गुरुवार, २४ जुलै, २०१४

बाजारातली चक्कर....

काल इथल्या शेतकरी बाजारात गेलो होतो....
ठरवूनच गेलो होतो की आज फक्त फोटोग्राफी करणार. अन् लेन्समधून किती चेहरे त्यांच्या वैशिष्ट्यांसकट उभारले.
बाजाराच्या समोरच्या भिंतीवर पागोटेवाला शेतकरी आणि डोक्यावर पदर घेतलेली शेतकरीण रंगवलेले.
भाजीवाल्यांची लगबग होती. सर्व शेतकरीच. कपड्यांबद्दल सर्वांचं एकमत. ते फक्त लज्जारक्षणार्थ आहेत. आणि ते घातल्यावर स्वतःला सुटसुटीत मोकळं वाटायला हवं.
चेहऱ्यांवर नैसर्गिक हास्य आणि समाधानाचा मेक-अप. माणुसकी आणि आपुलकी प्रत्येक कृतीत ओतप्रोत. अगदी घासाघीस करतानाही. हिरव्यागार अन् टवटवीत भाजी सारखी हिरवीगार अन टवटवीत मनं...
रापलेले, सुरकुतलेले, करपलेले, तरीही प्रफुल्लीत चेहरे. तंबाखू, मिश्री, पान यांमुळे रंगलेले पण निखळ हास्यातून सुंदर दिसणारे दात. पुरूषांची खुरटलेली पांढरी होणारी किंवा झालेली दाढी-मिशी, स्त्रीयांच्या नाकातला एखादाच चमकीचा खडा, एखादाच जडसर दागिना...
अगदी सकाळीच गावाकडनं निघावं लागत असल्यामुळे थंडीसाठी एखादी शाल किंवा अगदी टाॅवेलसुद्धा डेक्याला गुंडाळलेला, पुरूषांनी डेक्याला मुंडासेवजा फेटा गुंडाळलेला...
पुरूषांनी अंगात बंडी अन् धोतर घातलेलं...
किती बारीक-सारीक गोष्टी लेन्समधून समजत होत्या....
विक्रीबरोबरच एकमेकांचे पाय खेचून हसणं, गप्पा अन् विनोदबुद्धीने बाजार जास्त खुलला होता....
ज्यांना मी कॅमेऱ्यासकट दिसत होतो त्यांच्या डोळ्यांत कुतूहल होतं, कौतुक होतं, थोडं बुजरेपण होतं, उद्याच्या पेपरात फोटो येणार याचा विश्वास होता...ते पेपर वाचणार नव्हते तरीही....एक हसू फुटत होतं.
एकाने शेजारच्या भाजीवाल्याला चिडवत सांगितलं की आता सगळ्यांना कळणार तू भाजीवाला आहेस म्हणून!
दुस-याने शेजारच्या बाईची फिरकी घेत सांगितलं... यांचा काढा फोटो, या सावकार आहेत!!!
 
काही चेहरे निर्विकारही होते. स्वतःच्या मनोराज्यात रमलेले.... काहींना विक्रीची काळजी दिसत होती... हमाल शेतकऱ्यांची पोती वाहून नेण्याचं काम करत होते... त्यांचा धंद्याचा टाईम होता....

चिमण्याही सांडलेले स्वीट कॉर्नचे दाणे पळवत होत्या, घरट्यासाठी कणसातले मऊ धागे पळवत होत्या. 


१५-२० मिनीटांत किती पाहीलं लेन्स मधून जे इतर वेळी उघड्या डोळ्यांनीही पाहत नाही...

 

रविवार, ३० जून, २०१३

बोचरे काटे.

हेल्मेटवर येवून आदळलेलं आणि रस्त्यावर पडून तडफडणारं फुलपाखरू....

आईच्या मागून एकामागे एक रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना ट्रकच्या चाकाखाली आलेली कुत्र्याची पिलं आणि त्यांच्या निष्प्राण देहाकडं बघत रस्त्याकडेला बसलेली त्यांची आई....

रेल्वे स्टेशनवर कित्येक वर्षे उभी असलेली, त्यांच्यावरील घरट्यांसकट जमीनदोस्त केली गेलेली  झाडं....

रस्त्यावर कुत्ते की मौत मेलेल्या कुत्र्याच्या रक्त, हाड, मांस यांचा चिखल....

तलावांमध्ये ढकलला जाणारा कचरा, रस्त्यावरील खड्डयांत साचलेल्या मैला पाण्यातून जा - ये करणारी हजारो वाहनं...

कंपनीत लावलेल्या नोटीस बोर्डवर वाया जाणा-या अन्नाचा चढता आलेख अन् कुणीतरी कच-यात फेकून दिलेलं अन्न बोटे चाटत खाणारी अस्तित्वशून्य व्यक्ती......

सगळीकडे डोळेझाक करून फिरणारे आपण आणि वरचेवर असंवेदनशील होत असल्याची जाणीव असणारा मी.


शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

आरोळी....

लहानपणीची 'ऐस्क्रीम' ची आरोळी आजही लक्षात आहे. अगदी जशीच्या तशी आठवते. उच्चार, हेलकावे, चढ-उतार यांसकट. बरोबरीने आईस्क्रीम वाल्याची मूर्तीही डोळ्यांपुढे साकार होते. पांढरी ढगळ विजार, वर क्रीम रंगाचा नेहरू शर्ट. छत असलेली हातगाडी. त्यात मध्यभागी लाल कापड गुंडाळलेलं लाकडी पिंप. आईस्क्रीम काढण्याआधी पिंपात स्कूपने फेटणं, आईस्क्रीमचे स्टीलचे कप, आणि आईस्क्रीम... फक्त ऊन्हाळ्यात दिसणारी ही व्यक्ती..
सकाळीच एक हातगाडीवाला यायचा. 'मठाची भेळ' असं म्हणत. मला प्रश्न पडे, मठाची असं का म्हणतो तो? नंतर कळालं की मटकीला मठ असंही म्हणतात. त्याच्याकडे सर्व मोड आलेली कडधान्ये असत.
नंतर "रद्दी-पेपर, डब्बा-बाटली, लव्वा-लोखंडवाला" अशी आरोळी येई. ही आरोळी सर्वव्यापीच असावी असं वाटतं. प्रत्येक भागात त्या-त्या भाषेत, पण तरीही ओळखू येणारी. इथं हैदराबादेत पेपर-पेपर अशी टिपीकल आरोळी शनिवार-रविवार दिवसभर तासा-तासाने ऐकू येते. याच्याबरोबरीनेच "डबे बनवणार, डबे निट करणार," आणि आणखी बरंच काही बनवणार आणि नीट करणार असं सांगत पत्र्याच्या वस्तूंची कामं करणाराही येऊन जायचा.
'जोग' एवढा एकच शब्द उच्चारत एक जोगवा मागणारा यायचा. आणि दोन गोसावीही यायचे. त्यातला एक दारात येऊन शंख वाजवायचा आणि दुसरा एक पाय नाचवत कमरेला, गळ्यात अडकवलेली मोठमोठी घुंगरं वाजवायचा. यांची वेळ आणि गृहिणींची स्वयंपाकाची वेळ बरोबर साधे.

मग 'साडे-साडे' अशी आरोळी येई. सायकलच्या मागे लेदर फिनीशची ब्रिफकेस, त्यात साड्या. दुपारी बारा ते दोन पर्यंत असे चार पाच जण येऊन जात. सगळ्यांची आरोळी मात्र एकच एक ठरावीक. वेळ अशी साधायचे की सगळ्या गृहिणींची कामे होऊन त्या जरा स्वस्थ बसलेल्या असतील. तीन-चारच्या सुमारास "चिंध्या हेत का बाई" असं म्हणत बोहारीण यायची. आजीची ठरलेली बोहारीण अजून लक्षात आहे. दोघींना हुज्जत घालण्यात काय सुख मिळे कोण जाणे... कारण त्या जीव लावून हुज्जत घालीत आणि एकदा बोली ठरली की दोघीही संतोषाने पुढच्या कामाला लागत.

"अल्याची वडी लेपाक" असं म्हणत ॲलुमिनियम च्या थाळीत सोनाराकडे मिळतो तशा लाल कागदात गुंडाळलेल्या आलेपाकाच्या वड्या आणि त्याच थाळीत काजळी-धूर सोडणारी मोठी चिमणी असं घेऊन एक जण यायचा. चिमणीच्या प्रकाशात त्याची खुरटलेली पांढरी दाढी दिसायची. ती नेहमी तेवढीच खुरटलेली असायची.

परळीला असताना रात्री दहा-अकरा वाजता (खरं तर तशा गावात ती मध्यरात्र) खारे शेंगदाणेवाला यायचा. एकदम मजेशीर प्राणी. कैलास-वैजनाथ खारमुरे अशी  त्याची आरोळी रात्रीच्या शांत वातावरणात अख्ख्या कॉलनीत घुमायची. त्यानंतर तो गाणंही म्हणायचा. पूर्ण आठवत नाही, पण एक ओळ पक्की लक्षात बसलीय.
"वैजनाथाच्या पिंडीवर नागोबा डोलतो, आक् ऊक् आक् ऊक्"
आणि असं म्हणत हाताने नागाची फडी करून ती डोलवायचा आणि जमलेल्या मुलांपैकी एखाद्याला फुस्स करून घाबरवायचा.

"आगिनगालीचं तिकीत काला, गालीत लवकल बता" असं बोबडं गाणं म्हणून भिक मागणारी भिकारीण लक्षात आहे. असं अनोखं गाणं म्हणून भीक मागणारं कुणी दिसलं नाही पुन्हा.

आताशा अशा आरोळ्या ऐकायला मिळत नाहीत. काही काळाबरोबर गडप झाल्या असतील... दिवसाचे सक्रीय १० तास ऑफिसमध्ये घालवल्यामुळेही ऐकायला मिळत नसतील....

पण आता आरोळ्या ऐकल्या तरी त्यांची नक्कल करण्याची मजा घेता येत नाही कारण आता निरागसपणा राहिला नाही, आणि त्या आरोळ्यांंमागचे कष्टही समजतात. पण परवा खालच्या छोट्या साईने 'पेपर-पेपर' ची नक्कल केली तेंव्हा मी आणि अदिती ऊस्फुर्त हसलो.

या आरोळ्यांनी आपलं अनुभवविश्व समृद्ध केलंय खरं... 

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२

मुनीयांचं घरटं

आमचं घर तिसऱ्या मजल्यावर. एक छोटीशी बाल्कनी फक्त मोकळ्या हवेसाठी. आम्ही नाही नाही करत हळू-हळू कुंड्या आणायला सुरूवात केली. चार-दोन झाडे लावली आणि काही वेल लावले. गणेशवेल आणि गोकर्ण छान आले...बाल्कनीच्या जाळीवर छानदार पसरले. घराचा हा हिरवा कोपरा बाहेरुनही कसा छान दिसू लागला. मग आम्ही भोपळ्याच्या बिया पेरल्या. त्याही चांगल्या आल्या पण नंतर त्यांना कुंडीतलं जगणं मानवलं नाही बहुतेक. ते वेल पिवळे पडून सुकून गेले. आम्ही आमच्या परीनं हा कोपरा जिवंत करायचा प्रयत्न करीत होतो. निसर्गाच्या जवळ जायचा प्रयत्न करीत होतो. एकदोनदा शिंजीर येवून शोधाशोध करून गेले. मग वाटलं इथे पक्षी आले तर? आम्ही पाणी आणि खायला धान्य ठेवू लागलो, पण पक्षी फिरेनात.
मग घरट्यासाठी म्हणुन एक मातीचं बोळकं बाल्कनीच्या जाळीत अडकवलं. तिकडेही कुणी फिरकेना...आणि एक दिवस अचानक मुनिया दिसले. आम्हाला खूप आनंद झाला. ते बहुतेक आम्ही दोघे ऑफीसला गेल्यावर येत असावेत. मग आम्ही एक मक्याचं कणीस अडकवून ठेवलं. तिकडे यांनी ढुंकूनही पाहीलं नाही. अधून-मधून पाहणी करून ते जात.

मग एक दिवस अचानक गवताचं पातं घेवून एका मुनियाला मी उडताना पाहीलं. तो बाल्कनीत आला नाही तर आमच्या बाल्कनीच्या बाजूच्या मोकळ्या जागेतून वर गेला. आमच्या इमारतीला प्रत्येकी दोन फ्लॅटच्या मध्ये मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत खिडक्या उघडतात.

मुनियांच्या आधीच्या निरिक्षणावरून हे माहित होतं की यांना घरट्यासाठी लांब हिरवीगार गवताची पाती लागतात.

मी बाल्कनीतून वाकून पाहिलं तेंव्हा लक्षात आलं की आमच्या वरच्या मजल्यावरच्या घराच्या ए.सी. चा ब्लोवर ज्या ठिकाणी बसवला आहे त्याच्या आणि भिंतीच्या फटीत यांचं घरटं बांधणं सुरू होतं. बाल्कनीच्या बाहेरच विजेच्या तारा आहेत, त्या ठिकणी घरट्यातून येता जाता हे विसावा घेत. घरट्याची जागा तर जाम सुरक्षीत होती.

यथावकाश घरटं पूर्ण झालं, पिलांचा आवाज यायला लागला, आवाजाचा किलबिलाट आणि मग कलकलाट होऊन एकदम शांतता झाली तेंव्हा लक्षात आलं की पिलं उडूनही गेली.....
पिवळं पडलेलं घरटं सुनं झालं.

काही दिवसांनी बाल्कनीत चिमण्या घुटमळायला लागल्या. बायकोने लावलेला पुदिना यांनी मटकवायला सुरूवात केली. म्हटलं ठिक आहे, फक्त इथे घरटं बांधा. काही दिवसांनी लक्षात आलं की या चिमण्यांनी त्या मुनियांच्या घरट्याचा ताबा घेतला होता!!! म्हटलं बऱ्याच हुशार आहेत.

त्यांच्याही पिलांचा आवाज यायला लागला, आवाजाचा किलबिलाट आणि मग कलकलाट होऊन एकदम शांतता असं सगळं झालं. पण त्यांची पिलं उडून जाताना मी पाहिली. एक पिलू खिडकीवर येवून विसावलं, एक बाल्कनीत विसावलं, मग खाली गेलं. दुसऱ्या दिवशीही एक पिलू दिसलं.

त्यानंतर लगेच चिमण्यांची दुसरी वीणही तिथेच झाली!!!

या वर्षी मुनियांची अतुरतेने वाट पाहत होतो. पहायचं होतं काय होतं ते. पावसाळा सुरू झाल्यावर एक दिवस मुनिया दिसले ! या वर्षी वेली तर नव्हत्या बाल्कनीत पण झाड झाडोरा चांगला होता. या वर्षी गवती चहाही लावलेला! घरट्याचं प्रकरण मुनियांच्या लक्षात आलं असावं कारण तिकडे जाताना ते दिसत नव्हते.
काही दिवसांत चिमण्यांची आणखी एक वीण त्याच घरट्यात झाली.....

मुनिया अधून मधून दिसत पण घरटं कुठे बांधलंय याचा अंदाज येईना, मात्र गवती चहाची पाती हळूहळू कमी होताना दिसू लागली....

म्हणजे यावेळी मुनियाचं घरटं सुगंधी आहे तर!!!


हाच तो मुनिया!


   

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.