शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२

मुनीयांचं घरटं

आमचं घर तिसऱ्या मजल्यावर. एक छोटीशी बाल्कनी फक्त मोकळ्या हवेसाठी. आम्ही नाही नाही करत हळू-हळू कुंड्या आणायला सुरूवात केली. चार-दोन झाडे लावली आणि काही वेल लावले. गणेशवेल आणि गोकर्ण छान आले...बाल्कनीच्या जाळीवर छानदार पसरले. घराचा हा हिरवा कोपरा बाहेरुनही कसा छान दिसू लागला. मग आम्ही भोपळ्याच्या बिया पेरल्या. त्याही चांगल्या आल्या पण नंतर त्यांना कुंडीतलं जगणं मानवलं नाही बहुतेक. ते वेल पिवळे पडून सुकून गेले. आम्ही आमच्या परीनं हा कोपरा जिवंत करायचा प्रयत्न करीत होतो. निसर्गाच्या जवळ जायचा प्रयत्न करीत होतो. एकदोनदा शिंजीर येवून शोधाशोध करून गेले. मग वाटलं इथे पक्षी आले तर? आम्ही पाणी आणि खायला धान्य ठेवू लागलो, पण पक्षी फिरेनात.
मग घरट्यासाठी म्हणुन एक मातीचं बोळकं बाल्कनीच्या जाळीत अडकवलं. तिकडेही कुणी फिरकेना...आणि एक दिवस अचानक मुनिया दिसले. आम्हाला खूप आनंद झाला. ते बहुतेक आम्ही दोघे ऑफीसला गेल्यावर येत असावेत. मग आम्ही एक मक्याचं कणीस अडकवून ठेवलं. तिकडे यांनी ढुंकूनही पाहीलं नाही. अधून-मधून पाहणी करून ते जात.

मग एक दिवस अचानक गवताचं पातं घेवून एका मुनियाला मी उडताना पाहीलं. तो बाल्कनीत आला नाही तर आमच्या बाल्कनीच्या बाजूच्या मोकळ्या जागेतून वर गेला. आमच्या इमारतीला प्रत्येकी दोन फ्लॅटच्या मध्ये मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत खिडक्या उघडतात.

मुनियांच्या आधीच्या निरिक्षणावरून हे माहित होतं की यांना घरट्यासाठी लांब हिरवीगार गवताची पाती लागतात.

मी बाल्कनीतून वाकून पाहिलं तेंव्हा लक्षात आलं की आमच्या वरच्या मजल्यावरच्या घराच्या ए.सी. चा ब्लोवर ज्या ठिकाणी बसवला आहे त्याच्या आणि भिंतीच्या फटीत यांचं घरटं बांधणं सुरू होतं. बाल्कनीच्या बाहेरच विजेच्या तारा आहेत, त्या ठिकणी घरट्यातून येता जाता हे विसावा घेत. घरट्याची जागा तर जाम सुरक्षीत होती.

यथावकाश घरटं पूर्ण झालं, पिलांचा आवाज यायला लागला, आवाजाचा किलबिलाट आणि मग कलकलाट होऊन एकदम शांतता झाली तेंव्हा लक्षात आलं की पिलं उडूनही गेली.....
पिवळं पडलेलं घरटं सुनं झालं.

काही दिवसांनी बाल्कनीत चिमण्या घुटमळायला लागल्या. बायकोने लावलेला पुदिना यांनी मटकवायला सुरूवात केली. म्हटलं ठिक आहे, फक्त इथे घरटं बांधा. काही दिवसांनी लक्षात आलं की या चिमण्यांनी त्या मुनियांच्या घरट्याचा ताबा घेतला होता!!! म्हटलं बऱ्याच हुशार आहेत.

त्यांच्याही पिलांचा आवाज यायला लागला, आवाजाचा किलबिलाट आणि मग कलकलाट होऊन एकदम शांतता असं सगळं झालं. पण त्यांची पिलं उडून जाताना मी पाहिली. एक पिलू खिडकीवर येवून विसावलं, एक बाल्कनीत विसावलं, मग खाली गेलं. दुसऱ्या दिवशीही एक पिलू दिसलं.

त्यानंतर लगेच चिमण्यांची दुसरी वीणही तिथेच झाली!!!

या वर्षी मुनियांची अतुरतेने वाट पाहत होतो. पहायचं होतं काय होतं ते. पावसाळा सुरू झाल्यावर एक दिवस मुनिया दिसले ! या वर्षी वेली तर नव्हत्या बाल्कनीत पण झाड झाडोरा चांगला होता. या वर्षी गवती चहाही लावलेला! घरट्याचं प्रकरण मुनियांच्या लक्षात आलं असावं कारण तिकडे जाताना ते दिसत नव्हते.
काही दिवसांत चिमण्यांची आणखी एक वीण त्याच घरट्यात झाली.....

मुनिया अधून मधून दिसत पण घरटं कुठे बांधलंय याचा अंदाज येईना, मात्र गवती चहाची पाती हळूहळू कमी होताना दिसू लागली....

म्हणजे यावेळी मुनियाचं घरटं सुगंधी आहे तर!!!


हाच तो मुनिया!


   

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.