासचे एसेमेस माझ्याच नंबरवर यायचे.
पगारात कसं भागवायचं यासाठी पगाराची रक्कम अन् खर्च यांची केलेली आकडेमोडही सापडली.
रकमा लिहून सही करून ठेवलेले बिननावाचे चेक सापडले. आता बादही झाले होते. पण काही केल्या आठवत नाही कशासाठी ते लिहून ठेवले होते ते....
हिंदू पेपरची पावती. त्यावरून आठवलं. इथं राहायला आल्यावर लगेच एक मुलगा पेपरची सहा महिन्यांची स्कीम घेवून आला होता. पेपर तर घ्यायचा होता पण शिफ्टींग व इतर गोष्टींमुळं पैसेच शिल्लक नव्हते. आईने तिच्याकडचे दिले होते.
तारामती बारादरीचं तिकीट. पौर्णिमेच्या संध्याकाळी रंगलेला शास्त्रीय नृत्य अन् गायनाचा कार्यक्रम.एकीकडे संध्याप्रकाशात चंद्रोदय अन् दुसरीकडे रंगत जाणारा कार्यक्रम. मागे बारादरीची ऐतिहासीक वास्तू. तिथेच काही अरबी संगीत वाद्यंही ऐकायला मिळाली. त्यांची शास्त्रीय संगीताशी जुगलबंदीही ऐकायला मिळाली अन् त्या वाद्यांवर काही हिंदी गाण्यांच्या धून ही ऐकायला मिळाल्या.
अशी ही बोलकी ढलपी बोलायला लागली की काम बाजूलाच, आपण वेगळ्याच विश्वात अन् वेळेचा पत्ताच नाही....
ती जाहिरात आठवते, ज्यात आजोबा डास शोधत असतात आजीशी लागलेल्या पैजेप्रमाणे अन् त्यांना त्यांच्या कॉलेजचा फोटो सापडतो (किंवा आजींचं लक्ष वळवण्यासाठी ते शोधून काढतात!). तसंच काहीसं हे.

गुरुवार, २४ जुलै, २०१४

बाजारातली चक्कर....

काल इथल्या शेतकरी बाजारात गेलो होतो....
ठरवूनच गेलो होतो की आज फक्त फोटोग्राफी करणार. अन् लेन्समधून किती चेहरे त्यांच्या वैशिष्ट्यांसकट उभारले.
बाजाराच्या समोरच्या भिंतीवर पागोटेवाला शेतकरी आणि डोक्यावर पदर घेतलेली शेतकरीण रंगवलेले.
भाजीवाल्यांची लगबग होती. सर्व शेतकरीच. कपड्यांबद्दल सर्वांचं एकमत. ते फक्त लज्जारक्षणार्थ आहेत. आणि ते घातल्यावर स्वतःला सुटसुटीत मोकळं वाटायला हवं.
चेहऱ्यांवर नैसर्गिक हास्य आणि समाधानाचा मेक-अप. माणुसकी आणि आपुलकी प्रत्येक कृतीत ओतप्रोत. अगदी घासाघीस करतानाही. हिरव्यागार अन् टवटवीत भाजी सारखी हिरवीगार अन टवटवीत मनं...
रापलेले, सुरकुतलेले, करपलेले, तरीही प्रफुल्लीत चेहरे. तंबाखू, मिश्री, पान यांमुळे रंगलेले पण निखळ हास्यातून सुंदर दिसणारे दात. पुरूषांची खुरटलेली पांढरी होणारी किंवा झालेली दाढी-मिशी, स्त्रीयांच्या नाकातला एखादाच चमकीचा खडा, एखादाच जडसर दागिना...
अगदी सकाळीच गावाकडनं निघावं लागत असल्यामुळे थंडीसाठी एखादी शाल किंवा अगदी टाॅवेलसुद्धा डेक्याला गुंडाळलेला, पुरूषांनी डेक्याला मुंडासेवजा फेटा गुंडाळलेला...
पुरूषांनी अंगात बंडी अन् धोतर घातलेलं...
किती बारीक-सारीक गोष्टी लेन्समधून समजत होत्या....
विक्रीबरोबरच एकमेकांचे पाय खेचून हसणं, गप्पा अन् विनोदबुद्धीने बाजार जास्त खुलला होता....
ज्यांना मी कॅमेऱ्यासकट दिसत होतो त्यांच्या डोळ्यांत कुतूहल होतं, कौतुक होतं, थोडं बुजरेपण होतं, उद्याच्या पेपरात फोटो येणार याचा विश्वास होता...ते पेपर वाचणार नव्हते तरीही....एक हसू फुटत होतं.
एकाने शेजारच्या भाजीवाल्याला चिडवत सांगितलं की आता सगळ्यांना कळणार तू भाजीवाला आहेस म्हणून!
दुस-याने शेजारच्या बाईची फिरकी घेत सांगितलं... यांचा काढा फोटो, या सावकार आहेत!!!
 
काही चेहरे निर्विकारही होते. स्वतःच्या मनोराज्यात रमलेले.... काहींना विक्रीची काळजी दिसत होती... हमाल शेतकऱ्यांची पोती वाहून नेण्याचं काम करत होते... त्यांचा धंद्याचा टाईम होता....

चिमण्याही सांडलेले स्वीट कॉर्नचे दाणे पळवत होत्या, घरट्यासाठी कणसातले मऊ धागे पळवत होत्या. 


१५-२० मिनीटांत किती पाहीलं लेन्स मधून जे इतर वेळी उघड्या डोळ्यांनीही पाहत नाही...

 

रविवार, ३० जून, २०१३

बोचरे काटे.

हेल्मेटवर येवून आदळलेलं आणि रस्त्यावर पडून तडफडणारं फुलपाखरू....

आईच्या मागून एकामागे एक रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना ट्रकच्या चाकाखाली आलेली कुत्र्याची पिलं आणि त्यांच्या निष्प्राण देहाकडं बघत रस्त्याकडेला बसलेली त्यांची आई....

रेल्वे स्टेशनवर कित्येक वर्षे उभी असलेली, त्यांच्यावरील घरट्यांसकट जमीनदोस्त केली गेलेली  झाडं....

रस्त्यावर कुत्ते की मौत मेलेल्या कुत्र्याच्या रक्त, हाड, मांस यांचा चिखल....

तलावांमध्ये ढकलला जाणारा कचरा, रस्त्यावरील खड्डयांत साचलेल्या मैला पाण्यातून जा - ये करणारी हजारो वाहनं...

कंपनीत लावलेल्या नोटीस बोर्डवर वाया जाणा-या अन्नाचा चढता आलेख अन् कुणीतरी कच-यात फेकून दिलेलं अन्न बोटे चाटत खाणारी अस्तित्वशून्य व्यक्ती......

सगळीकडे डोळेझाक करून फिरणारे आपण आणि वरचेवर असंवेदनशील होत असल्याची जाणीव असणारा मी.


Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.