शनिवार, ३ मार्च, २०१२

वावटळ

दुपारचं ऊन तापायला लागलंय. चटका बसतो. पानगळ झालेली झाडे शांत उभी या काहिलीत. कौतुक म्हणजे पोपटी हिरवी पालवी या झाडांवर अशा रखरखीत उन्हातही चैतन्यरसाने सळसळते.
खाली वाळलेल्या पानांचा खच, वाऱ्याचा झोत आला की उडाल्यासारखा होतो. वावटळीत मात्र पार उंचावर जाऊन नंतर कुठेतरी धुळीत विसावतो.
काही अमूर्त आठवणी या वातावरणात वावटळीत उडणाऱ्या पाचोळ्यासारख्या वर येतात. या आठवणींना काही गोष्ट नसते किंवा कथा नसते की जी सांगता येईल. असतात त्या फक्त भावना...व्यक्त न करता येणाऱ्या.
म्हणजे दुपारचा बारा एकचा प्रहर. टळटळीत ऊन. माठाच्या गार पाण्याचे दिवस. रेडिओवर दुपारची सभा सुरू होतानाचं संगीत. म्हणजे दुपारच्या ऊन्हात शून्यात दृष्टी लावून गुंगीत असल्यासारखं ते संगीत ऐकतोय तेंव्हाची ती भावना....
किंवा कडक ऊन्हापासून बचाव व्हावा म्हणून झाडाच्या विरळ सावलीत थांबावं तर सावलीबरोबरच आत्माही थंड होईल असं काही तरी जाणवतं... वर पाहिल्यावर कळतं की हा तर कडूलिंबाच्या नाजूक लक्षातही न येणाऱ्या फुलांचा मंद पण धुंद करणारा गंध आहे... आत्मा कसा सुखावतो नं.... तशी भावना....
ऊन्हातून घामाघूम होऊन यावं, समोर नव्या माठातलं मातकट वासाचं थंडगार पाणी...आणि पाण्याचा एक घोट घशाखाली उतरला की आत्म्याला सुखावणारा वाळ्याचा वास, सुगंध....
किंवा परिक्षेच्या दिवसांतल्या वर्णन न करता येणाऱ्या आठवणी... म्हणजे परिक्षा आल्यात... सर्वच जण अभ्यासात मग्न. मित्रांच्या भेटीही अभ्यास आणि परिक्षेपुरत्याच. एरवी रखरखीत ऊन...आणि परिक्षा झाल्यानंतर लागलेल्या सुट्या...एकतर सर्वच मित्र गावाला गेलेले, किंवा आपणच कुठेतरी मामाकडे वगैरे आलेलो...मग नेहमीसारखं थोडीच खेळता येतंय. बाहेर तापणारं ऊन. दुपारी घरातील मोठी माणसं वामकुक्षी घेत असलेली. आवाज असा कशाचाच नाही... पाखरांचाही नाही. तीही चिडीचूप. मग आपल्याच कल्पनाशक्तीला जोर देत, कल्पना लढवत बसावं... नाहीतर परिकथा आणि जादू असलेली गोष्टीची पुस्तकं वाचावीत.
पन्हं...
आंबे...
संध्याकाळी सुटणारा वेगवेगळ्या सुगंधी फुलांचा वास...
घरात चाललेली वेगवेगळी वाळवणं आणि चवीसाठी मिळणाऱ्या कायकाय गोष्टी....गव्हाचा चीक अन् पापडाच्या लाट्या. लोणच्याची करकरीत फोड किंवा ताज्या मसाल्यात तेल मीठ घालून केलेली न्याहारी...

कधीकाळी खेडेगावी गेल्यावर परतताना बैलगाडीतून फाट्यापर्यंत केलेला प्रवास, तिथं भर दुपारी झाडाच्या सावलीत बसची वाट पाहणं. खेड्यातल्या बाया, बाप्ये अन् पोरं सगळेच तिथं जमलेले. पोरांच्या हातात चिवड्याचं पाकिट नाहीतर घरचा लाडू किंवा बाजारातून आणलेली गोडी शेव. जवळपास कुत्रीही सावलीसाठी आलेली. बस स्टॅंड नाही अन् स्टॉप नाही. काळ्या डांबरी रस्त्यावर उष्णतेने उठणाऱ्या लाटा आणि त्या लाटांत दिसणारं मृगजळ. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, माणसं, सारं पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाप्रमाणे हलताना दिसायचं...बाया डोईवरला पदर अधूनमधून सारखा करीत. बाप्ये डोळ्यांवर हात धरून दूरवरून येणाऱ्या वाहनाचा वेध घेत. भयानक शांतता बाभळीच्या झाडावरून अखंड येणारा किर्रर्रर्र आवाज... आणि वाहन दृष्टीच्या टप्प्यात येण्याच्या आधीपासून येणारा त्याचा धीरगंभीर आवाज. सरावलेले गावकरी त्या आवाजावरून कुठलं वाहन आहे ते ओळखत. हा सगळा अनुभव. याला ना कथा ना गोष्ट... फक्त भावना. थोडी विरक्तीची.... विश्वाचा विचार करायला हीच ती वेळ आणि वातावरण... माणसाचा खुजेपणा त्याला जाणवून देणारी... कमीत कमी  मला तरी हा साक्षात्कार होतोच या वातावरणात.

रविवार, २९ जानेवारी, २०१२

काळ

 संग्रहालयातील एक मोठा हॉल. तुडुंब भरलेला. सगळ्यांच्या नजरा एका मोठ्या लाकडी घड्याळावर खिळलेल्या. घड्याळावर सुंदर नक्षी. 
जुनाट वस्तूंवर एक  गुढतेची छटा येत जाते आणि तसतसं त्यांचं मूल्यही वाढत जातं. त्या मौल्यवान होत जातात. लहानपणी तर अशा जुनाट, गूढतेचं अभ्र पांघरलेल्या वस्तू परीराज्यातून आल्यात असं वाटायचं. त्यांच्यामागे अल्लाउद्दीनच्या दिव्यासारखी काही जादू लपली असेलसं वाटायचं. त्यामुळे अशा वस्तूंचं (मग ते काहीही असो) मूल्य आमच्यालेखी अनमोलच असे. 
तसंच दिसणारं हे घड्याळ...

सेकंदही बराच मोठा वाटतोय. काळ मंद झालाय, एक एक पाऊल तो चालतोय. त्याच्या एका पावलामागे 
ऱ्हदयाचे अनेक ठोके पडलेले..... क्षणात वाटून जातं,  इथं काळ एवढा मंद, हळू कसा? आयुष्याची तीस वर्षं कशी क्षणात निघून गेली आणि इथं एक एक मिनिट जाता जात नाही. वाट पहावी लागतेय. 

मृत्युशय्येवर वृद्धापकाळीही असंच असेल. काळाचं जवळ येणारं पाऊल असंच संथ पडत असेल. 


पंधरा मिनिटे राहिली. मंजूळ किणकिण ऐकू येते.

आता एक अस्वस्थ शांतता पसरलीय. लोकांच्या अस्वस्थ नजरा. घड्याळातील नगारा वाजवणारा माणूस. सेकंदाच्या लयीत त्याचा हात नगाऱ्यावर पडतोय. 

बरोबर तीन मिनिटे राहिली. दार उघडलं घड्याळातलं अन तिथं एक माणूस अवतरला. शंभर दोनशे लोकांची अस्पष्ट पण एका लयीत असल्यासारखी कुजबुज, आणि मग पुन्हा सगळं शांत. नगाऱ्यावरचा हात, क्षण, सेकंद, काळ सगळं शांत, मंद हळू .... अधीरता, उत्सुकता ताणली गेलेली.

बारा वाजतात. मघाचा दारात आलेला माणूस घंटेवर ठोके द्यायला लागतो. एक, दोन, तीन....
आता प्रेक्षाकांमधूनही अस्फुट शब्दोच्चार ...त्या ठेक्यांच्या लयीत. चार पाच सहा...

जणू काळ ठोके देतोय....काळाचेच तर ठोके न हे ? त्यांची लय ऱ्हदयातल्या ठोक्यांशी जोडल्यासारखी वाटतेय. 

सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा...पाहता पाहता ठोके देणारा माणूस अदृश्य होऊन जातो. संपलं सगळं. काळही असंच झडप घालत असतो न ? काळाबरोबर आपण आयुष्य मोजत राहावं, बारा वाजतात आणि 
ऱ्हदयात ठोके देणारा गायब. ठोके शांत सगळं शांत.

अचानक आनंदाचे, हर्षाचे चित्कार आणि टाळ्या उमटतात. शंभर दोनशे लोकांनी एकदम व्यक्त केलेला आनंद. 
हा आनंद नवा तास, नवा डाव सुरु झाल्याचा ? पुन्हा एक पासून गणना सुरु होणार म्हणून ? 

मी भानावर येतो. समोर सुंदर नक्षीकाम केलेलं लाकडी गूढ घड्याळ आणि आजूबाजूला पांगत चाललेली गर्दी.....                                                  

रविवार, १ जानेवारी, २०१२

भोंगीर (भुवनगिरी)

काल मला हैदराबादेत जीवन असल्याची जाणीव झाली... इतके दिवस घुसमटत जगत होतो इथे....काल जरा मोकळा श्वास घ्यायला मिळाला... निमीत्त झालं भोंगीरच्या (भुवनगिरी) चढाईचं!
माझी इथे आल्यापासून कायम तक्रार होती... इथे आजुबाजूला काहीच नाहीय....फिरायला, ट्रेकींगला....कमीत कमी १८० कि.मी. जावं तेंव्हा कुठे नागार्जुनसागर सारखं एखादं ठिकाण सापडतं... पण आता मी अशी तक्रार नाही करणार.
काही दिवसांपूर्वी आलेर (कुलपाकजी) या जैन तीर्थक्षेत्री जाताना ट्रेनमधून  एका प्रचंड मोठ्या  एकसंध पाषाण कड्यावर एक किल्ला दिसला. गाडी या किल्ल्याला अर्धवर्तुळाकार वळसा मारून जाते. ठरवलं, या किल्ल्यावर यायचं.
काल योग आला. किल्ला दुर्गम नाही. पण तहानच ती. दुध नाही मिळालं तर ताकावर भागते..

View Larger Map

घरातून सकाळी सात वाजता निघालो. सिकंदराबाद, उप्पल मार्गे भुवनगिरी असा सरळ रस्ता आहे. उप्पल पासून वारंगळ हायवे ने साधारणतः ४० कि. मी. गेल्यावर समोेर हा एकसंध शिलाखंड असणारा डोंगर अन् त्यावर ठेवल्यासारखी दिसणारी भग्न इमारत दिसू लागते. इथेच डाव्या हाताला भुवनगिरीचा फाटा फुटतो. रस्ता चांगला आहे. गावात गेल्यानंतर बस स्टँडच्या मागच्या बाजूचा रस्ता किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी नेवून सोडतो. पायथ्याशी एक देवीचं आणि मारुतीचं देऊळ आहे. वर जाणारा रस्ता थोडा अलिकडेच आहे. त्याला कमान आहे अन् तिथून पायऱ्या सुरू होतात. तटबंदी बऱ्याच ठिकाणी शाबूत आहे. झाड झाडोरा वाढलाय. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर त्या मोठ्या शीलाखंडाचा दुसरा टप्पा दिसू लागतो. या दोन टप्प्यांच्या मधल्या खोबणींना बंधारा घालून तिन टप्प्यांमध्ये पाणी साठवायची व्यवस्था केलेली दिसते. (आता त्या कुंडांत कमळं उगवलीत) इथून पुढे दगडातच पायऱ्या कोरल्यात.
अगदी वर गेल्यावर घोंघावणारे वारे सुरू होतात... वरही कुठेकुठे बांध घालून पाणी साठवायची व्यवस्था केलीय.

वर जावं, हैदराबादच्या कलकलाटापासून, जीवघेण्या ट्राफीकपासून, शहरी आणि कृत्रीम जीवनापासून दूर, शांत-निवांत बसावं, मोकळी हवा खावी, खाली खेळण्यातल्या सारख्या दिसणाऱ्या झुकझुकगाड्या पहाव्यात, शांत पडून रहावं, फुप्फुसांमध्ये जीवन भरून घ्यावं दोन चार सुंदर घटका अनुभवून खाली यावं
एक दिवसात जावून येण्यासाठी छान ठिकाण आहे. मोटारसायकलने जायलाही मजा येइल. गाडीने जायची इच्छा नसेल तर सिकंदराबादहून भुवनगिरीला सकाळी भरपूर ट्रेनही आहेत.

भुवनगिरी पासून १३ कि.मी. वर यादगिरीगुट्टा इथं श्री नृसिंहाचं देऊळ आहे. भुवनगिरी ते यादगिरीगुट्टा हा रस्ताही सुंदर आहे. दोन्ही बाजूंना व्हिडीओ गेममध्ये असतात तसे डोंगर, तलाव..... तलावांमध्ये चित्र-बलाक अन् तत्सम पक्षी.....

 या रस्त्यावर मला नीराही पहायला मिळाली! लोक ताजी नीरा झाडावरून काढून आणून त्याच माठांमधून विकत होते...

खाली काही छायाचित्रे देत आहे....

.







































 


बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

अहाहा किती सुंदर दृश्य आहे न हे? हा आहे नागार्जुनसागरचा सुंदर आणि विस्तीर्ण जलाशय.



अरे हे काय आहे?



कुरकु-यांचं पाकीट पाण्यावर तरंगतंय !!!!


तर आपल्याला कुठे काही सुंदर पाहिलं कि ते घाण केल्याशिवाय राहवत नाही. एक आई वडील प्लास्टिकची पाण्याची बाटली पाण्यात फेकून खिदळत होते. त्यांच्या मुलांवर तर चांगले संस्कार झाले न ?


एक गणित शालेय अभ्यासक्रमात असायला हवं
नागार्जुन सागर ला तीन बोटी प्रत्येकी पाच चकरा करतात. प्रत्येक बोटीवरून प्रत्येक फेरीला दहा बिस्कीटचे पुडे, पाच पाण्याच्या बाटल्या, चार पेप्सीचे कॅन, दहा कुरकुरे सदृश पाकिटे, पाच चॉकलेटचे कागद एवढा कचरा पाण्यात फेकला जातो, तर दिवसाला कोणत्या प्रकारचा किती कचरा पाण्यात फेकला जातो?

सरकार तर्फेच हा व्यवसाय चालतो. मग कोणाला बोलणार?


तरी एका धीट बाईंनी चार टग्या तरुणांना यावरून चांगलाच दम भरला. मी स्वतः जाऊन त्यांचे आभारही मानले आणि ठरवलंय कि शक्यतो हे आपल्या पर्यंत मर्यादित न ठेवता कुणीही कचरा करताना दिसला तर त्यालाही परावृत्त करायचा प्रयत्न करायचा.

त्यासाठी भांडायचीही गरज नाही. गांधीगिरी उत्तम. म्हणजे मी असंही सांगू शकतो कि जर तुम्हाला हा कचरा सांभाळता येत नसेल तर मला द्या, मी सांभाळीन आणि कचरापेटीत टाकीन.
जर शहाणा असेल तर समजून जाईल. निर्लज्ज असेल तर असू दे, मी कचरा वाहीन. शेवटी माझा देश स्वच्छ राहावा म्हणून मी एवढा तर नक्कीच करू शकतो.    

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११

झाड

दिवस उजाडला तसं ते झाड थरथरत होतं. अंग चोरून उभं होतं. आज त्याच्या शरीरात चैतन्यरस सळसळत नव्हता. वारा पडला होता की त्या झाडानेच आपली पानं लपवायचा प्रयत्न केला होता ? पाखरांशी बोलण्यातही त्याला आज रस नव्हता. 
यावेळी पाउस चांगला झाला होता.... केवढी हिरवाई चढली होती त्याच्या अंगावर.... पण आज तो हिरवा रंगही विटला होता. 
काय झालं होतं ?
त्याने हळूच डोळे उघडून पाहिलं....तो घोळका इकडेच येत होता... पूर्वी ते संध्याकाळी यायचे. आता सकाळीच येतात. पूर्वी त्यांना फार काही नको असायचं. हल्ली त्यांचं समाधानच होत नाही....
{आज दसरा. आजच्या दिवशी हजारो वर्षांपूर्वी त्याच्या पूर्वजांनी पांडवांच्या मदतीला धाव घेतली होती...कुबेराचं धन पांडवांपर्यंत पोहोचवलं होतं. त्याच्या पानाला सोन्याची किंमत आली होती तेंव्हा. अन तेंव्हापासून हा माणूस दसऱ्याला सोनं म्हणून त्याच्या पूर्वजांची, बांधवांची पानं लुटतोय. कालपरवा पर्यंत तो काही पानं घेऊन जायचा तिथपर्यंत ठीक होतं. म्हणजे ती एक अभिमानाचीच बाब होती त्याच्यासाठी. त्याच्या पूर्वजांबद्दलचा अभिमान!!! 
पण आता त्याच माणसांनी त्याच्या पानांचा बाजार मांडायला सुरुवात केली. त्यात त्यांची बरीच कमाई होते म्हणे. म्हणजे शहरात कुणी पांढरपेशा नोकरदार वर्ग आहे म्हणे ज्याने आपली अक्कल कुठे तरी गहाण टाकलीय आणि तो सर्व रूढी परंपरा त्या अकलेशिवाय अगदी व्यवस्थित पाळतो. तर हाच नोकरदार वर्ग या सोन्याच्या पानांसाठी नाणीही मोजतो.}
तो घोळका तिथे येऊन पोहोचला सुद्धा. आणि मग त्यांनी ओरबाडायला सुरुवात केली..... त्यांचं समाधान झालं. त्यांना हवी तेवढी (?) नाणी मिळणार असं वाटलं म्हणून किंवा ओरबाडायला काही शिल्लक राहिलं नव्हतं म्हणून तिथून ते चालते झाले. 
झाड तसंच अंग चोरून उभं होतं.... त्यांनी सोनं लुटलं नव्हतं. त्या झाडाची अब्रू लुटली होती... 


आताशा झाडांची अब्रू लुटल्याच्या बातम्या बऱ्याच यायला लागल्यात. म्हणजे कडू-लिंब आंबा यांच्या सौंदर्यावरही माणसांचा डोळा आहे हल्ली. आणि वड तर रस्त्याकडेलाच असतात. रस्ते रुंद करण्याच्या नावाखाली बरंच काही करता येतं. आणि वटपौर्णिमेचीही एक नवी प्रथा सुरु झालीय हल्ली. त्यात तर पार लक्तरंच काढली जातात....

या अब्रू लुटलेल्या झाडांनी कुणाकडे दाद मागायची आता? पूर्वी भुताने माणसाला झपाटल्यावर त्याला झाड म्हणायचे. आता माणसाने झाडाला झपाटल्यावर त्याला काय म्हणायचं?      

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.