Saturday, 21 April 2012

काहीतरी...

मायाजाल अन् महाजाल.....
काय हवं ते म्हणावं. लहानपणी इंद्रजाल व त्याच्या गोष्टी ऐकल्या होत्या तसंच हे. किंवा मृगजळ... हां... हा शब्द चपखल आहे.
मृगजळात हलणा-या सावल्या दिसतात... खोट्या खोट्या. खरं काहीच नसतं. प्रतिबिंबं पण दिसतात. अगदी खरी वाटावीत अशी. ख-या पेक्षाही मनोरम. तसंच या मायाजालाचं. मित्र आहेत, सोशल नेटवर्कींग आहे, सगळे कनेक्टेड आहेत. खोटे खोटे. अरे तो ना... तो आहे मा़झ्या कॉन्टॅक्ट मध्ये...
कॉन्टॅक्टमधले जेव्हा प्रत्यक्षात भेटतात तेव्हा त्यांच्या तारा जुळतातच असं नाही. मध्ये कित्येक वर्षांची दरी उभी राहते. मग पाच मिनीटांनंतर काय बोलावं हे कळत नाही अन शांतता जीवघेणी, असह्य होऊन जाते.
हरणाची गोष्ट ऐकली होती... ते म्हणे कधी कधी या मृगजळाच्या पाठी पाण्याच्या आशेने धावत राहतं... धावतं.... धावतं... छाती फुटेस्तोवर. अन् मग छाती फुटून मरतं. म्हणून हे मृगजळ.
आपणही अशा मृगजळाच्या पाठी धावतो. खरं पाणी अन् मृगजळात आपल्यालाही फरक समजत नाही. मग छाती फुटून मरण. ख-या पाण्याचे झरे आजुबाजूलाच होते हे कळून चुकतं.
दुसरी सल म्हणजे शेवटपर्यंत आपण "आपण" म्हणून जगतच नाही. आम्हां भारतियांमध्ये तर हे फार. "जगायचं जगायचं म्हणतांना जगायचंच राहून गेलं" तशी गत.
सलील कुलकर्णींचं "मी म्हणालो बऽऽऽरं" वाचलं अन् वाटलं किती खरं लिहीलंय....

आपल्या भोवती चौकोन तयार झालेत. कुणाभोवती वलयांकीत अशी वर्तुळंही असतील. पण प्रत्येकाभोवती काही ना काही भूमितीय आकार. प्रत्येक जण आपापल्या आकाराच्या आतच जगतो. त्याच्या बाहेर जगता येतं का ठाऊक नाही.
हे आकार कोणी बनवले आपल्या भोवती? हो... मायाजालाचाच एक भाग असलेली माध्यमं. आपण या काल्पनीक विश्वात जगायला शिकतोय. व्हर्च्युअल लाईफ...खरं काहीच नाही. भावनांचं भडक प्रदर्शन. कट, कपट, कारस्थानं...अन् मयताला जातानाही लेटेस्ट फॅशन. प्रेमाचीही फॅशन, बालविवाहाचीही फॅशन, सासू सुनांच्या भांडणाचीही फॅशन, भक्तीचीही फॅशन अन् शक्तीचीही फॅशन. श्रीमंतीची फॅशन अन् गरिबीचीही फॅशन... फॅशनचेच चौकोन, त्रिकोण अन वर्तुळं....

   
पूर्वी भावना म्हणे नाजूक असायच्या. आता त्या भडक असतात.
पूर्वी म्हणे लोकांच्या भोवती अशा भूमितीय आकृत्या नव्हत्या. कसे जगत ते?
चित्रकलेतला एक प्रकार आठवला. त्यात वेगवेगळे भूमितीय आकार. प्रत्येक आकार दुस-या आकाराला कुठेतरी छेद देतो. प्रत्येकाचा रंग तसा वेगळा. मग छेद दिलेल्या भागाचा रंग अजूनच वेगळा. असे अनेक छेद, अनेक रंग. सुंदर दिसतं सगळं. तरीही प्रत्येक आकार हवा तेव्हा वेगळा ओळखता येतो. इतर आकारांबरोबर मिसळून गेलेला. तरीही वेगळा.
   


Saturday, 7 April 2012

उबुंटू

उबुंटूची नवी आवृत्ती येत्या २६ तारखेला खुली होतेय. काय आहे उबुंटू?
शब्दशः पाहिलं तर हे एक तत्वज्ञान आहे. आफ्रिकेतलं. माणुसकीचं तत्वज्ञान.
पण मी ज्या उबुंटू बद्दल बोलतोय, ती आहे एक लिनक्स वर आधारीत काँप्युटर अॉपरेटींग सिस्टीम. लिनक्सचं तत्वज्ञानही असंच. म्हणजे तुम्ही वापरा, सुधारणा करा आणि सुधारीत आवृत्ती इतरांना वापरायला द्या. हे सगळं फुकट. माणुसकीसाठी.
आपल्याला काँप्युटर म्हटलं की विंडोज हेच समिकरण माहीत आहे आणि विंडोजवाल्या मायक्रोसॉफ्टचा कोट्याधीश झालेला बिल गेटस माहित आहे. हे 'फुकट'चं तत्वज्ञान नाही माहित आपल्याला. त्याच्यामागेही काही गैरसमज आहेत. त्याकडे आपण नंतर येऊ.
तर लिनक्सचा जन्म कसा झाला?
लिनस तोरवाल्ड्सने लिनक्सचा कर्नेल ५ अॉक्टोबर १९९१ला सर्वप्रथम प्रसारीत केला. त्याआधी १९८३ मध्ये रिचर्ड स्टालमनने युनिक्स वर चालणारी सर्व सॉफ्टवेअर्स तयार करून सर्व लोकांना मोफत उपलब्ध करून दिली होती (या प्रोजेक्टचं नाव होतं GNU). मग GNU आणि Linux मिळून एक परिपूर्ण अॉपरेटींग सिस्टीम तयार झाली.
तर लिनक्स अॉपरेटींग सिस्टीम घेऊन त्यात छोट्या मोठ्या सुधारणा करून (मुख्यतः ग्राफिक युसर इंटरफेस) त्याचे केलेले वेगवेगळे प्रकार सर्वांसाठी आज खुले आहेत. त्यात उबुंटू सर्वांत वर आहे. उबुंटूव्यतिरिक्त फेडोरा, मिंट आणि खुद्द उबुंटूचेही अनेक प्रकार आहेत. लिनक्स अॉपरेटींग सिस्टीम ही  विंडोजपेक्षा कितीतरी चांगली व सुरक्षित आहे. व्हायरस अजून तरी लिनक्सला बाधित करू शकत नाही. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे लिनक्सची काम करण्याची पद्धत आणि दुसरं म्हणजे त्याचा जगभरातला कमी वापर. आणखी एक असं की जगभरात कुणी ना कुणी सतत लिनक्सला सतत चांगली बनवत असतं. त्यामुळं लिनक्सला धोका जरी निर्माण झाला तरी त्यावर उपाय ताबडतोब तयार असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लिनक्स अगदी मोफत आहे. विंडोजवर असणा-या प्रोग्राम्सच्या तोडीचे किंवा त्याहूनही चांगले प्रोग्राम्स लिनक्स साठी मोफत मिळून जातात. विंडोजशिवाय आपलं कुठलंच काम अडत नाही.
मग तरीही लोक लिनक्स का वापरत नाहीत? यामागे एक सर्वात मोठा गैरसमज असा आहे की लिनक्सवर काम करणं म्हणजे DOS वर काम करण्यासारखं आहे. सर्व काही कमांड वरच चालतं. हा साफ चुकीचा गैरसमज आहे.  उबुंटू किंवा इतर आवृत्त्यांमध्ये आपण अगदी विंडोजसारखं माऊसने क्लिक करत काम करू शकतो. यांचा ग्राफिक युजर इंटरफेस अगदी विंडोजच्या तोडीचा किंवा अॅपलच्या तोडीचा आहे!!!
तर मग वाट कसली पाहताय? चला लगेच http://www.ubuntu.com/download
इथनं उबुंटू डाऊनलोड करा आणि वापरायला लागा! जर काही अडलंच तर मी मदत करायला तयार आहे. आणि हो, उबुंटू वापरणारे हजारो जण इंटरनेटवर तुम्हाला मदतीसाठी उत्सुक आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर इंटरनेटवर आधीच कुणी देऊनही ठेवलं असेल!!!


पहा माझ्या काँप्युटरवर उबुंटू असं दिसतं!!!