काल अनेक वर्षांनी पतंग आणि मांजा हातात घेतला. जुने दिवस आठवले.... कटलेला पतंग पकडण्यासाठी पळतानाचे.... मांजा पकडण्याचे.... आणि सोबत आठवली पतंगांची पतंगांच्या दुनियेतली एक जुनी परिभाषा.
पतंगांचे प्रकार म्हणजे टुक्कल, झोप्पड, बॉट्टल आणि अजून किती तरी.
बाटल्या फोडून, कुटून त्याची भुकटी करायची, सिरस पत्र्याच्या डब्यात शेकोटीवर वितळवायचा, रंग टाकायचा, आणि वेगवेगळ्या ब्रांडचे धागे सुतवायचे. यात वर्धमान, डबल हातोडा, बरेली हे प्रसिद्ध! मांजा सुतवण॓ हा रात्रीचा अक्ख्या गल्लीतल्या पोरांचा उत्सव असायचा, मग मांजा कोणाचा का सुतवायचा असेना. काच कशी धरायची, सिरस कसा धरायचा याची देखील टेक्निक होती.
पतंग उडवतानाची सुधा एक भाषा होती. पतंगाला सुत्तर पाडून मग उडवायला तयार झाला की ढील दे, आखड, ठुमक्या दे, असं काय काय चालायचं. दुसऱ्या गल्लीतल्या मुलांना आरोळ्यांनी आव्हान दिलं जायचं. पतंग उडल्यावर तो गिरक्या घेतोय, कनतोय, झोपतोय, खाली सूर मारतोय यावर त्याला शेपूट लावायची, कन्नी बांधायची की अजून काय करायचं ते ठरायचं.
एखाद्याची गोत रंगली की समोरच्याचा मांजा कोणता ही आतली बातमी कोणी तरी सांगायचं, मग अखडा आखडी करायची कीं ढील द्यायची ते ठरवायचं. आखडाआखडी साठी अनुभव आणि energy खूप लागायची. ढील देतानाही एक थरार असायचा. ढील देताना चक्री धरणाराही चांगला तयार असावा लागायचा.
एखादा पतंग कटला की काप्पे ची आरोळी आणि तो पकडण्यासाठी पोरांची ही झुंबड. मग कधी पकडलेल्या पतंगावरून भांडण आणि मग क्षणापूर्वी उंच आकाशात विहरणारा तो पतंग कन्नी होऊन पडायचा. असेच कटलेले काही पतंग एखाद्या अँन्टेनाला, विजेच्या तारांना, झाडाच्या फांद्यांना लटकत राहायचे..... एकेकाची वेळ असते!