शुक्रवार, १ ऑगस्ट, २०१४

बोलकी ढलपी

हल्ली बोलक्या ढलप्यांची गोष्ट वारंवार प्रत्ययाला येते. कधीतरी 'सकाळ' मध्ये  गंगाजळीत वाचलेली...

काही नाही, चेकबुक सापडत नव्हतं म्हणून पुर्ण ड्रॉवर काढला आणि त्यात अनेक कागद, चिठोऱ्या, बिलं सापडली...बरीच जुनी. काही फक्त बिलं, कारण त्यांच्यावरून दुसरा कुठलाही संदर्भ लागत नव्हता. नुसते आकडे. पण काही मात्र लांबलचक गोष्टी सागत होती.
हे होम नीडस फर्नीचरचं बिल. 'बायको'ला शिवण मशिन ठेवायला कपाट कम टेबल आणलं पण ती जागा पटकावली फिश टँकने. त्यावेळी बरेच मासे काचेच्या बाऊल मध्ये होते, काही (मित्राने घर सोडून जाताना दिलेले) चक्क बादलीत होते. फिश टँकला प्राधान्य मिळालं अन् त्याने जी जागा पटकावली ती आजपर्यंत. शिवण मशीन अजून जागा शोधतंय. दोन वर्षं झाली त्याला.
घराच्या बांधकामाचं कोटेशन... किती सोपं वाटलं होतं तेंव्हा घर बांधणं...पूर्ण घर बांधण्याच्या एक वर्षाचा कालावधी सरकला डोळ्यांसमोरून. आर्थिक, मानसीक, शारिरीक  ओढाताण... हैदराबाद वरुन घरी केलेल्या चकरा, अनेक वेळा घ्यावे लागलेले निर्णय, काही चुकलेले, काही अचूक. आई-बाबांना घालाव्या लागलेल्या चकरा...आणि बांधकाम पूर्ण झाल्यावरचं समाधान. सोबतच घरासाठी, बाथरुमसाठी टाईल्स निवडताना त्यांच्या डिझाईन्सची लिहून घेतलेली पन्नास एक नावांची लिस्ट. त्यातल्या टाईल्स घेतल्या नाहीतच कारण बजेट खूप वाढलेलं... नंतर कसाबसा पेललेला आणि आधीचं कोटेशन पाहताना अंदाजही न आलेला खर्च... खरंतर आता कोटेशन पाहताना वाटतं की हे म्हणजे हत्तीची फक्त सोंड पाहण्यासारखं. खऱ्या हत्तीचा कसा अंदाज यावा...
दूध, साखर, तांदूळ,उदबत्ती...अशी यादी..
कपड्यांचं बिल. मागच्या वाढदिवसाच्या दिवशी घेतलेले कपडे
प्रेस्टीज चं बील. त्यावेळी एक्सचेंज चालू होतं. मग काय, जो बिवीसे करे प्यार वो प्रेस्टीज से कैसे करे इन्कार... तसंही सौंना कढया फार आवडतात.
एक इमर्जंन्सी लाइटचं बिल. आता इन्वर्टर घेतलाय.
एक चांदीच्या चमचा वाटीचं बिल. समोरच्या हारुण चा पहिला वाढदिवस. समोर आजी-आजोबा राहतात. त्यांचा नातू. आजी आजोबांचा मुलगा आणि सून सिंगापूरला. तिथे पाळणाघरात विशिष्ट वयाच्या आतील मुलं घेत नाहीत. आजी आजोबांनी हारूण आणि त्याचा मोठा भाऊ अर्णव दोघांनाही सहा महिन्यांहून जास्त सांभाळलं. वाढदिवसाचा कार्यक्रम जोरातच झाला पण त्यातच त्यांच्या मुलाने अन सुनेने आजी आजोबांच्या लग्नाचा वाढदिवसही केला. सर्वांसाठीच तो सुखद धक्का होता!
एटीएम मधून पैसे काढल्याच्या पावत्या, खूप दिवस राहून कोऱ्या झालेल्या. पैशांचा, काढलेल्या रकमेचा निरर्थकपणा सांगणाऱ्या.
एक लगेजच्या दुकानाची पावती. जर्मनीला, पहिल्या परदेशवारीला जाण्यासाठी तिथून बॅगा घेतल्या होत्या. त्याबरोबरीने केलेली गरम कपड्यांची खरेदी..आणि त्याआधीच्या वर्षी जायची हुकलेली संधीही आठवली.पासपोर्ट हरवलेला होता तेंव्हा. कसा हरवला ह्याची तर चित्तरकथाच.एका पावतीवर एकमेकांना जोडलेले असे सुखाचे अन् दुःखाचे क्षण एकदम वर आले.
सौंनी सुरू केलेल्या एरोबीक्स क्लासचीही पावती सापडली...त्या क्लासच्या गंमती सौ सांगायच्या.त्यांचे शनिवारच्या स्पेशल क्लासचे एसेमेस माझ्याच नंबरवर यायचे.
पगारात कसं भागवायचं यासाठी पगाराची रक्कम अन् खर्च यांची केलेली आकडेमोडही सापडली.
रकमा लिहून सही करून ठेवलेले बिननावाचे चेक सापडले. आता बादही झाले होते. पण काही केल्या आठवत नाही कशासाठी ते लिहून ठेवले होते ते....
हिंदू पेपरची पावती. त्यावरून आठवलं. इथं राहायला आल्यावर लगेच एक मुलगा पेपरची सहा महिन्यांची स्कीम घेवून आला होता. पेपर तर घ्यायचा होता पण शिफ्टींग व इतर गोष्टींमुळं पैसेच शिल्लक नव्हते. आईने तिच्याकडचे दिले होते.
तारामती बारादरीचं तिकीट. पौर्णिमेच्या संध्याकाळी रंगलेला शास्त्रीय नृत्य अन् गायनाचा कार्यक्रम.एकीकडे संध्याप्रकाशात चंद्रोदय अन् दुसरीकडे रंगत जाणारा कार्यक्रम. मागे बारादरीची ऐतिहासीक वास्तू. तिथेच काही अरबी संगीत वाद्यंही ऐकायला मिळाली. त्यांची शास्त्रीय संगीताशी जुगलबंदीही ऐकायला मिळाली अन् त्या वाद्यांवर काही हिंदी गाण्यांच्या धून ही ऐकायला मिळाल्या.
अशी ही बोलकी ढलपी बोलायला लागली की काम बाजूलाच, आपण वेगळ्याच विश्वात अन् वेळेचा पत्ताच नाही....
ती जाहिरात आठवते, ज्यात आजोबा डास शोधत असतात आजीशी लागलेल्या पैजेप्रमाणे अन् त्यांना त्यांच्या कॉलेजचा फोटो सापडतो (किंवा आजींचं लक्ष वळवण्यासाठी ते शोधून काढतात!). तसंच काहीसं हे.

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.