गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

पेन


  पेनांचं मला भलतं वेड. बऱ्याच जणांना असतं. माझं खूप वेगळं नाही. [का असावं हे वेड? मानसीक विश्लेषण रंगतदार होईल नक्कीच.]

माझी पहिली पेनची आठवण पहिली-दुसरीतील. आम्ही पाटी पेन्सिलवरून थेट पेनवर घसरलो. मध्ये शिसपेन्सिल वगैरे नाहीच. शिसपेन्सिल भेटली भूमितीचा अभ्यास सुरू झाल्यावर. पण शिसपेन्सिल बद्दल नंतर.

तर मी पहिली-दुसरीत असताना वर्गात कुणीतरी पायलटचं (लक्झर) पेन आणलं होतं. मला ते भयंकर आवडलं. त्याच्या शाईचा समुद्राच्या पाण्यागत रंग, अतिशय बारीक टोक, दुधट पांढऱ्या रंगाचं ते पेन, खिशाला खोचायला चपटी दांडी, तिच्या दोन्ही बाजूंनी टोपणावर दोन निळे गोल. खालूनही शाई भरायच्या जागी निळं चकतीसारखं झाकण....

मी घरी हट्ट सुरू केला की मला तसलंच पेन हवंय. घरच्यांना मला सांगताही येत नव्हतं की मला पायलट पेन हवंय. मी फक्त वर्णन सांगत होतो. मग बाबा मला एका दुकानात घेऊन गेले. केसापुरी कँप नावाची आमची छोटीशी गाव-वजा वस्ती. काय मिळणार तिथे? तेही १९८८-८९ मध्ये? मला वाटतं तेंव्हा त्या पेनची किंमत १२ रु. होती. त्या दुकानदाराने अगदी माझ्या वर्णनासारखंच पेन दाखवलं. किंमत २ रु. मला सांगताही येईना  हे ते पेन नाहीय आणि नाहीही म्हणवेना. साधं ब‌ॉलपेन होतं ते. दिसायला पायलट पेन सारखंच. ठीक आहे, डुप्लीकेट तर डुप्लीकेट, मी ते घेतलं. सारख्या दिसणाऱ्या त्या पेनवर समाधान !

चौथी- पाचवी पासून मात्र खरे पेन वापरायला सुरूवात केली. खेड्यातल्या शाळा. त्यामुळं फार काही भारी पेन कुणाकडे नव्हते. कुणी कुणी तर फक्त कांडीने (आम्ही रिफिल ला कांडी म्हणायचो आणि ब‌ॉलपेन, ज्यात रिफील टाकायची, तो कांडीपेन!) लिहायचे आणि आम्हाला त्यात काही फार वेगळं वाटायचं नाही. कांडीने लिहून पहावं. तिही एक कला आहे.  मी ५ वी -६ वी ला होतो तेंव्हा अगदी बोटाएवढे फॅन्सी पेन मुलं आणायची. वेगवेगळे आकार असलेले आणि छोटुकली कांडी असणारे ते पेन गोजीरवाणे दिसत. काही की-चेन कम पेन ही असत! कांडीपेनच्या कांड्या संपल्यावर त्यांचं  काय काय करता येई. मेणबत्तीवर ती कांडी तापवून आम्ही तिचे फुगे फुगवायचो. कांडीच्या टोकाचा छर्रा काढून त्याला सलाईनची नळी जोडून कारंजं करायचो.

   शाई पेनांबद्दल (फाऊंटन पेनांबद्दल) खूप जणांकडून शिफारस, सल्ले येत. सगळे मोठे आणि काही बरोबरीचे मित्रही सांगत की शाईपेननं अक्षर चांगलं येतं. पण माझा आजतागायतचा अनुभव मात्र अगदी उलट आहे. मी खूप वेळा प्रयत्न केले की मी यावर खरं उतरावं, मलाही हाच अनुभव यावा, पण नाही....

एक मात्र आहे की माझं शाईपेनबद्दलचं आकर्षण काही कमी होत नाही. मला शाईपेननं लिहीतानाचा रसाळपणा आवडतो. शाईचा कागदावर उतरणारा ओलेपणा आवडतो. लिहीताना छान ओली असलेली शाई वाळताना पहायला आवडतं.

 शाईपेनचे अनेक किस्से आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे मी शाईपेन खऱ्या अर्थानं वापरायला ७ वी-८वी पासून सुरूवात केली. पण शाईपेन वापरणं हे 'शाही' काम आहे असं माझं स्पष्ट मत झालं. हे पेन वापरायला कागद अगदी उत्तम प्रकारचाच लागतो. पेन ही अगदी उत्तम प्रकारचंच लागतं.  तसं नसेल तर कागदावर शाई फुटणं, धब्बे पडणं हे प्रकार होतात..

माझ्या वह्यांचा कागद काही फार चांगला नसायचा.. मग ते 'भदाडं' (हा शब्द भाषेत आहत की नाही माहित नाही, पण मी तो वापरतो !) अक्षर अजूनच घाणेरडं दिसायचं. त्यात पेनही खूप ग्रेट नसल्यानं बऱ्याचदा शाई निबवर वाळायची आणि मग पेन झटकणं, झटकताना शिंतोडे उडणं, (कुठे कुठे अन् कसे कसे विचारूच नका). कधी कधी पेन जास्त शाई सोडायचं. मग आणखी 'भदाडं" अक्षर, आणखी मजा! टोपणात शाई जमा होणं, टोपणातून बाहेर येऊन कपड्यांवर डाग (पांढरा गणवेश!), सगळे हात शाईनं माखलेले!

निब आणि जीभ ॲडजस्ट करणं, ते करताना पुन्हा हात माखणं. हातानं जमलं नाही की दातात धरून प्रयत्न. मग ओठ आणि दातही रंगीत. मी जर माझ्या आई बाबांच्या जागी असतो तर रोज बदकावला असता मला! पेनांच्या निबही तुटायच्या आणि सुट्या निबही मिळायच्या! निबच्या खाली शाई वाहण्यासाठी 'चर' असायचे. जर पेन चालत नसेल तर ते चर ब्लेडने आणखी खोल करण्याचे प्रकारही आम्ही करायचो. पेनच्या निब मुद्दाम तिरक्या कापून कॅलीग्राफी करायला आम्ही मित्रांकडून शिकलो; फक्त याला कॅलीग्राफी म्हणतात हे माहित नव्हतं.

सगळ्यात मोठी पंचाईत म्हणजे खेळताना जर हे पेन खिशात असेल तर शाई बाहेर येऊन मोठ-मोठे शाईचे डाग 'पांढऱ्या -शुभ्र' गणवेशावर पडायचे! आणि एखाद्याशी भांडण झालं आणि खुन्नस काढायची झाली की मागे बसून त्याच्या पांढऱ्या  शर्टवर शाई शिंपडायची! आयांना त्यावेळी आमच्याबद्दल काय वाटत असेल कोण जाणे...

मी जेंव्हा ७-८वीला होतो तेंव्हा 'चायना पेन' हा फाऊंटन पेनमधला लक्झरी प्रकार आला. ३०-३५ रू. किंमत होती तेंव्हा त्याची. निबचं फक्त टोक बाहेर दिसे. एअरोडायनॅमीक डिझाईन! निळसर-करडा रंग आणि शाई भरायला आतमध्ये 'इन-बिल्ट' ड्रॅापर. हे चायनापेन वाले आणखी काय काय करायचे. म्हणजे एकाची शाई संपली की दुसरा एक थेंब शाई 'इन-बिल्ट' ड्रॅापरने बाहेर काढी अन् पहीला ती 'इन-बिल्ट' ड्रॅापरने शोषून घेई!

शाई भरण्यावरून आठवलं. साध्या पेनमध्ये शाई भरणं हे एक कठीण काम आणि मोठं स्कील होतं. न सांडता शाई दौतीतून झाकणात आणि झाकणातून पेनात भरणं जमलं म्हणजे ग्रेट. ड्रॅापर वापरण्याचं नीट-नेटकं काम आम्ही कधी केलं नाही!

त्याच काळात कधीतरी  रेनॅाल्डसचे निळ्या झाकणाचे पांढरे ब‌ॉलपेन आले. त्यांनीही हवा केली. पेन धरतो ते निळं कचकड्याचं अर्धपारदर्शक तोंड. ते निळे-पांढरे पेन गणवेशाशीच साधर्म्य साधत. रेनॅाल्डसचेच जेटर पेन नंतर आले, तेही वापरले.

दहावीला असताना कुठल्या रंगाची शाई वापरल्यावर पेपर चेक करणारे सर इंप्रेस होतील यावरही आम्ही चर्चा करायचो.

नगरला एक स्पेशल पेनचं दुकान होतं ( बॉंबे पेन सेंटर. तसं ते अजूनही आहे पण त्याची पूर्वीची शान आता नाही). तिथं अतिशय वेग-वेगळ्या प्रकारचे पेन मिळत. त्यांची स्वतःची पेन फॅक्टरी होती/आहे). मला तिथनं एक छानसं पेन घेतल्याचंही आठवतं. 

नंतर कॅालेजला असताना 'सेलो ग्रीपर' आले आणि मी त्यांच्या प्रेमातच पडलो. अतिशय बारीक टोक आणि तशीच बारीक रेघ. माझं अक्षर सुधारलं ते तिथून! 

अनेक पेनांच्या आठवणी झाल्या. अमेरीकेतल्या दूरच्या नातेवाईकांनी एक पेन पाठवलं होतं. वापरा अन् टाकून द्या प्रकारातलं, पण मला ते आवडलं. अक्षर/रेघ जाड जरी येत असेल, तरी लिहीताना अतिशय मऊ! त्याच्या शाईतही एक वेगळाच गडद पणा होता! असंच आणखी एका कुठल्यातरी नातेवाईकांनी कारट्रीज वालं फाऊंटन पेन दिलं होतं. तेही छान होतं, पण कारट्रीज संपल्यावर काय करायचं ते कळलं नाही आणि ते पेन तसंच पडलं. एक लाल रंगाचं पार्कर पेन मित्रानं दिलं होतं जे अनेक दिवस होतं माझ्याकडे. खूप भारी आणि म्हणून कमी वापरलं गेलं. पायलट आणि त्याच्या नंतर आलेल्या आवृत्त्याही मी वापरल्या पण दुसरीतला उत्साह राहिला नव्हता. काही वापरा अन् टाकून द्या प्रकारातले साधे पेन मी आणि बहिणीने खूप वापरले, त्यांच्या शाईच्या रंगासाठी.

नंतर काही फेल्ट पेनही वापरले. त्यांचं टोक झिजायचं अन् नविन बसवावं लागायचं. काही ग्लिटर पेनही वापरले! पण सेलो ग्रीपर ची जागा कुणीच घेऊ शकलं नाही.  

 शेवटी काही लहानपणीच्या खजिन्यातील. आजोबा कलाकार होते. त्यांच्याकडे वेगवेगळे पेन, बोरू, वेगवेगळ्या प्रकारचे रंग , ब्रश आणि तऱ्हे-तऱ्हेच्या पेन्सिलींचा खजीना होता. काही साध्या पेन्सिली पाणी लागलं की जांभळ्या व्हायच्या. मला आजही एका गोष्टीची सल मनात आहे आणि ती म्हणजे मी यातलं काहीच जपलं नाही. उलट नासधूसच केली. आजोबा मात्र यावरून कधी रागावल्याचंही आठवत नाही. आज वाईट वाटतं. पण क्षण हातातून निसटून गेलेले असतात. 

मी आजही फाऊंटन पेन घेतो, एक वेडी आशा ठेऊन की माझं अक्षर चांगलं येईल, पण आजही ते खराबच येतं. (चांगल्यातलं पेन अन् कागद वापरूनही)!.



Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.