शनिवार, ९ जून, २०१२

सायकल

सायकल चालवायला मी दुसरीत असतानाच शिकलो. त्यावेळी काही दोन्ही बाजूंनी चाकांचा आधार असलेल्या छोट्या सायकली नव्हत्या. बाबांच्या मोठ्या सायकलवरच मी शिकलो.

आम्ही त्यावेळी माजलगाव जवळच्या इरिगेशन कॉलनीत राहायचो. बाबा नगरहून नवी सायकल घेऊन येणार होते. खूप उशीर झाला त्यांना यायला संध्याकाळी. बसच्या टपावर टाकून ते सायकल घेऊन आले होते. आणि मग माजलगावहून चालवत. चांगलं १०-१२ कि. मी. चं अंतर असावं. त्यात चढ. (आधीची सायकल चोरीला गेली होती. ती आजोबांची होती ...)   मी आणि माझं मित्रमंडळ बाबांची वाटच पाहत होतो. केवढं कुतूहल होतं येणा-या नव्या सायकल बद्दल... आणि सायकल आल्यावरचा हर्ष.....कॉलनीत जेवढे ओळखीचे होते, तेही आले होते सायकल पाहायला. त्यांनाही केवढं कौतुक, कुतूहल... कोणत्या कंपनीची आणली.... केवढ्यात बसली वगैरे.....
आणि मग या नव्या सायकलवर माझं शिकणं सुरु झालं. पाय पुरणं तर शक्यच नव्हतं. मग आधी डावा पाय डाव्या पॅडल वर ठेवून उजव्या पायाने वेग घ्यायचा. असं बरंच अंतर जावं लागे. मग बऱ्यापैकी वेग आलाय असं वाटलं कि पटकन उजवा पाय सायकलच्या त्रिकोणी फ्रेम मधून पलीकडे टाकायचा. इथेही पॅडल पूर्ण मारताच यायचं नाही. मग अर्धं  पॅडल मारत मारताच सायकल चालवायची... हे सर्व चालू असताना बाबा आधी मागून सीटला धरून पळत, आणि मग मध्येच कधीतरी सीट सोडून देत, पण मागेच पळत राहत. असं मी त्यांना खूप पळवलंय. शिकायला फार दिवस लागले नाहीत. पण मग रोज बाबा ऑफिसमधून आले कि सायकल पळवायला न्यायचो. अख्या कॉलनीत सायकल पळवायचो. मित्रांबरोबर अशी "कैची" पद्धतीने सायकल चालवायच्या शर्यतीही व्हायच्या. गुडघे तर कित्येक वेळा फुटायचे. आणि त्या सायकलचे तर पाडून पाडून एवढे हाल केले कि सायकल दुकानदार सर्व्हीसिंगच्या वेळी ही नवी सायकल आहे यावर विश्वास ठेवायलाच तयार होईना.
आजोबाही सायकल चालवायचे हे माहित होतं. त्यांना सायकल चालवताना मात्र कधी पाहिलं नाही. पण त्यांच्याकडे दोन लोखंडी क्लिप होत्या. त्या म्हणे पँट चेन किंवा चाकात अडकू नये म्हणून  पँटला लावून सायकल चालवायचे.

बाबा आम्हाला कुठेही बाहेर घेवून जायचे ते याच सायकलवर. सायकलच्या त्रिकोणी  फ्रेमच्या आडव्या दांडीवर सीट बसवलं होतं आणि पुढच्या चाकामागच्या दांडीवर पाय ठेवायला पट्टी. मी मागे कॅरिअरवर बसायचो तर छोटी बहिण पुढच्या सीटवर. मी सायकल शिकल्यावर बहिणीला बसवून न्यायची भारी हौस. ती नको म्हणत असताना तिला सायकल वर बसवून चक्कर मारायला गेलो आणि दोघेही पडलो. तेंव्हापासून तिने माझ्याबरोबर डबलसीट बसायचा धसकाच घेतला..   
एकदा मामाकडे गेलो होतो. तिथे एक रु. वर एक तास अशी भाड्याने सायकल आणून खेळायचो. अशीच एकदा ही सायकल घेऊन फिरत होतो. सायकलला ब्रेक नव्हते. एका म्हातारीला जाऊन धडकलो. ती कळवळून म्हणाली, टाका बाबा मारून तू तरी म्हणजे सुटेन एकदाची...
भाड्याच्या सायकलचे असे किस्से नेहमी व्हायचे कारण त्या कधीच नीट मेंटेन नसायच्या.

दर आठवडे  बाजाराला बाबा मला सायकलवर बसवून न्यायचे. येताना भाजीपाल्याने अन फळांनी गच्च भरलेल्या दोन पिशव्या हँडलला असायच्या.  
एक दोनदा तर भयंकर वादळातून आमची सायकल फेरी निघाली. म्हणजे ओपन थेटर मध्ये आम्ही पिक्चर पाहायला गेलो अन वादळ आणि पाऊस सुरु झाला. पिक्चर तसाच सोडून उठावं लागलं. बाबांना सायकल चालवणे मुश्कील झाले. शेवटी ते खाली उतरले आणि ढकलत घरापर्यंत सायकल आणली.

आणि सायकलचंं पंक्चर काढताना पाहायला तर भारी आवडायचं. रबर चिकटवायच्या सोलुशनची लाल पिवळी ट्यूब आणि त्याचा तो वास अजून आठवतो. आन ते लाल जेल सारखं सोलुशन हातावर पापुद्रा येईपर्यंत वाळू द्यायचं आणि तो पापुद्रा काढायचा हा आवडता खेळ. कधी कधी वाटतं कि एवर युथ ऑरेंज फेसपॅकची कल्पना याच्यावरून सुचली कीं काय. 
सायकललाही छान सजवायची पद्धत होती (हे प्रत्येकाच्या शौक नुसार !!!) . मुठींना झिरमिळ्या असायच्या....कुशनचे रंगीत सीट कव्हर असायचे. सायकलच्या चाकांच्या तारांमध्ये रंगीत मणी असायचे. पिक्चरची नावं किंवा चित्रं असलेले रबरी मडगार्ड मिळायचे  आणखी बरंच काही मिळायचं यासाठी... 


चौथी पाचवी पर्यंत अशीच सायकल चालवली. प्रगती म्हणजे फुल पॅडल मारता यायला लागलं. मग सहावी सातवीला त्रिकोणी फ्रेमच्या दांडीवरून अन मग सीटवरून अशी प्रगती झाली.
 आठवीनंतर शनिवारी शाळेत सायकल न्यायला मिळाली. केवढा भाव खायचो सायकल शाळेत नेल्यावर. आणि दहावी ते डिग्री पर्यंत हीच आमची सखी सोबतीण झाली.    
 
 मग घरी M80 आली तरी एवढं कौतुक नाही वाटलं जेवढं सायकल आल्यावर वाटलं होतं. तीच गत स्वतःच्या कमाईची गाडी घेतल्यावर...तेंव्हाही एवढं कौतुक नाहीच. 

हे सगळं का आठवतंय ? तर आज स्वतःच्या कमाईची सायकल घेतलीय. हा सगळा चित्रपट डोळ्यांसमोरून सरकतोय... 


३ टिप्पण्या:

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.