शनिवार, ३ मार्च, २०१२

वावटळ

दुपारचं ऊन तापायला लागलंय. चटका बसतो. पानगळ झालेली झाडे शांत उभी या काहिलीत. कौतुक म्हणजे पोपटी हिरवी पालवी या झाडांवर अशा रखरखीत उन्हातही चैतन्यरसाने सळसळते.
खाली वाळलेल्या पानांचा खच, वाऱ्याचा झोत आला की उडाल्यासारखा होतो. वावटळीत मात्र पार उंचावर जाऊन नंतर कुठेतरी धुळीत विसावतो.
काही अमूर्त आठवणी या वातावरणात वावटळीत उडणाऱ्या पाचोळ्यासारख्या वर येतात. या आठवणींना काही गोष्ट नसते किंवा कथा नसते की जी सांगता येईल. असतात त्या फक्त भावना...व्यक्त न करता येणाऱ्या.
म्हणजे दुपारचा बारा एकचा प्रहर. टळटळीत ऊन. माठाच्या गार पाण्याचे दिवस. रेडिओवर दुपारची सभा सुरू होतानाचं संगीत. म्हणजे दुपारच्या ऊन्हात शून्यात दृष्टी लावून गुंगीत असल्यासारखं ते संगीत ऐकतोय तेंव्हाची ती भावना....
किंवा कडक ऊन्हापासून बचाव व्हावा म्हणून झाडाच्या विरळ सावलीत थांबावं तर सावलीबरोबरच आत्माही थंड होईल असं काही तरी जाणवतं... वर पाहिल्यावर कळतं की हा तर कडूलिंबाच्या नाजूक लक्षातही न येणाऱ्या फुलांचा मंद पण धुंद करणारा गंध आहे... आत्मा कसा सुखावतो नं.... तशी भावना....
ऊन्हातून घामाघूम होऊन यावं, समोर नव्या माठातलं मातकट वासाचं थंडगार पाणी...आणि पाण्याचा एक घोट घशाखाली उतरला की आत्म्याला सुखावणारा वाळ्याचा वास, सुगंध....
किंवा परिक्षेच्या दिवसांतल्या वर्णन न करता येणाऱ्या आठवणी... म्हणजे परिक्षा आल्यात... सर्वच जण अभ्यासात मग्न. मित्रांच्या भेटीही अभ्यास आणि परिक्षेपुरत्याच. एरवी रखरखीत ऊन...आणि परिक्षा झाल्यानंतर लागलेल्या सुट्या...एकतर सर्वच मित्र गावाला गेलेले, किंवा आपणच कुठेतरी मामाकडे वगैरे आलेलो...मग नेहमीसारखं थोडीच खेळता येतंय. बाहेर तापणारं ऊन. दुपारी घरातील मोठी माणसं वामकुक्षी घेत असलेली. आवाज असा कशाचाच नाही... पाखरांचाही नाही. तीही चिडीचूप. मग आपल्याच कल्पनाशक्तीला जोर देत, कल्पना लढवत बसावं... नाहीतर परिकथा आणि जादू असलेली गोष्टीची पुस्तकं वाचावीत.
पन्हं...
आंबे...
संध्याकाळी सुटणारा वेगवेगळ्या सुगंधी फुलांचा वास...
घरात चाललेली वेगवेगळी वाळवणं आणि चवीसाठी मिळणाऱ्या कायकाय गोष्टी....गव्हाचा चीक अन् पापडाच्या लाट्या. लोणच्याची करकरीत फोड किंवा ताज्या मसाल्यात तेल मीठ घालून केलेली न्याहारी...

कधीकाळी खेडेगावी गेल्यावर परतताना बैलगाडीतून फाट्यापर्यंत केलेला प्रवास, तिथं भर दुपारी झाडाच्या सावलीत बसची वाट पाहणं. खेड्यातल्या बाया, बाप्ये अन् पोरं सगळेच तिथं जमलेले. पोरांच्या हातात चिवड्याचं पाकिट नाहीतर घरचा लाडू किंवा बाजारातून आणलेली गोडी शेव. जवळपास कुत्रीही सावलीसाठी आलेली. बस स्टॅंड नाही अन् स्टॉप नाही. काळ्या डांबरी रस्त्यावर उष्णतेने उठणाऱ्या लाटा आणि त्या लाटांत दिसणारं मृगजळ. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, माणसं, सारं पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाप्रमाणे हलताना दिसायचं...बाया डोईवरला पदर अधूनमधून सारखा करीत. बाप्ये डोळ्यांवर हात धरून दूरवरून येणाऱ्या वाहनाचा वेध घेत. भयानक शांतता बाभळीच्या झाडावरून अखंड येणारा किर्रर्रर्र आवाज... आणि वाहन दृष्टीच्या टप्प्यात येण्याच्या आधीपासून येणारा त्याचा धीरगंभीर आवाज. सरावलेले गावकरी त्या आवाजावरून कुठलं वाहन आहे ते ओळखत. हा सगळा अनुभव. याला ना कथा ना गोष्ट... फक्त भावना. थोडी विरक्तीची.... विश्वाचा विचार करायला हीच ती वेळ आणि वातावरण... माणसाचा खुजेपणा त्याला जाणवून देणारी... कमीत कमी  मला तरी हा साक्षात्कार होतोच या वातावरणात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.